रत्नागिरी जिल्ह्यातील पावस जिल्हा परिषद गट हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो.
आरक्षणात झालेल्या बदलामुळे येथे तिरंगी लढतीचे संकेत दिसत आहेत.
भाजपसह शिंदेंची शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना या पक्षांनी निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची तयारी सुरू केली आहे.
Ratnagiri News : येथील जिल्हा परिषद पावस गट भाजपचा बालेकिल्ला असला तरीही या गटामध्ये पारंपरिक युतीचे प्राबल्य आहे. परंतु अनेकवेळा शिवसेना-भाजपमध्ये मैत्रीपूर्ण लढती झाल्या आहेत. पण या वेळेला हा गट सर्वसाधारण गटासाठी खुला झाल्यामुळे येथे आता भाजप-शिवसेना युती होणार हा याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. युती न झाल्यास येथे तिरंगी लढतीची शक्यता आहे. तर यावेळी उद्धव ठाकरे यांची शिवसेनाही ताकद लावणार असल्याचे समोर येत आहे.
पावस जिल्हा परिषद गट पारंपरिक भाजपचा बालेकिल्ला होता. त्यामुळे शिवसेना-भाजप युतीमध्ये हा गट भाजपकडे गेला; परंतु त्यांच्यामध्ये अंतर्गत मतभेदामुळे फक्त कागदोपत्री युती होती. प्रत्यक्षात दोघांमध्ये प्रचंड मतभेद होते. त्यामुळे पुढे शिवसेनेच्या माध्यमातून अनेकवेळा बंडखोरी झाली. त्याचा फायदा तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फायदा उचलला. त्या दरम्यान, अनेक शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याशिवाय पर्याय उरला नव्हता.
दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ
बंडखोरीमुळे शिवसेनेला 2012 मध्ये शिवसेना-भाजप युती असताना शिवसेनेचे अधिकृत उमेदवार रवीकिरण तोडणकर यांच्यासमोर शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष पावसकर यांच्या बंडखोरीमुळे आव्हान उभे झाले होते. पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने बहुजन विकास आघाडीचे नंदकुमार मोहिते हे जिल्हा परिषदेवर निवडून गेले. 2014 मध्ये आमदार उदय सामंत यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे या भागामध्ये शिवसेनेचे वर्चस्व निर्माण झाले. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे एकत्रीकरण झाल्यामुळे शिवसेना वरचढ ठरली होती.
2017 च्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये हा गट सर्वसाधारण झाला. मात्र किरण तोडणकर व सुभाष पावसकर या दोघांनाही निवडणुकीचा खर्च सादर न केल्यामुळे त्यावेळी उभरता आले नाही. तर शिवसेनेने अखेर आरती किरण तोडणकर यांना उमेदवारी जाहीर केली. शिवसेना व भाजप यांच्यामध्ये मैत्रीपूर्ण लढत होऊन भाजपच्या विनायक भाटकर यांना आरती तोडणकर यांचा सामना करावा लागला. यामध्ये शिवसेनेच्या आरती तोडणकर विजयी झाल्या.
पुढे 2022 मध्ये शिवसेनेमध्ये उभी फूट पडली आणि तत्कालीन शिवसेनेचे आमदारांनी शिंदेगटामध्ये प्रवेश केला. यामुळे या गटात देखील दोन शिवसेना तयार झाल्या. परंतु अनेक मतदार ठाकरे सेनेकडे राहिल्यामुळे 2024 च्या लोकसभा निवडणुकीत याचा फायदा महाविकास आघाडीला झाला. या गटात निवडणुकीमध्ये ठाकरेंची शिवसेना वरचढ ठरली. सेनेच्या उमेदवाराला अडीच हजाराचे मताधिक्य या भागामध्ये मिळाले; परंतु महायुतीचा उमेदवार निवडून आला.
आमदार सामंतांच्या आश्वासनाकडे लक्ष
मागील प्रचारादरम्यान आमदार उदय सामंत यांनी महायुतीच्या माध्यमातून भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा दिला जाईल आणि त्याला निवडून आणले जाईल, असे आश्वासन दिले होते. त्या निवडणुकीवेळी दिलेले आश्वासन सत्यात उतरते की, आश्वासनच राहते याकडे कार्यकर्ते लक्ष ठेवून आहेत.
तिन्ही पक्षांची स्वबळाची तयारी
या वेळी खुले आरक्षण झाल्यामुळे ठाकरे सेनेकडून रवीकिरण तोडणकर इच्छुक आहेत. त्यांच्याबरोबर इच्छुक असलेले सुभाष पावसकर यांना पंचायत समिती किंवा पावस सरपंचपद देण्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे ठाकरे सेनेकडून एकमेव उमेदवार राहण्याची शक्यता आहे. भाजपकडून माजी पंचायत समिती सदस्य सुशांत पाटकर यांची संधीची शक्यता आहे. तसेच शिंदेगटाकडून नाखरेतील सेनेचे खंदे कार्यकर्ते विजय चव्हाण यांना संधी मिळण्याची चिन्हे आहेत.
1. पावस गटात तिरंगी लढत का होणार आहे?
आरक्षणात झालेल्या बदलामुळे भाजपसह दोन्ही शिवसेना गटांनी उमेदवार देण्याची तयारी दाखवली आहे.
2. भाजपचा पावस गटात बालेकिल्ला का मानला जातो?
पावस गटात भाजपचा दीर्घकाळ प्रभाव राहिल्यामुळे तो पक्षाचा बालेकिल्ला मानला जातो.
3. शिवसेनेचे कोणते गट या निवडणुकीत उतरणार आहेत?
एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे दोन्ही गट मैदानात उतरतील.
4. या लढतीचा निकाल स्थानिक राजकारणावर काय परिणाम करेल?
निकालावरून पुढील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे समीकरण निश्चित होईल.
5. निवडणुकीची तयारी कोणत्या टप्प्यावर आहे?
सर्व पक्षांनी उमेदवार निवड आणि मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.