मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी समृद्धी महामार्गाची (Samruddhi Highway) केलेली पाहणी चर्चेत आली आहे. कारण, शिंदे आणि फडणवीस यांनी ज्या गाडीतून समृद्धी महामार्गावरून फेरफटका मारला, ती मोटार फडणवीस यांच्या नागपूरमधील (Nagpur) निकटवर्तीय बिल्डरची (builder) असल्याचे पुढे आले आहे. विशेष म्हणजे त्या गाडीची किंमत दोन कोटी असल्याचेही सांगितले जात आहे. त्यामुळे दोन कोटींच्या गाडीतून करण्यात आलेली शिंदे-फडणवीसांची समृद्धी महामार्गावरील सफर गाजण्याची चिन्हे आहेत. (Shinde-Fadnavis inspected Samruddhi Highway in a builder's car worth two crores in Nagpur)
समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचे येत्या ११ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. तत्पूर्वी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी रविवारी (ता. ४ डिसेंबर) समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या रस्त्याची पाहणी केली. विशेष म्हणजे शिंदे-फडणवीस यांनी अवघ्या पाच तासांत ५२० किलोमीटर अंतर पार केले. सुरुवातीला उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सारथ्याची भूमिका निभावली, त्यानंतर खुद्द मुख्यमंत्र्यांनीही समृद्धी महामार्गावरून गाडी चालविण्याचा आनंद घेतला.
दरम्यान, मित्र संघटनेच्या उपाध्यक्षपदी अजय अश्रर या बिल्डरची नियुक्ती मुख्यमंत्री शिंदे यांनी केली होती. त्यावर होणारी टिका संपते न संपते तोच फडणवीस यांनी वापरलेल्या बिल्डरच्या गाडीची चर्चा सुरू झाली आहे. या गाडी वापरण्यावरून काँग्रेसने भाजपवर विशेषतः फडणवीसांवर निशाणा साधला आहे.
सृमद्धी महामार्गावरून प्रवास करण्यासाठी शिंदे-फडणवीस यांनी जी अलिशान गाडी वापरली. ती गाडी कुकरेजा इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या नावावर आहे. ही कुकरेजा इन्फ्रास्ट्रक्चर ही कंपनी देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय बिल्डरची आहे. नागपूरचे प्रख्यात बिल्डर आणि नागपूर महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांची ती अलिशान दोन कोटींची गाडी आहे. त्या दोन कोटींच्या गाडीतून शिंदे आणि फडणवीस यांनी समृद्धी महामार्गावरून सफर केली आहे.
सुरक्षेच्या कारणास्तव शिंदे-फडणवीस यांनी खासगी गाडीतून प्रवास केला असावा. पण, शासकीय गाड्या तेवढ्या क्षमतेच्या नाहीत का, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होते. पुढील काळात तरी प्रशासकीय ताफ्यात तेवढ्या वेगाने आणि सुरक्षितता देणाऱ्या गाड्या उपलब्ध हेातील का, हाही मुद्दा आहे. तसेच, हा रस्ता वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर सर्वसामान्यांनाही तेवढ्याच वेगाने गाड्या चालवाव्या लागणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.