Nilesh Rane And Vaibhav Naik  Sarkarnama
कोकण

Nilesh Rane Letter Viral : नीलेश राणेंचं व्हायरल पत्र दाखवत ठाकरेंचा शिलेदार आक्रमक; थेट मुख्यमंत्र्यांकडेच केली मागणी

Sindhudurg Nilesh Rane Vs Vaibhav Naik Political Row : तळकोकणात पुन्हा एकदा राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार नीलेश राणे विरूद्ध उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या खडाजंगी होताना दिसत आहे.

Aslam Shanedivan

Sindhudurg News : तळकोकणात पुन्हा एकदा राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली असून, शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार नीलेश राणे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांच्यातील वाद पुन्हा उफाळून आला आहे. यावेळी वैभव नाईक यांनी नीलेश राणे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

नाईक यांच्या आरोपानुसार, गेल्या दोन वर्षांपासून आमदार नीलेश राणे आणि त्यांचे स्वीय सहाय्यक कुडाळ-मालवणमधील विकासकामांमध्ये हस्तक्षेप करत आहेत. प्रत्येक काम आपल्या मर्जीतल्या ठेकेदारांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जात असून, त्यांच्याकडून टक्केवारी घेतली जात असल्याचा आरोप नाईक यांनी केला आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर दबाव टाकला जात असल्याचाही दावा त्यांनी केला. या आरोपांमुळे तळकोकणातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, या प्रकरणाची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचेही वैभव नाईक यांनी म्हटले आहे.

निविदा प्रक्रियेवरून पुन्हा वाद

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ-मालवणचे माजी आमदार वैभव नाईक आणि विद्यमान आमदार नीलेश राणे यांच्यात गेल्या काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आता पुन्हा एकदा नाईक यांनी राणे यांच्यावर गंभीर आरोप केले असून, यासंदर्भात त्यांनी फेसबुकवर एक सविस्तर पोस्ट शेअर केली आहे.

या पोस्टमध्ये नाईक यांनी आरोप केला आहे की, शासनाकडून निविदा प्रक्रिया स्पर्धात्मक पद्धतीने राबविण्याचे प्रयत्न होत असताना, नीलेश राणे स्पर्धात्मक पद्धतीने निविदा भरणाऱ्या ठेकेदारांवर दबाव टाकून त्यांना निविदा मागे घेण्यास भाग पाडत आहेत. एखाद्या ठेकेदाराने त्यांचे ऐकले नाही आणि स्पर्धात्मक पद्धतीने निविदा भरली, तर संबंधित निविदा रद्द करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना पत्र देऊन दबाव आणला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

हे आरोप करताना वैभव नाईक यांनी नीलेश राणे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना लिहिलेल्या पत्राचा उल्लेख केला आहे. हे पत्र व्हायरल होत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. याच पत्राच्या आधारे नाईक यांनी आमदार राणे आणि त्यांच्या स्वीय सहाय्यकांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

दबाव टाकल्याचा आरोप

गेल्या दोन वर्षांपासून सार्वजनिक बांधकाम विभाग, समाजकल्याण विभाग आणि जिल्हा परिषदेमार्फत होणारी विकासकामे आपल्या मर्जीतल्या ठेकेदारांना मिळावीत आणि त्यांच्याकडून कमिशन मिळावे, यासाठी नीलेश राणे इतर ठेकेदारांसह अधिकाऱ्यांवर दबाव आणत असल्याचा आरोप वैभव नाईक यांनी केला आहे.

अनेक कामांसाठी ठेकेदारांनी स्पर्धात्मक पद्धतीने कमी दराने निविदा भरल्या होत्या. त्यामुळे शासनाचा आर्थिक फायदा होऊ शकला असता. मात्र, संबंधित ठेकेदार मर्जीतले नसल्याने अधिकाऱ्यांवर दबाव आणून त्यांच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी काढण्यात आल्या आणि त्यांच्या निविदा रद्द करण्यात आल्याचा आरोप नाईक यांनी केला आहे.

कमी दराच्या निविदा नाकारून शासकीय अधिकाऱ्यांनी शासनाचे आर्थिक नुकसान केले आणि त्यानंतर संबंधित कामांसाठी फेरनिविदा काढण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले आहे. प्रत्येक काम आपल्या मर्जीतील ठेकेदारालाच मिळाले पाहिजे, त्यासाठी शासनाचे नुकसान झाले तरी चालेल, अशी भूमिका घेतली जात असल्याचा आरोप नाईक यांनी केला. मागील दोन वर्षांत स्पर्धात्मक पद्धतीने न झालेल्या सर्व कामांची चौकशी राज्याचे मुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि पालकमंत्र्यांनी करावी, अशी मागणीही वैभव नाईक यांनी केली आहे.

निविदा प्रक्रियेत हस्तक्षेप केल्याचा दावा

स्पर्धात्मक पद्धतीने विकासकामे व्हावीत, यासाठी शासनाने निविदा प्रक्रिया लागू केली आहे. कमी दराने निविदा भरणाऱ्या ठेकेदारांकडून त्यांच्या दरानुसार डिपॉझिटची रक्कम भरून घेण्याची तरतूद आहे. त्याचबरोबर, निविदा कमी दराने भरली असली तरी अंदाजपत्रकानुसार दर्जेदार काम करून घेण्याची जबाबदारी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची आहे, असे नाईक यांनी सांगितले.

अधिकाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्याचे काम लोकप्रतिनिधींनी केले पाहिजे. मात्र, लोकप्रतिनिधी आणि अधिकारी संगनमत करून निविदा प्रक्रियेत हस्तक्षेप करत असतील आणि ठेकेदारांवर दबाव आणत असतील, तर निविदा प्रक्रिया स्पर्धात्मक राहणार नाही, असे नाईक म्हणाले. अशीच परिस्थिती राहणार असेल, तर विकासकामांसाठी निविदा काढण्याऐवजी संबंधितांना वाटेल त्या ठेकेदाराला काम देऊन कमिशन घ्या, असा टोला वैभव नाईक यांनी लगावला.

मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी

नीलेश राणे यांनी सावंतवाडी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना लिहिलेले पत्र आपण मुख्यमंत्र्यांना पाठवणार असल्याचे वैभव नाईक यांनी सांगितले आहे. नीलेश राणे आणि त्यांचे स्वीय सहाय्यक आपल्या मर्जीतल्या ठेकेदारांना कामे मिळवून देत असून, त्यातून कमिशन घेत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

यापूर्वी घेतलेली कामे अर्धवट सोडणाऱ्या ठेकेदारांनाही पुन्हा नवीन कामे मिळवून दिली जात असल्याचा दावा नाईक यांनी केला. निविदा प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करत, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी माजी आमदार वैभव नाईक यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT