KDMC mayor election latest updates: कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणूक निकालांनी महायुतीला सत्ता मिळवण्याचा मार्ग खुला केला असला, तरी सत्तेच्या सारीपाटावर आता खरी लढाई सुरू झाली आहे ती शिंदेची शिवसेना आणि भाजप यांच्यातील वर्चस्वाची.
दोन्ही पक्ष ससा-कासवाच्या खेळाप्रमाणे एकमेकांच्या पुढे-मागे धावत असून “महापौर कोणाचा?” या मार्गांवर आता ससा कोण आणि कासव कोण ठरत हा प्रश्न युतीसाठीच सर्वात मोठे आव्हान ठरत आहे.
प्राथमिक आकडेवारीनुसार शिवसेना शिंदे गटाने 53 तर भाजपाने 50 जागांपर्यंत मजल मारली आहे. यामुळे केडीएमसी मध्ये मोठा भाऊ नेमका आता कोण हे ठरवण्यासाठी दोन्ही पक्षाने इतर पक्षातील मासे गळाला लावण्यास सुरुवात केली आहे.
संख्याबळाच्या दृष्टीने दोन्ही पक्ष महायुतीत असले, तरी नेतृत्वाच्या मुद्द्यावरून युतीतील अंतर्गत संघर्ष आता उघडपणे समोर येण्याची चिन्हे आहेत. तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाने देखील 11 जागा व मनसेने 5 जागा निवडून आणत दोन्ही पक्षाची कोंडी करून ठेवली आहे. काँग्रेसकडे 2 तर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे 1 जागा आली आहे. आता हे पक्ष कोणाला साथ देतात आणि आपल्या उमेदवाराचे वजन वाढवतात हे पहावे लागेल.
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी गेल्या काही महिन्यांपासून कल्याण-डोंबिवली महापालिकेवर भाजपचा महापौर बसवण्याचे उद्दिष्ट ठेवत संघटनात्मक बांधणी सुरू केली होती. निवडणूक जाहीर होताच भाजपचा “स्वबळावर सत्ता” हा नारा कार्यकर्त्यांमध्ये रूजवण्यात आला.
युतीची औपचारिक घोषणा शेवटपर्यंत रखडत राहिली. मुंबईत गुपचूप झालेल्या जागावाटपात शिवसेना 68 आणि भाजप 54 जागांवर सहमती झाली असली, तरी प्रत्यक्ष प्रचारात दोन्ही पक्षांमध्ये कुरघोडी सुरूच राहिली. यामुळे शिवसेना शिंदे गटातील वरिष्ठ नेत्यांनी भाजपच्या भूमिकेबाबत दिल्लीतील नेतृत्वाकडे नाराजी व्यक्त केली.
त्यानंतरच कल्याण-डोंबिवलीत भाजप नेते महायुतीचे नारे देताना दिसू लागले. प्रचारातही युती दिसून येत असली तरी काही ठिकाणी संघर्ष उघड उघड दिसून आला. पॅनल 29, 30 अशी काही उदाहरण ताजी आहेत.
निकालानंतर महायुतीचे उमेदवार मोठ्या संख्येने विजयी झाले असले, तरी यात श्रेयवादाचा संघर्ष आता सुरू होणार हे स्पष्ट आहे. भाजपा पेक्षा शिंदे गटाकडे केवळ 3 जागा जास्त आहेत. त्यामुळे सत्ता स्थापनेच्या वेळी हा समन्वय टिकतो की तुटतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. वेगवेगळे लढलो असतो तर आणखी जागा निवडून आल्या असत्या ही खदखद भाजपा कार्यकर्त्यांच्या मनात अजूनही धूमसते आहे.
केडीएमसी मध्ये मोठा भाऊ होण्यासाठी पुन्हा फोडाफोडी करण्यास भाजपा, शिंदे गट मागेपुढे पाहणार नाही असे मत जाणकार व्यक्त करत आहेत. निवडणुकीच्या तोंडावर शीतल मंढारी यांनी भाजपात प्रवेश केला, निवडणुकीत त्या मनसेच्या तिकिटावर उभ्या राहिल्या आणि जिंकून आल्या.
भाजपा आमदार सुलभा गायकवाड यांच्या सोबत त्यांनी आपला विजयाचा आनंद साजरा केला. तसेच ठाकरे गटाचे मधुर हे ठाणे येथे शिंदे यांची भेट घेण्यासाठी गेले आहेत. तर ठाकरे गटातून निवडून आलेले स्वप्नाली केणे तसेच आणखी एक नगरसेवक राज ठाकरे यांना भेटण्यासाठी गेले आहेत. ते मनसेचेच उमेदवार असून पॅनल मुळे त्यांनी मशाल चिन्हाची निवड केली होती. त्यामुळे येत्या एक दोन दिवसांत काय घडामोडी घडतात यावर सत्तेचे गणित बसणार असल्याचे बोलले जातं आहे.
डोंबिवलीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी अत्यंत शांतपणे पण प्रभावी भूमिका बजावली. डोंबिवली पश्चिमेतील विष्णुनगरसारख्या संवेदनशील प्रभागात भाजप उमेदवारांना संघाच्या सूक्ष्म नियोजनामुळे तारले गेले.
पूर्व भागातही संघाने प्रत्येक प्रभागात काटेकोर निरीक्षण ठेवून भाजप आणि युतीच्या उमेदवारांसाठी वातावरण तयार केले. डोंबिवली विधानसभा मतदारसंघ भाजपचा असल्याने प्रदेशाध्यक्षांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न येथे जास्त तीव्र होता. त्यातूनच भाजपने डोंबिवलीत तब्बल 14 उमेदवार बिनविरोध निवडून आणत संघटनात्मक ताकद दाखवून दिली.
दोन तेच तीन टर्म सत्ता उपभोगणाऱ्या आणि ऐन निवडणुकीत राजकीय पक्षांची हवा पाहून पक्षातर करून आपणच पुन्हा निवडून येऊ अशा अविर्भावात राहणाऱ्या नगरसेवकांना, घराणेशाही करणाऱ्या नगरसेवकांना मतदारांनी नाकारून स्पष्ट संदेश दिला.
डोंबिवलीतील प्रल्हाद म्हात्रे, संदेश पाटील, मधुर म्हात्रे यांसारख्या सामाजिक कार्यकर्त्यांना मतदारांनी पक्षापलीकडे पाहत संधी दिली. डॉक्टर, वकील, सुशिक्षित उमेदवारांना मिळालेला कौल हा डोंबिवलीकरांच्या बदलत्या राजकीय मानसिकतेचे द्योतक आहे.
“आपणच शहराचे तारणहार” अशा अविर्भावात वावरणाऱ्या काही नगरसेवकांना मतदारांनी जबरदस्त धक्का दिला. नेते-मंत्री पाठीशी असल्याचा माज, बाहेरून माणसे आणून राडे घालण्याची प्रवृत्ती, आणि शहराचे नाव बदनाम करणाऱ्या घटनांनी सुशिक्षित डोंबिवलीकरांचा संयम सुटला. निकालातून त्यांनी या प्रवृत्तीला थेट नकार दिल्याचे चित्र दिसून आले आहे.
कल्याण-डोंबिवलीचा निकाल हा केवळ महापालिकेपुरता मर्यादित न राहता, तो महायुतीतील नेतृत्वाच्या समीकरणांवर आणि आगामी विधानसभा राजकारणावरही खोल परिणाम करणारा ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.