रायगडमध्ये शिंदे शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांच्यात जागावाटपावरून महायुती कोसळली आहे.
राष्ट्रवादीने भाजपशी हातमिळवणी करून शिवसेनेला बाजूला सारल्याने शिवसेना संतप्त झाली आहे.
रोहा येथे माजी उपनगराध्यक्षा शिल्पा धोत्रे यांच्या शिवसेनेत प्रवेशामुळे सुनील तटकरे यांना मोठा धक्का बसल्याची चर्चा सुरू आहे.
Raigad News : कोकणातील रायगड जिल्ह्यात सध्याच्या घडीला शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत वाद विकोपाला गेला आहे. येथे नगरपालिका आणि नगरपरिषदेच्या निवडणुकीतील जागावाटप आणि नगराध्यक्षपदाच्या दाव्यावरून महायुती तुटली आहे. राष्ट्रवादीने भाजपशी हात मिळवणी करून शिवसेनेला बाजूला सारले आहे. यामुळे शिवसेना आता इरेला पेटली आहे. यातूनच रोह्यात मंत्री भरत गोगावले यांनी राष्ट्रवादीचा नगराध्यक्षपदाचा प्रबळ दावेदार असणारा चेहराच फोडला आहे. माजी उपनगराध्यक्षा शिल्पा अशोक धोत्रे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना मोठा धक्का बसल्याची येथे चर्चा सुरू झाली आहे. हा पक्षप्रवेश रोहा येथे शिवसेना जनसंपर्क कार्यालयात झाला.
यावेळी आमदार महेंद्र दळवी, तालुका प्रमुख अॅड. मनोजकुमार शिंदे, अल्पसंख्याक तालुका प्रमुख उस्मान रोहेकर, शहरप्रमुख मंगेश रावकर, महिला शहरप्रमुख अॅड. मयूरा मोरे, संघटक प्रकाश कोळी, सुरेश महाबळे, चंद्रकांत लोखंडे आदी मान्यवर व असंख्य शिवसैनि उपस्थित होते.
रोहा अष्टमी नगरपालिका निवडणुकीसाठी जोरदार मोर्चे बांधणी केली जात असून राष्ट्रवादी विरूद्ध शिंदेंची शिवसेना अशी येथे थेट लढत होण्याची शक्यता आहे. अशातच माजी उपनगराध्यक्षा शिल्पा अशोक धोत्रे यांचे नाव नगराध्यक्षपदासाठी चर्चेत असतानाही त्यांचे नाव डावलण्यात आले आहे. यामुळे धोत्रे दाम्पत्याने बंडाचा झेंडा हाती घेत थेट शिवसेनेत प्रवेश केला आहे.
यानंतरच शिल्पा धोत्रे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अशोक धोत्रे यांच्यासमवेत असंख्य कार्यकर्त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या वेळी माजी नगराध्यक्ष लालता प्रसाद कुशवाह, भाजपाचे माजी उपसभापती नितीन तेंडूलकर यांच्यासमवेत शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना (शिंदे गटात) जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे नगरपालिकेच्या ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा हदरा बसला आहे.
यानंतर गोगावले यांनी, धोत्रे दाम्पत्याने शिवसेनेत प्रवेश करून मोठा निर्णय घेतला असून हा निर्णय आपल्या विजयाची नांदी आहे. त्यांनी पक्ष सोडू नये म्हणून त्यांना अनेकांकडून दबाव आणि प्रलोभन दाखवण्यात आली. मात्र या कुटुंबीयांनी शब्दावर कायम राहून शिंदे गटात प्रवेश केला. यामुळे धोत्रे दाम्पत्याबरोबरच शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शिल्पा धोत्रे यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे राहणार आहोत. त्यांना आणि नगरसेवक पदाच्या सर्व उमेदवारांना नगरपालिकेत बहुमताने निवडून देणार, असल्याची ग्वाही गोगावले यांनी दिलीय.
गोगावले यांनी टीकेची झोड उठवणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना, चांगले कार्यकर्ते पक्ष सोडून जात असल्याने त्यांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे, असा सल्ला दिला आहे. तसेच येथील राष्ट्रवादीची मक्तेदारी चालू देणार नाही, ती मोडून काढू असाही इशाराही गोगावले यांनी तटकरे यांना दिला आहे.
दरम्यान आज शेवटच्या दिवशी शिल्पा धोत्रे यांच्यासह शिवसेनेचे उमेदवारी आपला अर्ज दाखल करणार आहेत. या सर्व उमेदवारांच्या मागे सर्व ताकदीनिशी उभे राहू, लढाई करून प्रचंड मतांनी निवडून आणू असाही दावा मंत्री भरत गोगावले यांनी केला. तसेच आगामी निवडणुकांमध्ये पक्ष ताकदीने उतरणार असल्याचे संकेत देखील गोगावले यांनी दिले आहेत.
FAQs :
1) रायगडमध्ये महायुती कशी तुटली?
जागावाटप आणि नगराध्यक्षपदाच्या दाव्यावरून राष्ट्रवादी आणि शिवसेनेत तीव्र मतभेद झाले.
2) राष्ट्रवादीने भाजपशी हातमिळवणी का केली?
स्थानिक पातळीवर मजबूत उमेदवाराला पाठबळ देण्यासाठी आणि सत्ता समीकरणे मजबूत करण्यासाठी.
3) शिल्पा धोत्रे यांच्या प्रवेशाचे महत्त्व काय?
त्या राष्ट्रवादीच्या संभाव्य नगराध्यक्षपदाच्या दावेदार मानल्या जात होत्या. त्यांच्या जाण्याने तटकरे गटाला मोठा धक्का बसला.
4) शिवसेना या घडामोडीवर कशी प्रतिक्रिया देत आहे?
शिवसेना इरेला पेटली असून रोह्यात आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे.
5) रत्नागिरी-रायगड भागातील भविष्यातील राजकारणावर याचा परिणाम होईल का?
होय, महायुतीतील फूट आणि निष्ठावंत नेत्यांचे बदलते भूमिका आगामी निवडणुकांवर प्रभाव टाकतील.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.