Mahad Political News : रायगड जिल्ह्यात तटकरे विरुद्ध शिवसेना असा राजकीय संघर्ष सुरू असतानाच महाड शहरासह तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा राजकीय धक्का बसला आहे. महाडचे माजी नगराध्यक्ष विलास पवार, माजी नगरसेवक सुभाष शिरशिवकर आणि आसनपोई येथील सरपंचपदाच्या संभाव्य उमेदवार प्रिया प्रशांत म्हस्के यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. पालकमंत्री भरत गोगावले आणि युवासेनेचे कोकण संघटक तथा रायगड जिल्हा परिषद सदस्य विकास गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
शिवसेना भवनासाठी विलास पवार देणार दोन गुंठे जागा
महाड शहरात आयोजित पक्षप्रवेश सोहळ्यात माजी नगराध्यक्ष विलास पवार यांनी महाडमध्ये शिवसेना भवन उभारण्यासाठी स्वतःची दोन गुंठे जागा विनामूल्य देण्याची घोषणा केली. यासंदर्भात त्यांनी पालकमंत्री भरत गोगावले यांना लेखी पत्रही दिले आहे. त्यामुळे महाड शहरात शिवसेना भवन उभारण्याच्या हालचालींना आता वेग येण्याची शक्यता आहे.
महाड शहरातील अर्जुन भोई मार्गालगत असलेल्या सुकट गल्ली येथे हे शिवसेना भवन उभारण्याचे नियोजन आहे. महाड नगरपरिषदेच्या २७ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेतील ठरावानुसार संबंधित जागा आरक्षणमुक्त करण्यात आली असल्याचा उल्लेख विलास पवार यांनी गोगावले यांना दिलेल्या पत्रात केला आहे.
शिवसेनेत प्रवेश करताना विलास पवार यांनी पालकमंत्री भरत गोगावले यांच्या माध्यमातून मतदारसंघात विकासकामांना गती मिळाल्याचे सांगितले. तसेच गोगावले हे गोरगरीब नागरिकांना मदत करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असतात, असेही त्यांनी नमूद केले.
गोगावले यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या जनसेवेच्या कार्यात आपलाही सहभाग असावा, या भावनेतून आपण शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. याच भावनेतून शिवसेना भवन उभारण्यासाठी स्वतःची दोन गुंठे जागा विनामूल्य देण्याचा निर्णय घेतल्याचेही त्यांनी सांगितले.
आसनपोईतही राष्ट्रवादीला धक्का
महाड शहरात राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसलेला असतानाच तालुक्यातील आसनपोई गावातही पक्षाला मोठा फटका बसला आहे. आसनपोई ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या संभाव्य उमेदवार प्रिया प्रशांत म्हस्के यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला आहे. म्हस्के यांनी पालकमंत्री भरत गोगावले यांच्या शिवनेरी निवासस्थानी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही शिवसेनेचा झेंडा हाती घेतला.
या पक्षप्रवेशामुळे महाड शहरासह तालुक्यात शिवसेनेची राजकीय ताकद वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच आगामी स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांची निर्मिती होण्याची चिन्हे दिसत असून, राष्ट्रवादी काँग्रेससमोरील राजकीय आव्हाने वाढण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.