Uday Samant, Rajan Salvi Sarkarnama
कोकण

Konkan Politics: ठाकरे गटाची कोकणात जोरदार मोर्चेबांधणी; आमदार साळवींचा मंत्री सामंतांना सूचक इशारा

Uday Samant, Rajan Salvi: आमदार राजन साळवींचा विविध कार्यक्रमांचा धडाका...

सरकारनामा ब्यूरो

Ratnagiri News : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने कोकणात जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. आमदार राजन साळवी यांनी अनेक कार्यकर्त्यांना पक्षात प्रवेश देत विविध कार्यक्रमांचा धडाका लावला आहे. या माध्यमातून त्यांनी उद्योगमंत्री उदय सामंतांना एक प्रकारे सूचक इशाराच दिला आहे. विकासकामांची खोटी आश्वासनांची पत्रं देऊन ते शिवसेनेत प्रवेश करून घेत आहेत, असा टोलाही आमदार साळवी यांनी लगावला.

'शिवसेनेत फूट पडली, त्यावेळी मोठ्या प्रमाणात अनेक कार्यकर्त्यांना खोटी आश्वासने देऊन शिंदे गटात प्रवेश करून घेण्यात आले होते. यानंतर आता प्रत्येक गावात विकासकामांची खोटी माहिती आणि त्याबाबतचे पत्र देऊन आपण तुमचे विकासकाम करू, अशा मोठ्या गप्पा करून पक्षप्रवेश करून घेण्यात येत आहेत,' असा आरोप आमदार साळवींनी शिंदेंच्या शिवसेनेवर केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'शिंदे गटात अनेकांचे पक्षप्रवेश करून घेण्यात आले. मात्र, आजपर्यंत कोणतेही विकासकाम झालेले नसल्यामुळे खोट्या आश्वासनांना भुलून पक्षप्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांना आपली फसगत झाल्याचे लक्षात आले आहे. आता त्यांचा भ्रमनिरास झाला असून, ते ठाकरे गटात पक्षप्रवेश करीत आहेत,' असंही ते म्हणाले.

राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघात आमदार साळवी हे विकासकाम करू शकतात, यावरच विश्वास ठेवून शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यपद्धतीवर प्रभावित होऊन लांजा तालुक्यातील वेरवली खुर्द, राणेवाडी, खुलमवाडी, मांडवकरवाडी, आलीमवाडी येथील शेकडो ग्रामस्थांनी ठाकरे गटात पक्षप्रवेश केला, अशी माहिती आमदार साळवी यांनी दिली.

दरम्यान, आगामी लोकसभा, विधानसभा आणि महापालिकांच्या निवडणुका पाहता ठाकरे गटाने कंबर कसली असून, ठाकरे गटाच्या नेत्यांनी मेळावे, बैठका घेण्याचा धडाका लावला आहे. काही दिवसांपूर्वीच आदित्य ठाकरे हेदेखील कोकणच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनीही शाखानिहाय बैठका घेत आढावा घेतला होता. त्यामुळे कोकणात ठाकरे गटाने जोरदार तयारी केल्याचं यावरून दिसून येत आहे.

(Edited By- Ganesh Thombare)

R...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT