Bhaskar Jadhav
Bhaskar Jadhav Sarkarnama
कोकण

Bhaskar Jadhav News : भास्कर जाधवांची सोडतीन वर्षांनंतर जाहीर कबुली : राष्ट्रवादी काँग्रेस सोडायला नको होती...

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : मी शिवसेना सोडेन, असं कधी वाटलं नव्हतं. पण, मला ती सोडावी लागली. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मी सोडायला नको होता. मी ते आजही कबूल करतो आणि उद्याही कबूल करेन. राष्ट्रवादी काँग्रेस सोडण्याचं कोणतेही ठोस कारण नव्हते, असे आजही मला वाटते, अशी कबुली माजी मंत्री भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी तब्बल साडेतीन वर्षांनंतर जाहीरपणे दिली. (NCP should not have left the party : Bhaskar Jadhav)

भास्कर जाधव यांना राष्ट्रवादी काँग्रेसने प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री केले होते, त्यानंतर मागील २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी राष्ट्रवादीची साथ सोडून शिवबंधन हाती बांधले होते. त्यानंतर साडेतीन वर्षांनंतर त्यांनी राष्ट्रवादी सोडण्याबाबत भाष्य केले आहे.

जाधव म्हणाले की, पक्षांतराच्या घटना या वाईटच आहेत. मी शिवसेना सोडेल, असं कधी वाटलं नव्हतं. पण, नियतीच्या पुढे आपल्याला झुकावं लागतं, त्या प्रमाणे त्यावेळी मला शिवसेना सोडावी लागली आणि मी ती सोडली. पण, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मी सोडायला नको होता. मी ते आजही कबूल करतो आणि उद्याही कबूल करेन. मला खोटं बोलायला अजिबात आवडत नाही. या पक्षातून त्या पक्षात जाणे कदापि चांगले नाही, हे मी मान्य करतो. पण कधी कधी नियतीच्या पुढे तुम्ही हतबल असता, त्यामुळे माझ्याही वाट्याला ते आले, असे मी मानतो.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडण्याचं कोणतेही ठोस कारण होते, असे मला आजही वाटत नाही. त्यावेळी पक्षांतर्गत काही इकडं-तिकडं झालं असेल. पण आज परिस्थिती बघताना पक्ष सोडण्याएवढं कोणतंही सबळ कारण नव्हतं. प्रत्येक पक्षातील नेत्यांमध्ये काही घटना घडतच असतात. त्यानुसार माझ्यात आणि खासदार सुनील तटकरे यांच्यात काही घटना घडल्या. पण त्या घटना टाळता येण्यासारख्या होत्या. परंतु ज्यांच्याकडून त्या टाळता येण्यासारख्या होत्या, त्यांनीही टाळल्या नाहीत, असेही जाधव यांनी नमूद केले.

भास्कर जाधव म्हणाले की, माझाही थोडा राग जास्त असल्यामुळे त्या रागाच्या भरात मीही काही निर्णय तडकाफडकी घेतले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडण्यापूर्वी मी आणि उद्धव ठाकरे फोनद्वारे संपर्कात होतो. नाही म्हटलं तरी मी मूळचा शिवसैनिकच होतो. ही सगळी जरी कारणं असली तरी पण मी आज स्पष्टपणे सांगतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडण्याइतकं सबळ कारण आज माझ्याकडे नाही.

आमदारकीचा राजीनामा देऊनच मी शिवसेना सोडली. राष्ट्रवादी काँग्रेसही सोडतानाही आमदारकीचा राजीनामा दिला होता. एवढंच नाही तर पक्षाचा मासिक निधीही भरला होता. त्यामुळे मी नैतिकतेला धरूनच राजीनामा दिला होता, त्यामुळे शिंदे गटातील या ४० लोकांनी माझ्या पक्षांतराबद्दल बोलू नये, असा टोलाही त्यांनी लगावला.

भास्कर जाधव आणि सुनील तटकरेंचे संबंध

खासदार सुनील तटकरे आणि मी एकमेकांवर भरपूर राजकीय हल्ले केले आहेत. त्यांनी शाब्दीक हल्ले केले नाहीत; पण अज्ञात राजकीय वार माझ्यावर भरपूर केले आहेत. माझ्या मुलाच्या लग्नातील वाद आजही मला भोगावा लागतोय, सहन करावा लागत आहे. शाब्दीक वार मीच जास्त केले आहेत, हे खरं आहे. माझ्याविरोधात कठोर जाहीर वक्तव्य करणं टाळलं आहे. पण, आम्ही दोघांनीही मर्यादा पाळल्या आहेत. मतभेद असतील पण संबंध तोडायचे नाहीत, त्यामुळे आम्ही दोघांनी तो विचार पाळला आहे. दोन पावलं मागं जाण्याचा निर्णय तटकरे आणि मी घेतला आहे. दोघेही आम्ही एकमेकांना ओळखून आहोत, एकमेकांचा मानसन्मान राखून आहेात, अशा शब्दांत तटकरे यांच्यासोबतच्या राजकीय वादावर भास्कर जाधव यांनी भाष्य केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT