

Mumbai News : राज्यातील निवडणुकीचा माहोल संपला आहे. त्यानंतरही एकनाथ शिंदे यांनी गेल्या काही दिवसापासून सुरु केलेले ऑपरेशन टायगर सुरूच आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या जवळच्या नेत्याला शिवसेनेत प्रवेश दिला आहे. या नेत्याने जवळपास पाचशे शिवसैनिकांसह रविवारी सायंकाळी शिवसेनेत प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे वांद्रा येथील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद कमी होणार असून भविष्यत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद याठिकाणी वाढण्यास मदत होणार आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी खेळी केली असून ठाकरेंना (Uddhav Thackeray) मातोश्रीच्या अंगणातच मोठा धक्का दिला आहे. शिवसेना शाखा क्रमांक 92 चे शाखाप्रमुख रामशरण चांदेलिया यांनी रविवारी शिंदेगटात प्रवेश केला. रामशरण चांदेलिया हे अनिल परब यांचे निकटवर्तीय मानले जातात. 500 हून अधिक समर्थकांसह त्यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला. शिवसेना विभागप्रमुख कुणाल सरमळकर यांच्या नेतृत्वाखाली या पक्षप्रवेश सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. अंधेरीतील शेरे पंजाब ग्राउंड येथे रामशरण चांदेलिया हे 500 कार्यकर्त्यांसह शिंदेसेनेत प्रवेश केला.
दरम्यान, या पक्षप्रवेशामुळे स्थानिक राजकारणात शिवसेनेची ताकद वाढणार असल्याची चर्चा सुरू आहे. 'ऑपरेशन टायगर' मोहिमेमुळे शिंदे यांच्या शिवसेनेला नवे बळ मिळाले आहे. या पक्षप्रवेशामुळे वांद्रा येथील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठं धक्का बसला आहे. गेल्या काही दिवसापासून शिंदे यांच्या शिवसेनेकडून ठाकरेंच्या शिवसेनेतील नेटमंडळीला प्रवेश दिला जात आहे.