Impact of Ratnagiri ZP election results on Uday Samant's career Sarkarnama
कोकण

Uday Samant : सत्तेची चाहूल लागताच बदलली भूमिका? कोकणात उदय सामंतांमुळे नव्या समीकरणांची चर्चा!

Ratnagiri ZP Election Results: नगरपालिका निवडणुकीत महायुतीतून राष्ट्रवादीला ऐनवेळी बाजूला सारले गेले होते. त्यावेळी आमदार शेखर निकम यांची मोठी तारांबळ उडाली होती.

Aslam Shanedivan

  1. नगरपालिका निवडणुकीवेळी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) साठी दरवाजे बंद असल्याची घोषणा करणाऱ्या महायुतीसमोर आता चिपळूण पंचायत समितीसाठी नव्या राजकीय समीकरणांची गरज निर्माण झाली आहे.

  2. सत्तेची गणिते जुळवण्यासाठी भाजप-शिवसेना (शिंदे गट) आणि अजित पवार गटामध्ये पुन्हा हातमिळवणी होण्याची चर्चा रंगली आहे.

  3. पालकमंत्री उदय सामंत यांच्या वक्तव्यामुळे महायुती पुन्हा एकत्र येणार का याबाबत तर्कवितर्क सुरू झाले आहेत.

Chiplun Political News: राष्ट्रवादी काँग्रेससाठी (अजित पवार गट) महायुतीचे दरवाजे कायमचे बंद असल्याची घोषणा नगरपालिका निवडणुकीवेळी करणाऱ्या भाजप-शिवसेना (शिंदे गट) युतीवर आता पुन्हा त्याच राष्ट्रवादीचा हात धरण्याची वेळ आली आहे.

चिपळूण पंचायत समितीच्या सत्तेची गणिते जुळविण्यासाठी महायुतीतील अंतर्गत हालचालींना वेग आला आहे. मांडकी-पालवण येथील कार्यक्रमावेळी महायुती पुन्हा दिसेल, असे वक्तव्य पालकमंत्री उदय सामंत यांनी केल्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

नगरपालिका निवडणुकीत महायुतीतून राष्ट्रवादीला ऐनवेळी बाजूला सारले गेले होते. त्यावेळी आमदार शेखर निकम यांची मोठी तारांबळ उडाली होती. राष्ट्रवादीला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले होते. या विजयानंतर पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतही राष्ट्रवादीला दूर ठेवण्याची घोषणा केली.

मात्र, नुकत्याच झालेल्या निवडणुकीच्या निकालाने चित्र पालटले आहे. पंचायत समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी (अजित पवार गट) गटाला सात जागा मिळाल्या असून, सर्वांत मोठा पक्ष म्हणून नोंद झाली आहे. शिवसेना (शिंदे गट) व भाजप युतीला सात जागा आणि ठाकरे शिवसेनेला चार जागा मिळाल्या आहेत.

कोणत्याही एका गटाला स्पष्ट बहुमत न मिळाल्यामुळे सत्ता स्थापनेत पेच निर्माण झाला आहे. सुरुवातीला राष्ट्रवादी आणि ठाकरे गट एकत्र येतील अशी चर्चा होती. आमदार शेखर निकम यांनी तसे सुतोवाच केले होते.

मात्र, ठाकरे शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महायुतीने पुन्हा हालचाली सुरू केल्या आहेत. ‘ज्यांच्याशी संघर्ष केला, त्यांच्याशीच हातमिळवणी’ अशी परिस्थिती आता निर्माण झाली आहे. मांडकी पालवण येथील साहित्य संमेलनादरम्यान पालकमंत्री उदय सामंत यांनी राष्ट्रवादीसोबत जाण्याचे दिलेले संकेत याच राजकीय अपरिहार्यतेचा भाग मानला जात आहे.

संगमेश्वर, रत्नागिरीत महायुती होती. चिपळूणमध्ये काही कारणांने ती झाली नसली तरी, आगामी काळात ती दिसून येईल.
- उदय सामंत, पालकमंत्री
राष्ट्रवादी काँग्रेसकडून गटनेतेपदी सूर्यकांत खेतले यांची निवड झाली आहे. सभापती निवडीचा कार्यक्रम जाहीर झालेला नाही. कोणासोबत सत्ता स्थापन करायची यावर लवकरच निर्णय घेतला जाईल.
- शेखर निकम, आमदार चिपळूण

कार्यकर्ते संभ्रमात

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका म्हणत सर्वच पक्षांच्या प्रमुखांच्या भावना कार्यकर्त्यांप्रती उफाळून आल्या होत्या. कुठेही तडजोड न करता कार्यकर्त्यांना न्याय देण्याच्या भावनेने कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवले गेले होते. कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी कार्यकर्त्यांनाच निवडणुकीच्या मैदानात उतरवणाऱ्या महायुतीतील घटक पक्ष आता सत्तेसाठी एकत्र येण्याची शक्यता आहे. आता सत्तेची गणिते कशी बांधली जातात, याकडेच साऱ्यांचे लक्ष असल्याचे दिसत आहे.

FAQs :

1. महायुती आणि अजित पवार गट पुन्हा एकत्र येणार का?
चिपळूण पंचायत समितीच्या सत्तेसाठी चर्चा सुरू असून अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.

2. कोणत्या ठिकाणच्या सत्तेसाठी ही हालचाल सुरू आहे?
चिपळूण पंचायत समितीच्या सत्तास्थापनेसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे.

3. उदय सामंत यांनी काय वक्तव्य केले?
महायुती पुन्हा दिसेल, असे संकेत त्यांनी मांडकी-पालवण येथील कार्यक्रमात दिले.

4. कोणता गट महायुतीसाठी महत्त्वाचा ठरतो आहे?
राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट सत्तेची गणिते जुळवण्यासाठी महत्त्वाचा मानला जात आहे.

5. या घडामोडींचा परिणाम काय होऊ शकतो?
स्थानिक पातळीवर नवीन राजकीय समीकरण तयार होऊन सत्तास्थापनेत बदल होऊ शकतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT