राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकांनंतर कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या राजकारणात मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे.
ठाकरे गटाचे नगरसेवक फुटल्याच्या चर्चांना माजी खासदार विनायक राऊत यांनी अफवा ठरवले आहे.
सर्व नगरसेवक सुरक्षित असून काही जण ‘सेफ लोकेशन’वर असल्याची माहिती समोर आली आहे.
KDMC Political News : नुकताच राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्या असून कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या राजकारणात ट्विस्ट निर्माण झाला आहे. येथे महापौर पदावरून भाजप–शिवसेनेत रस्सीखेच सुरू झाली असून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशातच भाजप–शिवसेनेकडून ठाकरे बंधूंचे नगरसेवक फोडण्याचे काम केलं जात असल्याचे समोर आले आहे. ठाकरेंचे ३ नगरसेवक फुटल्याची चर्चा सुरू आहे. पण या चर्चा आता अफवा असल्याचे दिसत असून एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असलेले दोन्ही नगरसेवक पुन्हा ठाकरेंच्या नेत्यांच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. ते नगरसेवक ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊत यांच्या संपर्कात आहेत अशी माहिती मिळत आहे. तसेच इतर नगरसेवकही ‘सेफ लोकेशन’वर असल्याची माहिती देखील समोर आली आहे.
राज्यात रखडलेल्या 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान झाले असून दुसऱ्याच दिवशी (16 जानेवारी) मतमोजणी झाली आणि निर्णयही जाहीर झाला. या निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असून अनेक ठिकाणी महायुतीने मोठा विजय मिळवला आहे.
तर काही ठिकाणी महाविकास आघाडीने बाजी मारली. दरम्यान एकीकडे कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत महापौर पदावरून भाजप–शिवसेनेत रस्सीखेच सुरू झाली असतानाच दुसरीकडे ठाकरे बंधूंचे नगरसेवक गेम चेंजर ठरत आहेत.
या स्सीखेचमध्येच शिंदेंनी ठाकरेंना मोठा दणका दिला असून कल्याण-डोंबिवलीमध्ये उद्धव ठाकरेंचे तीन नगरसेवक फोडल्याचे वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये भाजप 50 तर, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 53 जागा मिळाल्या आहेत. तर ठाकरेंच्या शिवसेनेचे 11 नगरसेवक निवडून आले आहेत.
भाजप–शिवसेना युतीमध्ये लढले असून येथे युतीची सत्ता येणार आहे. पण सध्या दोन्ही पक्ष महापौर पदासाठी आग्रही असून शिंदेंनी ठाकरेंच्या शिवसेनेला टार्गेट केले आहे. शिंदेंना महापौरपदासाठी नऊ नगरसेवकांची गरज असून त्यांनी ठाकरेंचे तीन नगरसेवकांना फोडल्याची चर्चा आहे.
पण आता असे काहीच झाले नसून माजी खासदार विनायक राऊत यांच्या संपर्कात ते दोन्ही नगर सेवक असल्याचे कळत आहे. तसेच उर्वरीत नऊ नगरसेवकांना ‘सेफ लोकेशन’वर हालवण्यात आले आहे. विशेषत: या नगरसेवकांवर विनायक राऊत लक्ष ठेऊन आहेत. यामुळे आता KDMC मध्ये पुढील आणखी काही दिवसांत राजकीय नाट्याची शक्यता वर्तवली जात आहे.
KDMC मध्ये पक्षीय बलाबल
भाजप ५०
एकनाथ शिंदेंची शिवसेना ५३
ठाकरेंची शिवसेना ११
मनसे - ५
काँग्रेस - २
राष्ट्रवादी (शरद पवार) 1
1) कल्याण-डोंबिवली महापालिकेत वाद कशावरून सुरू आहे?
महापौर पदावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये रस्सीखेच सुरू आहे.
2) ठाकरे गटाचे नगरसेवक फुटल्याच्या चर्चा खऱ्या आहेत का?
नाही, या चर्चा अफवा असल्याचे विनायक राऊत यांनी स्पष्ट केले आहे.
3) नगरसेवक ‘सेफ लोकेशन’वर का ठेवले आहेत?
राजकीय दबाव आणि फोडाफोडीपासून संरक्षणासाठी नगरसेवक सुरक्षित ठिकाणी ठेवले असल्याची माहिती आहे.
4) या प्रकरणावर विनायक राऊत यांनी काय सांगितले?
एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचे सांगितलेले नगरसेवक पुन्हा ठाकरे गटाच्या संपर्कात असल्याचे त्यांनी सांगितले.
5) या घडामोडींचा महापौर निवडीवर काय परिणाम होईल?
या राजकीय हालचालींमुळे महापौर निवड अधिक चुरशीची होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.