
Sindhudurg /Sawantwadi News : राज्यात महायुतीचे सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होताच 'शक्तिपीठ' महामार्गाची घोषणा करण्यात आली. पण हा सहापदरी शक्तीपीठ महामार्ग कोणतीच मागणी नसताना शेकऱ्यांच्या माथ्यावर मारण्याचा घाट राज्यातील महायुती सरकारने घातलेला आहे. याला राज्यभर विरोध होत असतानाही याचा सर्वे आणि नीसांची उभारणी सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विविध भागात केली जातेय. तर बेसुमार वृक्षतोड होणार असल्याने याविरोधात आता आवाज उठवला जात आहे. बांद्यातदेखील एका महिला सरपंचाने मोजणीच बंद पाडली. यामुळे सध्या याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
सावंतवाडीत या महामार्गाचा सर्व्हे तालुक्यात सुरू झाला असून जमीन अधिग्रहणासाठी नीस लावले आहेत. कंत्राटदार आणि सत्ताधारी राजकीय पुढाऱ्यांचे उखळ पांढरे करणारा हा महामार्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी घातक ठरणार असल्याचा आरोप ठाकरे शिवसेनेचे प्रवक्ते डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी केला आहे.
डॉ. परुळेकर यांनी, शक्तिपीठ महामार्ग हा गेळे, आंबोली, पारपोली, वेर्ले, नेनेवाडी, उडेली, फणसवडे, घारपी, फुकेरी, तांबोळी, डेगवे, बांदा अशा बारा गावांतून जाणार आहे. यापैकी बहुतेक गावे ही ईकोसेन्सिटीव्ह जाहीर करावीत, असे उच्च न्यायालयाचे आदेश आहेत. तसेच हा वाईल्ड लाईफ कॉरिडॉरचा अविभाज्य भाग आहे. असे असतानाही शंभर मीटर रूंदीच्या या महामार्गासाठी लाखो वृक्ष तोडले जाणार आहेत. आधीच वृक्षतोड बंदी असताना या पट्ट्यात बेसुमार वृक्षतोड सुरू आहे. त्यात या महामार्गासाठी होणारी वृक्षतोड या गोष्टी जैवविविध निसर्गासाठी मृत्यूची घंटा ठरणारी असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
सह्याद्री पट्ट्यातील आणि पायथ्याशी असलेल्या या गावांमध्येच नाही तर आजूबाजूच्या अनेक गावांमध्ये पिण्याच्या आणि शेती बागायतीच्या पाण्याचे स्त्रोत बंद होऊन मोठीच समस्या भविष्यात निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. एवढ्या मोठ्या वृक्षतोडीमुळे आज हत्ती, गवेरेडे, माकडे, सांबर यांचा जो त्रास शेतकऱ्यांना होत आहे, तो कित्येक पटीने वाढणार असल्याचा दावा देखील डॉ. परुळेकर यांनी केला आहे.
सध्या हत्ती आणि गवेरेड्यांचे हल्ले होऊन अनेक शेतकऱ्यांचे नाहक बळी गेल्याचे समोर येत आहे. पुढे देखील असे बळी जाण्याची शक्यता आहे. सामान्य जनतेला नको असलेला 86 हजार कोटी रूपयांची जनतेच्या पैशाची लूट करून मुठभर मोठे कंत्राटदार आणि सत्ताधारी राजकीय पुढाऱ्यांचे उखळ पांढरे करणारा हा महामार्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी घातक ठरणारा असल्याचा आरोप देखील परुळेकर यांनी केला आहे.
दरम्यान स्थानिक प्रशासनाला कोणतीही पूर्व कल्पना न देता शक्तिपीठ महामार्गासाठी शहरात करण्यात येणारी जमीन मोजणी सरपंच प्रियांका नाईक यांनी बंद पाडली. महामार्गजवळ भूमिअभिलेखचे काही अधिकारी व कर्मचारी जमिनीची मोजणी करत असल्याची माहिती सरपंच नाईक, माजी उपसरपंच राजाराम ऊर्फ बाळू सावंत, माजी सरपंच मंदार कल्याणकर यांना मिळाली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी ही जमीन मोजणी शक्तिपीठ महामार्गासाठी होत असल्याची माहिती दिली. पण त्यांच्याकडे लेखी पत्राची मागणी करतानाच ग्रामपंचायतीशी कोणताच पत्र व्यवहार झाला नसल्याचे समोर आले.
यामुळे स्थानिकांना विश्वासात न घेताच होणारी जमीन मोजणी सरपंच नाईक आणि इतर सदस्यांनी बंद पाडली. यानंतर सायंकाळी उशिरा भूमिअभिलेखचे अधिकारी जमीन मोजणीबाबतचे लेखी पत्र ग्रामपंचायतीला दिले. पण आता सरपंच श्रीमती नाईक याबाबत पत्रकार परिषद घेऊन आपली भूमीका मांडणार असल्याचे आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.