Navi Mumbai Municipal Election : नवी मुंबई महापालिका निवडणूकीत महायुतीच्या चर्चा फोल ठरल्यानंतर भाजपमध्ये अभूतपूर्व गोंधळ झाला. बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांना मान्य केलेल्या 13 जागांचे जिल्हाध्यक्षांच्या स्वाक्षरी नसलेले एबी फॉर्म देऊन फसवणूक केल्याचा आरोप म्हात्रे यांनी केला. वनमंत्री गणेश नाईक, आणि त्यांचे पुत्र नवी मुंबईचे निवडणूक प्रभारी डॉ. संजीव नाईक यांनी जाणून-बुजून जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश पाटील यांना गायब केले असल्याचा आरोपही म्हात्रे यांनी केला. अशा परिस्थितीत नाईकांनी महापालिकेच्या 111 जागा जिंकून आणून दाखवावे असे आव्हान म्हात्रे यांनी नाईकांना दिले.
नवी मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेसोबत चर्चा सुरु असताना मंदा म्हात्रे यांनी आपले गणेश नाईकांसोबत असणारे राजकीय वैर संपले असे सांगून वादावर तोडगा काढला होता. भाजपतर्फे नवी मुंबई महापालिकेवर प्रभारी म्हणून डॉ. संजीव नाईक यांना जबाबदारी दिली आहे. संजीव नाईक यांच्यासोबत म्हात्रे यांची रोज जागा वाटपांबाबत चर्चा सुरु होती. काल झालेल्या चर्चेनंतर म्हात्रे यांना 13 जागा देणार असल्याचे आश्वासन संजीव नाईक यांनी दिले होते. त्यासाठी म्हात्रे यांना 13 जागांकरीता एबी फॉर्म देण्यात आले होते.
आज सकाळी भाजपची शिवसेनेसोबत युतीची बोलणी काय होते हे बघून जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश पाटील स्वाक्षरी करणार होते. मात्र सकाळपर्यंत म्हात्रेंचा पाटील यांच्यासोबत संपर्क न झाल्यामुळे त्यांनी सकाळी पाटील यांच्या घरी आणि कार्यालयात जाऊन पाटील यांचा शोध घेऊन आल्या. दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची वेळ होती. दुपारपर्यंत जिल्हाध्यक्षांचा संपर्क न झाल्यामुळे म्हात्रे यांच्या बेलापूर येथील निवासस्थानी म्हात्रे समर्थकांनी गर्दी केली.
उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ निघून गेल्यानंतर राजेश पाटील म्हात्रेंच्या निवासस्थानी दाखल झाले. यावेळी आपल्याला वरिष्ठांनी 13 जणांच्या नावाची यादी दिली नसल्याने आपण एबी फॉर्मवर स्वाक्षरी न केल्याचे म्हात्रे यांना सांगितले. अखेर संतापलेल्या म्हात्रे यांनी प्रसिद्धी माध्यमांवर पक्षाचे प्रमाणिक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे नाईक कुटूंबियांनी फसवणूक केल्याचे टीकास्त्र केले.
म्हात्रे यांनी त्यांचा मुलगा माजी नगरसेवक निलेश म्हात्रे यालाही उमेदवारी मागितली होती. मात्र आपल्या 13 कार्यकर्त्यांना स्वाक्षरी नसलेले एबी फॉर्म देऊन फसवणूक केल्यामुळे म्हात्रे यांचा मुलगा निलेश म्हात्रे यानेही उमेदवारी अर्ज भरला नाही. मंदा म्हात्रे यांनी नाईक आणि पाटील यांच्यावर केलेल्या आरोपप्रकरणी संजीव नाईक यांच्यासोबत संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
याबाबत आमदार मंदा म्हात्रे म्हणाल्या "राजेश पाटील यांनी स्वतः हे फॉर्म आणून दिले. उद्या सकाळी सही करतो, असं देखील त्यांनी सांगितले होते.पण जाणीवपूर्वक माझ्याबरोबर खेळी करत गद्दारी केली, असे म्हणत गणेश नाईक काय चीज आहे, हे मी 35 वर्षे पासून ओळखते, असा घणाघात म्हात्रे यांनी केला.
'राष्ट्रवादी पार्टी त्यांना कोरे फॉर्म द्यायचे, नंतर ते भरले जायचे, ते काय चीज आहेत, हे मला माहीत आहे. हे सर्व काही मला नवीन नाही. पण कार्यकर्त्यांना दुखवण्याचा यांना कोणी अधिकार दिला. काल-परवा आलेल्यांना पक्षातून उमेदवारी दिली गेली आहे. माझ्या मतदारसंघातील काही कार्यकर्त्यांनी, जीव तोडीत काम केलेलं आहे आणि त्यांनाच उमेदवारी डावलत, कोणती मर्दानगी गाजवता,' असा सवाल करत मंदा म्हात्रे यांनी संताप केला.
तुम्ही मर्द आहात ना, तर नवी मुंबई महापालिकेमध्ये 111 उमेदवार निवडून आणा, मग मी मानेल की तुम्ही खरे मर्द आहात. 2 हजार कोटींची माझी कामे चालू आहे. तिथं तुम्ही उमेदवार देऊन काय साध्य करत आहात आणि माझ्याच नावावर तिथं उमेदवार देत आहात. चॅलेंज देते की, आणा 111 जागा निवडून, आम्ही भाजपबरोबर आहोत, आम्ही काही गद्दार करणार नाही. चॅलेंज आहे की, यांनी 111 उमेदवार निवडून आणावेत, मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देईल, असं आव्हान आमदार म्हात्रे यांनी दिलं.
'यांचा जिल्हाध्यक्ष तुतारीत जातो, फोन करून सांगायचं की माझ्या भावाला मत द्या, रात्री फोन करून सांगायचं याचं काम करा, दुबई-पाकिस्तानमधून आम्हाला धमक्यांचे फोन आणायचे हे काम काही आमच्या बापाने नाही केले. हे काय आहेत हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहेत. यांना फॅमिली शिवाय कोणीच दिसत नाही. यांच्या फॅमिलीमध्ये 5 नगरसेवक करायचे आहेत. 3 आहेत, आणखी 2 वाढवणार आहेत. भावाच्या मुलीचं तिकीट मुद्दाम कापलं. वैशाली नाईक हिचं तिकीट मुद्दाम कापलं, ती विधवा आहे, एकटी आहे म्हणून असा प्रकार केला,' असा गंभीर आरोप मंदा म्हात्रे यांनी केला.
प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी एकच जागा सांगितली :
नवी मुंबईत भाजप आणि शिवसेना युतीबाबत सुरु असलेल्या चर्चेचा आढावा घेण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी वनमंत्री गणेश नाईक यांची नवी मुंबईत येऊन भेट घेतली होती. या भेटीदरम्यान जागा वाटपांची चर्चा झाली असे सांगण्यात येत आहे. परंतू चव्हाण यांनी फक्त माजी नगरसेवक दिपक पवार याची उमेदवारीबाबत चर्चा करुन इतर निर्णय सोयीनुसार घेण्याचे सांगितल्याची चर्चा बंडखोरांकडून सुरु आहे. याबाबत चव्हाण यांच्याशी संपर्क केला असता झाला नाही.
नवी मुंबईचे भाजपचे जिल्हाध्यक्ष, राजेश पाटील म्हणाले, भाजपमध्ये निवडणूकीकरीता प्रभारी म्हणून डॉ. संजीव नाईक आणि निरीक्षक म्हणून वनमंत्री गणेश नाईक यांची नियुक्ती केली आहे. यांच्यामार्फत येणाऱ्या यादीत ज्या उमेदवारांची नावांचा समावेश आहे. त्याच उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात येतील. मात्र आमदार मंदा म्हात्रे यांना नाईक यांच्या क्रिस्टल हाऊसवर यायला जमणार नाहीत. म्हणून त्यांना मंजूर केलेल्या १३ उमेदवारांच्या नावांची एबी फॉर्म त्यांना देऊ केले होते. परंतू यादीमध्ये नाव नसल्याने त्यावर मला स्वाक्षरी करता आली नाही. यात माझी काही चूक अथवा फसवणूक केल्यासारखे नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.