Vaibhav Naik Sarkarnama
कोकण

ठाकरे गटाच्या नेत्याची पत्नी आणि भावासह साडेपाच तास एसीबीकडून चौकशी

माझ्यासह माझ्या कुटुंबाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून आलेली नोटीस म्हणजे हे भाजपचेच षडयंत्र आहे.

सरकारनामा ब्यूरो

रत्नागिरी : माझ्यासह माझ्या कुटुंबाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (ACB) आलेली नोटीस म्हणजे हे भाजपचेच (BJP) षडयंत्र आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांचा त्यामागे हात आहे, असा गंभीर आरोप शिवसेना आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांनी केला आहे. तब्बल साडेपाच तासाच्या चौकशीनंतर वैभव नाईक रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना हा आरोप केला. (MLA Vaibhav Naik questioned by ACB for five and a half hours)

कोकणातील राजकीय संघर्ष शिगेला पोहोचण्याची शक्यता आहे. यापूर्वी मालवणचे आमदार वैभव नाईक यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नोटीस बजावली होती. उत्पन्नाचे स्त्रोत व नावे असलेल्या मालमत्ता यांचे पुरावे सादर करण्याबाबत आदेश बजावण्यात आले होते. नाईक यांच्यापाठोपाठ राजापूरचे आमदार राजन साळवी यांना रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अशाच प्रकारची नोटीस बजावली. त्यामुळे रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय संघर्ष शिगेला पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

शासकीय विश्रामगृहात दाखल झालेले वैभव नाईक यांची आमदार राजन साळवी यांनी भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला. तसेच आमदार नाईक यांना घेऊन स्वतः राजन साळवी रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात पोहोचले. आमदार वैभव नाईक हे चौकशीकरिता आज सकाळी रत्नागिरीत दाखल झाले. सुरवातीला ते शासकीय विश्रामगृहात पोहोचले व तेथून ते थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात दाखल झाले. दुपारी साडेबारा ते सायंकाळी साडेपाच अशी साडेपाच तास चौकशी आमदार वैभव नाईक यांची झाली. केवळ आमदार वैभव नाईक यांचीच नव्हे तर त्यांच्या पत्नीसह भावाचीदेखील चौकशी एसीबीच्या कार्यालयात झाली. सर्वांच्या उत्पन्नाचे स्त्रोत याबाबत माहिती विचारण्यात आली.

चौकशी आटोपल्यानंतर आमदार वैभव नाईक यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, हे भाजपचे षडयंत्र असून यामागे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचाच हात आहे. मात्र मी याला बळी पडणार नाही. राज्याच्या सत्तासंघर्षात फोडाफोडीचे राजकारण सुरू झाले आहे; मात्र आम्ही ठामपणे उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभे आहोत. त्यातूनच अशा खुरापती सुरू झाल्या असून कुठल्याही दबावाला हा वैभव नाईक बळी पडणार नाही, असे परखड मत त्यांनी व्यक्त केले. चौकशीवेळी आम्ही 1996 पासूनचे पुरावे अधिकार्‍यांना दिले आहेत. उत्पन्नाच्या स्त्रोतासह वडिलोपार्जित मालमत्तांची माहितीदेखील दिली.

‘कितीही चौकशी होऊ दे, आम्ही त्याला भीत नाही’

माझ्यापाठोपाठ राजापूरचे आमदार राजन साळवी यांनादेखील रायगड एसीबीची नोटीस आली आहे. आपल्या हाती काही लागले नाही; म्हणून अशाप्रकारच्या नोटीस पाठवून भाजप दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे. अशा कितीही चौकशी होऊ दे, आम्ही त्याला भीत नाही. आम्ही बाळासाहेबांचे सैनिक आहोत. त्यामुळे एसीबीच्या चौकशीला मी सामोरे जाणार आणि माझ्याकडून जे काही सहकार्य हवे आहे ते सहकार्य मी अधिकाऱ्यांना करणार, असे वैभव नाईक यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT