MNS on Shaktipeeth Highway sarkarnama
कोकण

Shaktipeeth Highway : शक्तिपीठासाठी 'रात्रीचा खेळ चाले', मनसेचा हल्लाबोल; विरोध करण्याचा निर्धार

MNS on Shaktipeeth Highway : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रिम प्रोजेक्ट असणाऱ्या शक्तिपीठ महामार्गास राज्यभर विरोध होत आहे. आता कोकणातही या महामार्गाला विरोध सुरू झाला आहे.

Aslam Shanedivan

Sindhudurg News : वर्ध्यावरून निघणारा आणि गोव्यातील पत्रादेवीपर्यंत जाणाऱ्या 'नागपूर-गोवा महामार्ग' म्हणजेच शक्तीपीठ महामार्गाला राज्यभर विरोध होत आहे. या महामार्गात राज्यातील 27 हजार हेक्टर जमिनी अधिग्रहित होणार असल्याने पिकाऊ जमिनी जाणार आहेत. यामुळे राज्यभरातून लाखो शेतकऱ्यांचा याला विरोध असतानाही तो रेटला जातोय. आता या महामार्गाला कोकणात देखील विरोध होत असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं देखील विरोध केला आहे. तर मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या 18 वर्षांपासून रखडलेलं असताना, तो न करता शक्तिपीठ महामार्ग रेटला जातोय असा आरोप जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर यांनी केला आहे.

नव्याने प्रस्तावित नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गावर राज्यभर विरोध होत असतानाही तो सरकार रेटत आहे. शेतकऱ्यांच्या हजारो हेक्टर जमिनी यात जाणार असल्याने ते आक्रोश करत असतानाही तो रेटण्याचा सरकारचा अट्टाहास का? असा सवालही केसरकर यांनी उपस्थित केला आहे. तसेच त्यांनी यावेळी महामार्गामुळे पर्यावरणाची मोठी हानी होणार असल्याचा दावा करताना स्थानिक जनतेचा महामार्गाला तीव्र विरोध असल्याचेही म्हटलं आहे.

वर्ध्यावरून निघणारा आणि गोव्यातील पत्रादेवीपर्यंत जाणाऱ्या 805 किलोमीटर लांबीच्या या महामार्गात 12 जिल्ह्यातील जमीन जाणार आहे. तर या महमार्गाने तीन शक्तिपीठे आणि दत्तगुरूंची धार्मिक स्थळे जोडणार असल्याचे सरकार सांगत आहे. पण सरकारच्या या फक्त भूलथापा असून या महामार्गामुळे परिसराचा कोणताच विकास होणार नाही, असं मनसेच्या केसरकर यांनी म्हटलं आहे.

पण सरकार विकास होईल असे आकर्षक आमिष दाखवत असून प्रत्यक्षात शेतकऱ्यांचे आणि पर्यावरणाचे मोठे नुकसान होणार असल्याचा दावाही मनसेच्या केसरकर यांनी केला आहे. ज्या गावांमधून हा महामार्ग जाणार आहे, ती सर्व गावे इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये आहेत. गेळे, आंबोली, पारपोली, वेर्ले, उडेली, फणसवडे, घारपी, फुकेरी, तांबोळी, डेगवे, बांदा या भागात मोठ्या प्रमाणात निसर्गसंपदा नष्ट केली जाणार असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.

तर मोठ्या प्रमाणात होणारी जंगलतोडीमुळे पर्यावरणाचा समतोल तर बिघडणार आहेच. त्याचबरोबर जंगली प्राण्यांकडून मानवी वस्तीतील नुकसानही वाढेल, अशीही भीती केसरकर यांनी व्यक्त केली. तर मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम अठरा वर्षे होऊनही पूर्ण झालेले नाही. वारंवार आश्वासने देऊनही हा मार्ग मार्गी लागलेला नाही.

मात्र केवळ कोट्यवधी रुपयांचा मलिदा लाटण्याबरोबरच कंत्राटे मिळवण्यासाठी सत्ताधारी आमदार आणि मंत्र्यांनी हा महामार्ग जनतेच्या माथी मारला आहे. पण याविरोधात येथील सत्ताधारी आमदार आणि मंत्री मूग गिळून गप्प बसले आहेत असाही आरोप त्यांनी केला आहे. तर जनतेचा विरोध डावलून हा प्रकल्प रेटण्याचा प्रयत्न केल्यास मनसे स्टाईलने आंदोलन करू असाही इशारा केसरकर यांनी दिला आहे.

रात्रीच्या वेळी ‘मार्किंग’

दरम्यान यावेळी केसरकर यांनी शक्तिपीठ महामार्गासाठी जनतेला अंधारात ठेवून जमिनीचे संपादनाचे केलं जात आहे. खासगी कंपन्यांमार्फत रात्रीच्या वेळी मार्किंग करण्याचे काम सुरू असल्याचा दावाही केसरकर यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT