Uday Samant
Uday Samant Sarkarnama
कोकण

Ratnagiri News : उदय सामंतांचे डावपेच उडविणार ठाकरे गटातील नेत्यांची झोप

सरकारनामा ब्यूरो

रत्नागिरी : रत्नागिरी (Ratnagiri) तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत ग्रामीण भागात भक्कम असलेल्या ठाकरे सेनेला (Shivsena) आता बाळासाहेबांच्या शिवसेनेशी थेट चार हात करावे लागणार आहेत. पहिल्या टप्प्यातील निवडणुकीत बाळासाहेबांच्या शिवसेनेची पहिलीच निवडणूक होती. यातून बोध घेत उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) आणि उद्योजक भैय्या सामंत यांनी आखलेल्या रणनीतीमुळे ठाकरे सेनेतील प्रमुख नेते अस्वस्थ झाले आहेत. या डावपेचामुळे शिवसेनेतील अनेक नेत्यांची झोप उडणार असल्याची चर्चा आहे. (Leaders of Thackeray group Restlessness due to Uday Samanta's strategy)

पहिल्या टप्प्यात झालेल्या निवडणुकीत महत्त्वाच्या ग्रामपंचायती ठाकरे सेनेकडे गेल्या असल्या तरी तेथील सर्वांत जास्त सदस्य शिंदे सेनेकडे आहेत. सरपंचपदाच्या उमेदवारांचा थोड्या फार फरकात आणि चुकीचा उमेदवार दिल्यामुळे पराभूत झाल्याचे लक्षात आले आहे. उद्योगमंत्रीपद आल्यानंतर शिंदे गटाची तालुक्यासह जिल्ह्यात ताकद वाढली आहे.

याउलट ठाकरे सेनेचा विचार केला तर ती मुळातच तालुक्यात भक्कम असली तरी आता मात्र पदाधिकारी, कार्यकर्ते बांधून ठेवण्यासाठी पक्षाकडून विशेष प्रयत्न दिसत नाही. निष्ठावंत शिवसैनिक असला तरी पक्षाकडून अपेक्षित ताकद मिळताना दिसत नाही. त्यामुळे रत्नागिरी तालुक्याचा विचार केला तर भाजपची ताकद शिंदे गटाला मिळाली तर आगामी २९ ग्रामपंचायतीपैकी सर्वांत जास्त ग्रामपंचायती शिंदे गटाकडे जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

रत्नागिरी तालुक्यातील प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या मालगुंड ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटविरुद्ध भाजप-शिंदे गट युती, अशी चुरस आहे. ११ जागांसाठी २० उमेदवार रिंगणात असून सरपंचपदासाठी तीन उमेदवार नशीब आजमावणार आहेत. निवळी, निरूळ, वेळवंड, सत्कोंडी, बोडये, करबुडे या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. २४ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी ६४ उमेदवार तर ३५५ सदस्य निवडणूक रिंगणात आहेत.

उद्योगमंत्री उदय सामंत यांचा नुकताच दौरा झाला. या दौऱ्यामध्ये त्यांनी राजकीय रणनीती आखत अनेक ग्रामपंचायती ताब्यात घेण्याच्यादृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत. शिंदे गट आणि भाजप युती म्हणून बाळासाहेबांच्या सेनेची ताकद दुणावली आहे. यामुळे ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT