

West Bengal news, 15 Nov : पश्चिम बंगालमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बाजारातील वाद मिटवण्यासाठी गेलेल्या भाजपच्या महिला पदाधिकाऱ्याच्या पतीचा मारहाणीत मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील पानीहाटी येथील सोदपूर साइडिंग बाजारात ही घटना घडली.
अरूप साहा असं मृत भाजपच्या महिला पदाधिकाऱ्याच्या पतीचं नाव असून, त्यांच्या पत्नी रुमा साहा या पानीहाटी नगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक १४ च्या भाजप सचिव आहेत. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून राजकीय वातावरणही तापलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोदपूर साइडिंग बाजारात काही तरुणांकडून अश्लील भाषेचा वापर केला जात होता. याला एका व्यावसायिकाने विरोध केल्याने वादाला सुरुवात झाली. संबंधित व्यावसायिकाने याबाबत भाजपच्या प्रभाग सचिव रुमा साहा यांच्याकडे तक्रार केली होती.
त्यानंतर पुन्हा वाद वाढल्याने रुमा या पती अरूप साहा यांच्यासह घटनास्थळी पोहोचल्या. यावेळी वाद मिटवण्याचा प्रयत्न करत असताना अरूप साहा यांना धक्काबुक्की करून खाली पाडण्यात आलं. खाली पडल्यामुळे त्यांची प्रकृती अचानक खालावली. त्यांना तातडीने कमरहट्टी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर भाजप आमदार रत्ना देवनाथ यांनी मृत अरूप साहा यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. तसेच मुख्यमंत्री यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची मागणी केली. धक्कादायक बाब म्हणजे आमदाराने भाजप जिल्हाध्यक्ष चंडीचरण राय यांच्यावरही प्रश्न उपस्थित केले आहेत.
प्रभागांमध्ये नियुक्त करण्यात आलेले काही संयोजक यापूर्वी तृणमूल काँग्रेसमध्ये होते. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर हेच लोक परिसरात अशांतता निर्माण करत असल्याचा आरोप आमदारांनी केला. या प्रकरणात जे कोणी दोषी असतील, त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.
दरम्यान, रुमा साहा यांनी राजदीप दास आणि प्रभाग क्रमांक १४ मधील सुजीत कुमार विश्वास उर्फ ननी यांच्यासह अनेक जणांवर या घटनेत सहभागी असल्याचा आरोप केला आहे. ननी यानेच राजदीप दास आणि तृणमूल समर्थकांना घटनास्थळी बोलावल्याचा दावा रुमा साहा यांनी केला आहे. तर या घटनेनंतर परिसरात राजकीय तणाव निर्माण झाला असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.