

Pune News : भोर तालुक्यातील बहुचर्चित उत्रोली–वडगाव एमआयडीसी प्रकल्प पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीदरम्यान भोरकरांना दिलेला एमआयडीसीचा शब्द पूर्ण करण्यासाठी आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या उपमुख्यमंत्री सुनित्रा पवार यांनी पुढाकार घेतला आहे. विधानभवनात या प्रकल्पाचा सविस्तर आढावा घेत संबंधित प्रशासनाला आवश्यक सूचना दिल्या आहेत.
भोरमध्ये एमआयडीसी उभारण्याबाबत अनेक वर्षांपासून चर्चा सुरू असली तरी अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नव्हता. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, "भोरकरांनी आपल्या विचारांचा आमदार निवडून दिल्यास एमआयडीसीचा विषय तातडीने मार्गी लावू," असा शब्द दिली होती.
त्यानंतर अनेक वर्षे थोपटे कुटुंबाचे वर्चस्व असलेल्या भोर मतदारसंघात राजकीय परिवर्तन झाले. काँग्रेसचे संग्राम थोपटे यांचा पराभव करत राष्ट्रवादी काँग्रेसचे शंकर मांडेकर आमदार झाले. त्यामुळे एमआयडीसी प्रकल्पाला गती मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली होती. मात्र, अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर हा विषय काहीसा मागे पडला.
आता सुनित्रा पवार यांनी स्वतः या प्रकल्पात लक्ष घालत विधानभवनात आढावा बैठक घेतली. भोरसारख्या डोंगरी आणि दुर्गम भागातील युवकांना स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी उत्रोली–वडगाव एमआयडीसी प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा असल्याचे त्यांनी बैठकीत नमूद केले. या प्रकल्पामुळे उद्योगांना चालना मिळून भोरच्या आर्थिक विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
मात्र, प्रकल्प राबविताना शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे स्पष्ट निर्देश सुनित्रा पवार यांनी अधिकाऱ्यांना दिले. शेतकऱ्यांशी विश्वासपूर्वक संवाद साधावा, त्यांच्या शंकांचे निरसन करावे, प्रभावी जनजागृती करावी आणि जमिनीला योग्य मोबदला मिळेल याची पूर्ण खबरदारी घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी संबंधित यंत्रणांना केल्या.
आमदार शंकर मांडेकर, भोरचे नगराध्यक्ष आवारे, वरिष्ठ अधिकारी आणि संबंधित विभागांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत उत्रोली–वडगाव एमआयडीसी प्रकल्प तातडीने मार्गी लावण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यामुळे अनेक वर्षांपासून रखडलेल्या या प्रकल्पाला आता प्रत्यक्ष गती मिळते का, याकडे भोर तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.