Sindhudurg News: लोकसभेच्या निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. या अनुषंगाने महायुतीने जोरदार तयारी सुरु केली असून राज्यभरात महायुतीचे मेळावे पार पडत आहेत. या मेळाव्याच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीची रणनीती आखण्यात येत आहे. रविवारी कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत मेळावा पार पडला. या मेळाव्याच्या माध्यमातून राणेंनी उपस्थित असलेल्या तीनही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचे कान टोचत विरोधी पक्षांनाही सुनावले.
शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादीमधील महायुती पदाधिकारी नेत्यांनी कोणावरही आपापसात टीका करू नये, तुम्हाला जर का वाईट बोलावसं वाटलं, टीका करावीशी वाटली तर उद्धव ठाकरे आहेत, शरद पवार आहेत आणि नेता नसलेला पक्ष म्हणजे काँग्रेस आहे. त्यांच्यावरती बोला, असा टोलाही केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महायुतीच्या मेळाव्यादरम्यान मार्गदर्शन करताना लगावला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
प्रत्येक पक्षाच्या पदाधिकाऱ्याने आपल्या नेत्यांना सांगा की, निवडणुकीआधी पोस्टरबाजी बॅनरबाजी करू नका. नाव जाहीर झाली की आपण पोस्टर बॅनर लावू, पण आत्ता नको ते योग्य नाही अजून नवरीचा पत्ता नाही आणि नवरा मुंडावळ्या घालून फिरतो आहे, हे योग्य नाही, असा टोला त्यांनी मित्र पक्षातील नेत्यांचं नाव न घेता लगावत मित्र पक्षांचे कान टोचले.
जो कोणी महायुतीचा उमेदवार असेल त्याचं काम करायचं आहे, आपसात तीनही पक्षात मतभेद गैरसमज होतील, असं कोणीही वागू नका, अशीही तंबी नारायण राणे यांनी या मेळाव्यात दिली. यावेळी व्यासपीठावर दीपक केसरकर, आदिती तटकरे, आमदार नितेश राणे, माजी आमदार प्रमोद जठार उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आज विश्वगुरू म्हणून जग पाहत आहे. प्रत्येक देशात आपल्या पंतप्रधानांना मान सन्मान मिळतो आहे. आज देशात त्यांनी अनेक योजना आणल्या. 80 कोटी जनतेसाठी मोफत धान्य, उज्वला गॅस, पाणी योजना, घरकुल योजना, रोजगार निर्मिती योजना अशा एकूण 54 योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केल्या आहेत. आपला देश आज जगात तिसऱ्या क्रमांकाची महासत्ता बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे, असं असतानाही विरोधक जर का पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बोलतील तर हा नारायण राणे सहन करणार नाही, असाही इशारा त्यांनी विरोधकांना दिला.
तीनही पक्षातील नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी एकमेकांची उणीदुणी कुणीही काढू नयेत, लोकसभा निवडणुका झाल्या की आपण तर मैदान घेऊ आणि बोलू, अशा मिश्किल शैलीत त्यांनी सांगितलं. कोणाच्या मनातलं सांगता येत नाही आम्हीही आमच्या मनात कोणाचा गणपती करायचा आणि कोणाचा हनुमान करायचा हे ठरवलं आहे, असेही हसत हसत नारायण राणे यांनी सांगितले.
आपल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करा, एकमेकांबद्दल चांगलं बोला. आपल्या उमेदवाराचा पराभव आपलेच लोक करतात, पण आपल्याला खासदारकीची निवडणूक जिंकायची आहे. महायुतीचा जो कोणी उमेदवार असेल त्याला निवडून आणायचं आहे. सिंधुदुर्ग रत्नागिरी, रायगड या ठिकाणीही जागा आपल्याला निवडून आणायच्या आहेत, असेही आवाहन राणे यांनी केले.
निष्ठा बाजारात विकत मिळत नाही ती दाखवावी लागते, असे सांगत काम करा आणि आपला खासदार निवडून आणा, असेही आवाहन नारायण राणे यांनी केले. तसेच व्यासपीठावर उपस्थित असलेल्या आदिती तटकरे यांचे कौतुक केलं. सुनील तटकरे व मी आम्ही दोघे मित्र आहोत. कोणत्याही पक्षात असलो तरी आम्ही मित्र आहोत. माझ्या मित्राचीच ती कन्या आहे, असं सांगत त्यांनी आधीही तटकरे यांचं कौतुक केलं.
आपण 40 वर्ष शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर होतो. बाळासाहेबांनी जेवढा शिवसैनिक म्हणून शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांनी माझ्याजवळ संवाद साधला असेल तितका कोणाजवळही नाही, अशी आठवण राणे यांनी सांगितली.
(Edited By- Ganesh Thombare)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.