Thackeray Sena and Shinde Sena leaders campaign together in Sudhagad, Raigad, symbolizing a rare political alliance that reshaped local ZP and Panchayat Samiti results. Sarkarnama
कोकण

Raigad ZP : कोकणात राजकारणाचा नवा पॅटर्न! 'ठाकरे सेना'-'शिंदेसेना' खांद्याला खांदा लावून लढले अन् जिंकले देखील; प्रस्थापितांची सत्ता उलथवली

Raigad ZP Election Result : रायगडच्या सुधागडमध्ये ठाकरे सेना आणि शिंदे सेनेने एकत्र येत जिल्हा परिषद व पंचायत समितीत भाजपला पराभूत करून ‘सुधागड पॅटर्न’ची राज्यभर चर्चा निर्माण केली.

सरकारनामा ब्यूरो

Raigad ZP News : राज्याच्या राजकारणात शिवसेना आणि शिवसेना (उबाठा) यांच्यातील संघर्ष टोकाला गेलेला असताना, रायगडमधील सुधागड तालुक्याने मात्र संपूर्ण महाराष्ट्राला धक्का देणारा एक 'नवा पॅटर्न' समोर आणला आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत दोन्ही शिवसेनेच्या गटांनी 'खांद्याला खांदा' लावून निवडणूक लढवली आणि प्रस्थापितांच्या सत्तेला जोरदार सुरुंग लावला. 'सुधागड सन्मान समिती'च्या माध्यमातून आकाराला आलेल्या या प्रयोगाने भाजपसमोर मोठे आव्हान उभे करत विजयावर शिक्कामोर्तब केले.

सुधागडमध्ये स्थानिक राजकारणाने एक वेगळे वळण घेतले. ज्या ठिकाणी शिवसेना आणि उबाठा गट एकमेकांसमोर उभे ठाकतील असा अंदाज होता, तिथेच या दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांनी हातात हात घालून प्रचार केला. या 'शिवसेना-शिवसेना' युतीचा सर्वात मोठा तडाखा जांभूळपाडा जिल्हा परिषद गटात बसला. येथे शिवसेना शिंदे गटाच्या शर्मिला शरद बोडके यांनी खासदार धैर्यशील पाटील यांच्या पत्नी नीलिमा पाटील यांचा 2,931 मतांनी पराभव करत 'जायंट किलर' ठरण्याचा मान मिळवला.

केवळ जिल्हा परिषदच नव्हे, तर पंचायत समितीमध्येही या युतीचा करिष्मा पाहायला मिळाला. परळी पंचायत समिती गणात शिवसेना (उबाठा) गटाच्या प्रणिता राजेश परदेशी यांनी भाजपच्या सुनंदा सिंदकर यांचा 2,588 मतांनी धुव्वा उडवला. प्रणिता परदेशी यांनी 5,683 मते घेत विजयाचा नवा विक्रम प्रस्थापित केला. महाराष्ट्राच्या राजकारणात 'सुधागड पॅटर्न'ची चर्चा आता जोर धरू लागली आहे.

खासदारांच्या नेतृत्वासाठी धोक्याची घंटा?

​या निवडणुकीत भाजपने राबगाव गट आणि दोन गण राखण्यात यश मिळवले असले, तरी प्रतिष्ठेच्या जांभूळपाडा गटात झालेला पराभव भाजपचे खासदार धैर्यशील पाटील यांच्या नेतृत्वासाठी धोक्याची घंटा मानला जात आहे. सुधागड सन्मान समिती, दोन्ही शिवसेना, शेकापने दाखवलेल्या या ताकदीमुळे सत्ता समीकरणाचे गणित आता पूर्णपणे बदलणार आहे.

स्थानिक अस्मिता

निवडणुकीच्या सुरुवातीलाच भाजपने तालुक्याबाहेरील (पेण) उमेदवार नीलिमा पाटील यांना जांभूळपाड्यातून उमेदवारी दिल्याने स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट होती. यातूनच 'सुधागड सन्मान समिती' चा जन्म झाला. यात शिंदे गट, ठाकरे गट आणि शेकाप यांनी 'स्थानिक अस्मिते'साठी हातमिळवणी केली होती. विजयानंतर हा विजय तालुक्याच्या आस्मीतेचा, हा विजय तालुका सन्मान समितीचा, समस्त सुधागड वासियांचे हार्दिक आभार. अशा प्रकारचे मेसेज समाज माध्यमांवर फिरत आहेत. विशेष म्हणजे तिन्ही पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते निवडणुकीच्या प्रचारासाठी जोमाने काम करत होते.

खिंडार पाडण्याचा प्रयत्न अयशस्वी

ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा संपर्कप्रमुख मिलिंद देशमुख आणि तालुकाप्रमुख रवींद्र देशमुख यांनी भाजपमध्ये प्रवेश करून 'सन्मान समिती'ला खिंडार पाडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, मतदारांनी नेत्यांच्या पक्षांतरापेक्षा "सुधागडचा स्वाभिमान" महत्त्वाचा मानत शर्मिला बोडके व प्रणिता राजेश परदेशी यांच्या पारड्यात भरभरून मते टाकली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT