Koyna Dam Water : मुंबई आणि महानगर परिसरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता आगामी काळात पिण्याच्या पाण्याची गरजही मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. ही संभाव्य गरज लक्षात घेऊन राज्य सरकारने मुंबईच्या पाणीपुरवठ्याबाबत दीर्घकालीन नियोजन सुरू केले आहे. याचाच एक भाग म्हणून कोयना जलविद्युत प्रकल्पातून वीजनिर्मितीनंतर बाहेर पडणारे अतिरिक्त पाणी मुंबईकडे वळवण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे. हा प्रस्ताव प्रत्यक्षात आल्यास मुंबईला दरवर्षी सुमारे ६७ टीएमसी पिण्याचे पाणी उपलब्ध होऊ शकते, अशी माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत या प्रस्तावावर चर्चा करण्यात आली. मुंबईसह महानगर क्षेत्रातील लोकसंख्या पुढील काही दशकांत आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील ५० वर्षांची पाण्याची गरज लक्षात घेऊन सध्याच्या जलस्रोतांचा अधिक प्रभावी वापर करण्यावर सरकारचा भर आहे. यासाठी कोयना जलविद्युत प्रकल्पातून मुंबईला पाणीपुरवठा करण्याचा विचार केला जात आहे.
सातारा जिल्ह्यातील कोयना धरणातून वीजनिर्मितीसाठी पाण्याचा वापर केला जातो. चिपळूण तालुक्यातील पोफळी येथील जलविद्युत प्रकल्पात वीजनिर्मिती झाल्यानंतर हे पाणी वाशिष्ठी नदीच्या पात्रात सोडले जाते. पुढे हे पाणी समुद्राला मिळते. या पाण्याचा मुंबईच्या पाणीपुरवठ्यासाठी उपयोग करता येईल का, याची चाचपणी सरकारकडून केली जात आहे.
कोयना प्रकल्पातून बाहेर पडणारे पाणी मुंबईपर्यंत पोहोचवण्यासाठी भुयारी जलवाहिन्या आणि पाइपलाइन उभारण्याचा पर्याय चर्चेत आहे. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणातील पाणी मुंबईपर्यंत आणण्यासाठी आवश्यक असणारी तांत्रिक व्यवहार्यता, खर्च आणि पायाभूत सुविधांचा अभ्यास करावा लागणार आहे.
दरम्यान, सरकारच्या या निर्णयाला सातारा आणि सांगली जिल्ह्यांतून विरोध होऊ लागला आहे. मुंबईच्या वाढत्या पाणी गरजा मान्य असल्या तरी त्यासाठी सातारा-सांगलीच्या भविष्यातील पाणीहक्कांवर गदा आणू नये, अशी मागणी नागरिक जागृती मंचाने केली आहे. या प्रस्तावाला अंतिम मंजुरी देण्यापूर्वी कृष्णा खोऱ्यातील पिण्याचे पाणी, शेती, उद्योग आणि पर्यावरणाच्या गरजांचा पुढील ५० वर्षांसाठी सविस्तर अभ्यास करावा, अशी भूमिका मंचाचे जिल्हाध्यक्ष सतीश साखळकर यांनी मांडली आहे.
कोयना धरणातील पाणीसाठा, वीजनिर्मितीसाठी वापरले जाणारे पाणी आणि समुद्राकडे वाहून जाणाऱ्या पाण्याचे नेमके प्रमाण शासनाने जाहीर करावे. तसेच प्रस्तावित ६७ टीएमसी पाण्यापैकी प्रत्यक्षात किती पाणी मुंबईकडे वळवता येईल आणि त्याचा स्थानिक पाणीवाटपावर काय परिणाम होईल, हे स्पष्ट करावे. हा अभ्यास पूर्ण होईपर्यंत सरकारने या योजनेला प्रशासकीय किंवा आर्थिक मंजुरी देऊ नये, अशी मागणी करत सतीश साखळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपालांना निवेदन दिले आहे. शिवाय आपल्या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास त्यांनी आंदोलनाचा इशाराही दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.