BJP MLC Pramod Jathar’s aggressive political tours in Ratnagiri district spark fresh discussions over equations with Guardian Minister Uday Samant. Sarkarnama
कोकण

BJP Vs Shivsena : आमदारकी मिळताच प्रमोद जठार 'रत्नागिरीत' अॅक्टिव्ह; पण, भाजपच्या बैठकांचा धडाका उदय सामंतांच्या डोळ्यात खुपला?

BJP Vs Shivsena : भाजपचे विधान परिषद आमदार प्रमोद जठार यांच्या रत्नागिरी जिल्ह्यातील आक्रमक दौऱ्यांमुळे पालकमंत्री उदय सामंत नाराज असल्याची चर्चा आहे.

Hrishikesh Nalagune

कोकणच्या राजकीय पटलावर सध्या रत्नागिरी जिल्ह्यात एक आगळावेगळा 'हायव्होल्टेज ड्रामा' पाहायला मिळत आहे. माजी आमदार प्रमोद जठार यांना भाजपने विधानपरिषदेवर पाठवत पुन्हा आमदार केले. आमदारकी मिळताच त्यांनी चिपळूण, रत्नागिरी, लांजा आणि राजापूर तालुक्यांत झंझावाती दौऱ्यांचा सपाटा लावला आहे. पण रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांना मात्र जठार यांचा दौरा खटकल्याची जोरदार चर्चा आहे.

जठार यांनी पुढचा आमदार आणि नगराध्यक्ष भाजपचाच अशा गर्जना करत त्यांनी राजकीय वातावरण तापवण्याचा प्रयत्न केला; जुन्या कार्यकर्त्यांना एकत्र करून भाजप संघटन मजबूत करत असल्याचा दावा केला. पण उदय सामंत यांनी जठारांचे हे दावे 'हवेतले किल्ले' ठरवत त्यांच्या अतिउत्साहावर थेट पाणी फेरले. 100 टक्के भाजप होणार नाही त्यासाठी प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्री आहेत, अशा कडक शब्दांत जठारांना सुनावल्याने जिल्ह्याच्या राजकारणात ठिणगी पडली आहे.

प्रमोद जठार आमदार झाले तेव्हा दुसऱ्या मिनिटाला मी त्यांना अभिनंदनाचा फोन केला. त्यांना कितीही वाटले जिल्ह्यात शतप्रतिशत भाजप करू मात्र भाजपमध्ये वरिष्ठांच्या आदेशाने काम चालते. त्यामध्ये रवींद्र चव्हाण आहेत. देवेंद्र फडणवीस आहेत. मला वाटले जिल्ह्यात शतप्रतिशत शिवसेना करायची तर माझे वरिष्ठ एकनाथ शिंदे आहेत. त्यामुळे जिल्ह्यात आमदार जठार दौरे करतायत त्यांना माझ्या शुभेच्छा, असे मंत्री सामंत म्हणाले.

मी केलेला दौरा कुणाला आवडो ना आवडो मी माझ्या पक्षाचे काम करीत आहे. मी आता रत्नागिरीकरांच्या राशीत आलो. पक्षाने दिलेली जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडणार आहे, असे जठार यांनी म्हणत सामंत यांना प्रत्युत्तर दिले. उदय सामंत किंवा महायुतीमधील इतर कोणत्याही नेत्याशी माझे कोणतेही मतभेद नाहीत. आम्ही सर्वजण एकमेकांच्या सातत्याने संपर्कात आहोत. महायुतीमधील सर्वच नेते अत्यंत परिपक्व आणि ज्येष्ठ असल्याने आमच्यात कोणत्याही वादाला जागा नाही, असे स्पष्ट केले.

प्रमोद जठार म्हणाले, रत्नागिरी जिल्ह्यात भाजपचा एकही आमदार नाही. त्यामुळे या भागात पक्षसंघटन मजबूत करणे आणि कार्यकर्त्यांना ताकद देणे अत्यंत गरजेचे आहे. पालघर ते सिंधुदुर्ग या संपूर्ण किनारपट्टीच्या भागाची जबाबदारी पक्षाने सोपवली असली तरी रत्नागिरी जिल्हा हाच मुख्य केंद्रबिंदू ठेवून सध्या काम केले जात आहे. सिंधुदुर्ग आणि रायगड भागात भाजपचे लोकप्रतिनिधी आहेत; मात्र रत्नागिरीतील ही पोकळी भरून काढायची आहे.

यासाठी राजापूर, लांजा, रत्नागिरीपासून ते मंडणगड, दापोलीपर्यंत सातत्याने दौरे करून लोकांशी संपर्क साधला जात आहे. रत्नागिरीत भाजपच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन महायुतीमध्ये योग्य समन्वय साधण्यावर भाजपचा भर आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवणे, हेच मुख्य उद्दिष्ट आहे, निवडणुकीसाठी पाच वर्षांची पूर्वतयारी ही आवश्यकच असते. त्यामुळे निवडणुका स्वबळावर लढायच्या की युती करून, याचा अंतिम निर्णय वरिष्ठ नेतेच घेतील, असेही जठार यांनी सांगितले.

दिल्ली अभी बहुत दूर है...

आगामी निवडणुकांच्या उमेदवारीबाबत विचारले असता हा २०२९चा विषय असून ‘दिल्ली अभी बहुत दूर है’ असे सांगत जठार यांनी सध्या निवडणुकांपेक्षा केवळ पक्ष संघटना वाढवण्यावर भर दिला. आपण येथे कोणाचेही स्पर्धक नसून कार्यकर्त्यांना बळ देणे आणि लोकांची कामे करणे हेच आपले मुख्य उद्दिष्ट आहे. राजकारणात आपला कोणीही शत्रू नसून सर्वच पक्षांतील नेते आपले चांगले मित्र आहेत, असे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना आतापासूनच संघटना बांधणीच्या कामाला लागण्याचे आवाहन केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT