Nilesh Rane Sarkarnama
कोकण

Nilesh Rane : 'मी येतोय... हिशोब चुकता करायला!' कोकण तापलं

Bhaskar Jadhav : नीलेश राणेंच्या गुहागर येथील सभेची जय्यत तयारी सुरू

सरकारनामा ब्यूरो

Konkan Political News : कोकणात भास्कर जाधव व नारायण राणे हा वाद काही वर्षांपूर्वी पेटला होता. कोकणात अलीकडे झालेल्या उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यानंतर आता पुन्हा एकदा राणे व ठाकरे गटाचे नेते आमदार भास्कर जाधव यांच्यामध्ये संघर्षाची ठिणगी पडली आहे. यातच भाजप नेते आमदार नीलेश राणेंनी जाधवांना हिशोब चुकता करण्यास येतोय, असा इशारच दिला आहे. यातून जुना वाद पुन्हा वाढण्याची शक्यता असल्याचेही बोलले जात आहे.

ठाकरे गटाचे नेते आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी कोकण दौऱ्यात नारायण राणे यांच्यावर टीका केली होती. त्या ठिकाणी लगेचच नीलेश राणेंनी सिंधुदुर्ग येथे पत्रकार परिषद घेऊन भास्कर जाधवांना सज्जड इशारा दिला होता. त्याचवेळी 16 फेब्रुवारी रोजी, मी गुहागर येथे येत असून, त्या दिवशी होणाऱ्या जाहीर सभेत भास्कर जाधवांबद्दल सगळेच बोलणार, असाही इशारा नीलेश राणेंनी दिला होता. त्या सभेची गुहागर येथे तयारी आता सुरू झाली आहे. आता सभेचा टीझर समोर आला आहे. त्यात मी येतोय... हिशोब चुकता करायला!, असा इशाराही राणेंनी जाधवांना दिला आहे.

ठाकरेंच्या कोकण दौऱ्यात आमदार भास्कर जाधव यांनी नारायण राणे व माजी खासदार नीलेश राणे व आमदार नितेश राणे यांच्यावर टीका केली होती. या टीकेचा समाचार नीलेश राणे यांनी नुकताच घेतला आहे. आता या सगळ्या पार्श्वभूमीवर नीलेश राणे (Nilesh Rane) यांची 16 फेब्रुवारी रोजी गुहागर येथे जाहीर सभा होणार आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर एक टीझर प्रदर्शित झाला आहे. भास्कर जाधव यांच्या मतदारसंघात जाधवांच्या होमपीचवर राणे यांच्या होणाऱ्या सभेला महत्त्व प्राप्त झाले आहे.

'मी येतोय...हिशोब चुकता करायला....16 फेब्रुवारी 2024... पाटपन्हाळे माध्यमिक विद्यालय शृंगारतळी गुहागर संध्याकाळी 5 वाजता... मी येतोय नीलेश नारायणराव राणे...' अशा स्वरूपाचा टीझर सध्या व्हायरल होत आहे. त्यामुळे आता या जाहीर सभेत राणे काय बोलणार, याकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे. भाजपचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्तेही या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. या सभेची जय्यत तयारी सुरू आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दोन दिवसांपूर्वी भाजप नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनीही भास्कर जाधवांना सडेतोड उत्तर दिले होते. भास्कर जाधवांचा एकेरी उल्लेख करत, 'बाळासाहेबांना सांगून मी त्याला त्यावेळेला तिकीट द्यायला लावले. चिपळूण येथील तत्कालीन आमदार खेडेकरांना बाजूला करून याला तिकीट दिले. याच्याकडे पैसेही नव्हते. त्यावेळी निवडणूक लढण्यासाठी 15 लाख रुपये दिले. ते अद्यापही परत देण्याचे नाव नाही. आता हाच कृतघ्न माणूस माझ्यावर टीका करतो,' अशा शब्दांत नारायण राणेंनी जाधवांना सुनावले होते. इतकेच नाहीतर, 'माझ्यावर टीका करणाऱ्या भास्कर जाधव याला अद्दल घडवणार, चोप देणार', असा सज्जड दमही राणेंनी दिला आहे.

आता या सगळ्या पार्श्वभूमीवर कोकणात पुन्हा एकदा जाधव विरुद्ध राणे हा संघर्ष उफाळण्याची शक्यता आहे. गुहागर येथे 16 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या सभेची जय्यत तयारी भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून सुरू आहे. त्यामुळे आता या सभेत भाजपचे युवा नेते माजी खासदार नीलेश राणे काय बोलणार, याकडे अवघ्या कोकणाचे लक्ष लागले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT