Raigad News, 16 Nov : रायगड जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात आज मोठी घडामोड घडणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पेण विधानसभा मतदारसंघाचे कार्याध्यक्ष आणि सुनील तटकरे कुटुंबाचे निकटवर्तीय मानले जाणारे प्रमोद म्हसकर आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. विशेष म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे राजकीय प्रभावक्षेत्र मानल्या जाणाऱ्या रोहा शहरातच हा पक्षप्रवेश होणार असल्याने या घडामोडीला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.
मंत्री भरत गोगावले आणि आमदार महेंद्र दळवी यांच्या उपस्थितीत आज संध्याकाळी रोहा शहरात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे. म्हसकर यांच्या शिवसेना प्रवेशामुळे रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा राजकीय धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
म्हसकर यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांच्या पुढील राजकीय भूमिकेबाबत विविध चर्चा सुरू होत्या. अखेर त्यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे. म्हसकर हे गेल्या अनेक महिन्यांपासून 'प्रमोद म्हसकर प्रतिष्ठान'च्या माध्यमातून रायगड जिल्ह्यात सामाजिक क्षेत्रात सक्रिय आहेत. रोहा आणि पेणसह जिल्ह्यातील विविध भागांत त्यांचा जनसंपर्क आहे. त्यामुळे त्यांच्या पक्षांतराचा परिणाम केवळ एका विधानसभा मतदारसंघापुरता मर्यादित न राहता जिल्ह्यातील राजकीय समीकरणांवरही होऊ शकतो.
शिवसेनेची ताकद वाढवण्याचा प्रयत्न?
रायगडच्या राजकारणात सुनील तटकरे आणि मंत्री भरत गोगावले यांच्यातील राजकीय संघर्ष अनेकदा पाहायला मिळाला आहे. दोन्ही पक्ष राज्यातील सत्तेत एकत्र असले, तरी रायगडमध्ये स्थानिक पातळीवर दोन्ही पक्षांमध्ये वर्चस्वाची लढाई सुरू असल्याचे चित्र आहे. विशेषतः श्रीवर्धन, रोहा, माणगाव आणि पेण या भागांतील राजकीय घडामोडींना या संघर्षाची पार्श्वभूमी आहे.
अलीकडेच माणगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही माजी नगरसेवकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर आता रोह्यातील प्रमोद म्हसकर यांच्या पक्षप्रवेशाची तयारी सुरू आहे. त्यामुळे रायगडमध्ये राष्ट्रवादीच्या संघटनात्मक ताकदीला धक्का देत शिवसेना आपला प्रभाव वाढवण्याच्या प्रयत्नात असल्याचे राजकीय चित्र दिसत आहे. दरम्यान, प्रमोद म्हसकर यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी सुरेश मगर आणि आप्पा देशमुख हेदेखील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.