Mumbai News : उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी पक्षाची सूत्रे हाती घेतली. तसेच त्यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नियुक्ती देखील करण्यात आली. पण आता या अध्यक्षपदाच्या निवडीवरून नवा वाद सुरू झाला असून पक्षाचे राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी कायदेशीर नोटीस पाठवली आहे. यामुळे पक्षात मोठी खळबळ उडाली असून पक्षातील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा उघडपणे समोर आले आहेत. या मुद्द्यावर आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली असून त्यांनी या नोटीसमध्ये तथ्य नसल्याचे म्हटले आहे. तसेच राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीसाठी बोलावलेली बैठक नियमानुसारच होती, असाही दावा केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षपदालाच पक्षाचे राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी आव्हान दिले. तसेच सुनेत्रा पवार यांच्या निवडीविरोधात कायदेशीर नोटीस बजावत ही निवड बेकायदेशीर असून राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा घेण्याची मागणी केली आहे. दरम्यान, आता या मागणीसह पाठवलेल्या नोटीसमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे.
या सर्व घडामोडींवर आता सुनील तटकरे यांनीही प्रतिक्रिया दिली असून त्यांच्या विधानाची आता राज्यभर चर्चा सुरू झाली आहे. तटकरे यांनी, या नोटीसमध्ये तथ्य नसल्याचे म्हणत राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीसाठी घेतलेली बैठक नियमानुसारच होती, असे सांगितले. तसेच आलेल्या नोटीसबाबत कायदेशीर सल्ला घेऊन, संपूर्ण माहिती आल्यानंतर पुढील कारवाई करू, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
तसेच याबाबत स्पष्टीकरण देताना आपला आणि राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांचा कोणताही संवाद झालेला नसून, तो दिल्लीत जर कोणाशी झाला असेल तर ते देखील आपल्याला माहिती नसल्याचे तटकरे यांनी म्हटले आहे. या नोटीसमध्ये कोणतेही तथ्य नसून तिची कायदेशीर वैधता तपासावी लागेल, असेही त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, पक्षातील वरिष्ठ नेते तसेच पदाधिकाऱ्यांनी एकत्रित बसून राष्ट्रीय अध्यक्षांची निवड केली आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंघपणे काम करत आहे. पक्ष लोकशाही मार्गाने काम करत असून कोणाबद्दलही प्रश्न उपस्थित करण्याचे कोणतेही कारण नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
याचवेळी तटकरे यांनी राज्याच्या अर्थमंत्रिपदावरही भाष्य करत ते कधी मिळणार याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. राष्ट्रवादीला अर्थमंत्रिपद कधी मिळणार, असा सवाल पत्रकारांनी त्यांना विचारला असता ते म्हणाले की, अर्थमंत्रिपद राष्ट्रवादीच्या वाट्याला आले असून सध्या त्याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. मात्र, ते खाते आम्हाला मिळावे, अशी आमची मागणी आहे. यासाठी आम्ही लवकरच फडणवीस यांची भेट घेणार आहोत. हा प्रश्नही लवकरच मार्गी लागेल, असेही त्यांनी म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.