Koyna Dam Water | Mumbai Water Supply | Devendra Fadnavis Sarkarnama
कोकण

Maharashtra Politics : कोयनेचे पाणी मुंबईला? कोकणातूनच विरोधाचा आगडोंब ! तटकरेंसह आमदार शेखर निकम पाठोपाठ ZP अध्यक्षांचा महायुतीला घरचा आहेर

कोयनेचे पाणी मुंबईला देण्यावरून वाद सुरू झाला असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुठलंही पाणी नेणार नाही असे स्पष्ट केलं आहे. दरम्यान यावरून आता कोकणात संघर्षाची ठिणगी पडली आहे.

Aslam Shanedivan

Raigad News : कोयना जलविद्युत प्रकल्पातून वीजनिर्मितीनंतर समुद्राकडे वाहून जाणारे ६७ टीएमसी पाणी मुंबईकडे वळवण्याच्या प्रस्तावावर राज्य सरकार अभ्यास करत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, या प्रस्तावावरून आता कोकणात राजकीय संघर्षाची ठिणगी पडली आहे. कोकणातील जनतेच्या पिण्याच्या पाण्याचा आणि स्थानिक विकासाचा प्रश्न उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शेखर निकम, खासदार सुनील तटकरे आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या रायगड जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता केंद्रे यांनी या प्रस्तावाबाबत सावध भूमिका घेत विरोध दर्शवला आहे.

कोकणात मुबलक पाऊस पडत असतानाही अनेक गावांना उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो. शेती आणि उद्योगांसाठीही पुरेसे पाणी उपलब्ध होत नाही. अशा परिस्थितीत कोकणाच्या हक्काचे पाणी मुंबईकडे वळवण्याचा निर्णय घेतल्यास स्थानिक जनतेवर अन्याय होईल, अशी भावना या लोकप्रतिनिधींनी व्यक्त केली आहे. महायुतीतील घटक पक्षांच्या नेत्यांनीच या प्रस्तावावर आक्षेप घेतल्याने सरकारसमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

मुंबईची तहान भागवण्यासाठी कोयना धरणातील पाणी वळवण्याचा विचार सुरू असताना कोकणातील जनतेच्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होता कामा नये, अशी ठाम भूमिका खासदार सुनील तटकरे यांनी मांडली आहे. मुंबईला पाणी मिळाले पाहिजे; मात्र त्यासाठी कोकणातील जनतेच्या घशाला कोरड पडता कामा नये, असे त्यांनी स्पष्ट केले. मुंबईला पाणी देण्यापूर्वी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यांची पाण्याची गरज प्राधान्याने पूर्ण करावी, अशी मागणी त्यांनी केली.

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असली, तरी कोकणातील जनतेच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. पाणीवाटपाचा आराखडा तयार करताना कोकणातील लोकसंख्या, शेती, उद्योग आणि पिण्याच्या पाण्याची गरज यांचा एकत्रित विचार झाला पाहिजे. तसेच कोकणाच्या हक्काचे पाणी सुरक्षित ठेवले पाहिजे, असा आग्रह तटकरे यांनी धरला.

दरम्यान, आमदार शेखर निकम यांनीही या प्रस्तावावरून सरकारला स्पष्ट इशारा दिला आहे. चिपळूण-गुहागर बायपास रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमानंतर बोलताना त्यांनी आधी कोकणातील जनतेची तहान भागवा, शेतीला पाणी द्या आणि स्थानिक पाणीपुरवठ्याचे प्रश्न सोडवा; त्यानंतरच अतिरिक्त पाणी मुंबईला देण्याचा विचार करा, असे म्हटले. कोयना धरणातील पाणी मुंबईला नेण्याबाबत प्राथमिक माहिती मिळाली असली, तरी या प्रस्तावाचा अधिकृत तपशील अद्याप समोर आलेला नाही. कोकणातील अनेक गावांना आजही पाण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे स्थानिक गरजांकडे दुर्लक्ष करून पाणी मुंबईकडे वळवण्याचा निर्णय घेऊ नये, असे निकम यांनी स्पष्ट केले.

कोकणातील पाणीटंचाई असलेल्या गावांपर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी पालकमंत्र्यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला आहे. तसेच सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याची जबाबदारी आयआयटीकडे सोपवण्यात आल्याची माहितीही निकम यांनी दिली. कोकणचा हा महत्त्वाचा प्रश्न आगामी विधिमंडळ अधिवेशनात ठामपणे मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शिंदेंच्या शिवसेनेच्या रायगड जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता केंद्रे यांनीही कोयनेचे पाणी मुंबईला वळवण्याच्या प्रस्तावाला ठाम विरोध दर्शवला आहे. सर्वप्रथम कोकणातील जनतेला आणि येथील उद्योगांना पाणी उपलब्ध करून द्यावे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यांचे हित महत्त्वाचे आहे. आधी कोकण पाण्याच्या बाबतीत समृद्ध झाले पाहिजे आणि त्यानंतरच कोयनेचे अवजल मुंबईला देण्याचा निर्णय घ्यावा, असे त्यांनी म्हटले.

शासनाची भूमिका पूर्णपणे चुकीची आहे, असे आपण म्हणणार नाही; मात्र कोणताही निर्णय घेण्यापूर्वी कोकणातील जनतेची तहान भागवणे गरजेचे आहे, असे केंद्रे यांनी स्पष्ट केले. कोकणातील नागरिक, शेती, स्थानिक व्यवसाय आणि मोठे उद्योग पाण्यावर अवलंबून आहेत. उन्हाळ्यात अनेक भागांत पाणीटंचाई जाणवते, तर औद्योगिक विकासासाठीही मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज आहे. त्यामुळे कोकणाच्या गरजा पूर्ण केल्याशिवाय पाणी मुंबईकडे वळवणे अन्यायकारक ठरेल, अशी भूमिका त्यांनी मांडली.

कोकणच्या हक्काच्या पाण्यासाठी वेळप्रसंगी संघर्ष करावा लागला किंवा रस्त्यावर उतरावे लागले, तरी मागे हटणार नाही, असा इशाराही अस्मिता केंद्रे यांनी दिला. सध्या कोयनेचे पाणी मुंबईला वळवण्याच्या प्रस्तावाला आपला ठाम विरोध असल्याचे सांगत त्यांनी स्थानिक जनभावना व्यक्त केली. कोकणात दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. मात्र, पाण्याचे योग्य नियोजन नसल्याने बहुतांश पाणी थेट समुद्राला जाऊन मिळते.

हे पाणी अडवून त्याचा उपयोग स्थानिक शेती, पिण्याच्या पाण्याच्या योजना, उद्योग आणि वीजनिर्मितीसाठी करणे आवश्यक आहे. नद्या, धरणे आणि बंधाऱ्यांचे शास्त्रीय पद्धतीने नियोजन केल्यास कोकणातील पाणीटंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवता येऊ शकतो, असेही केंद्रे यांनी म्हटले. दरम्यान, या प्रस्तावाला माजी सभापती शौकत मुकादम यांनीही विरोध दर्शवला आहे. कोकणातील जिल्ह्यांमधील नागरिकांची तहान भागवल्याशिवाय कोयनेचे पाणी मुंबईला नेऊ देणार नसल्याची भूमिका त्यांनी मांडली आहे.

एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोयना प्रकल्पातील वीजनिर्मितीनंतर समुद्राकडे वाहून जाणाऱ्या पाण्याबाबत सरकार अभ्यास करत असल्याचे सांगितले आहे. तर दुसरीकडे महायुतीतील राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांसह स्थानिक लोकप्रतिनिधींकडून या प्रस्तावाबाबत विरोधाची भूमिका घेतली जात आहे. त्यामुळे कोयनेच्या पाण्याच्या नियोजनाचा मुद्दा आता केवळ विकासाचा न राहता कोकणच्या हक्काचा आणि राजकीय प्रतिष्ठेचा विषय बनण्याची चिन्हे आहेत. सरकार या प्रस्तावावर अंतिम निर्णय घेताना कोकणातील पाणीटंचाई, शेती आणि उद्योगांच्या गरजांचा कसा विचार करणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT