रत्नागिरीत राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला असून प्रशांत यादव यांनी भाजप प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
नितेश राणे यांनी या घडामोडीची पुष्टी केली असून कोकणातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत आहेत.
यामुळे राष्ट्रवादीसह शिवसेनेलाही राजकीय धक्का बसण्याची चर्चा रंगली आहे.
Ratnagiri Politics News : राज्यात आगामी स्थानिकच्या रणधुमाळी सुरूवात झाली असून महायुतीसह विरोधी पक्षांकडून मोर्चे बांधणी केली जात आहे. दरम्यान तळ कोकणातही राजकीय उलथापालथीला वेग आला असून यामुळे रत्नागिरीत राजकीय वातावरण तापले आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाला आता खिंडार पडण्यास सुरूवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने विधानसभेला दिलेला उमेदवारच प्रशांत यादवच आता भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. याबाबत मंत्री नितेश राणे यांनीच माहिती दिली असून राष्ट्रवादीला भगदाड पडल्याचे बोलले जात अशतानाच शिवसेनेला भाजपनेच धक्का दिल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.
आठ महिन्यांपूर्वी विधानसभेच्या निवडणुकीवेळी चिपळूण मतदार संघातून शरद पवार यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या विरोधात प्रशांत यादव यांना उमेदवारी दिली होती. पण शेखर निकम यांनी गड जिंकला होता. तेंव्हापासून प्रशांत यादव काहीसे नाराज होते. मध्यंतरी त्यांची पालकमंत्री उदय सामंत आणि त्यांचे बंधू राजापूरचे आमदार किरण सामंत यांनी भेट घेतली होती. त्यामुळे ते शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली होती.
मात्र आता ते भाजपच्या गळाला लागल्याचे समोर आले असून मंत्री नितेश राणे यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. नितेश राणेंनी यादव यांच्या पक्षप्रवेशामुळे कोकणात भाजपची ताकद वाढणार असल्याचा दावा देखील केला आहे. प्रशांत यादव धनुष्यबाण हाती घेणार अशा चर्चा असतानाच त्यांनी भाजपचं कमळ हाती घेण्याचा निर्णय घेतला. ते रविंद्र चव्हाण यांच्या संपर्कात असून आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्ष प्रवेश होणार असल्याची माहितीही राणे यांनी दिली आहे.
यावेळी राणे म्हणाले की, 'प्रशांत यादव खांद्याला खांदा लावून काम करतील, त्यांच्या प्रवेशाने भाजप अधिक मजबूत होईल. याबाबत प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्याशी चर्चा झाली असून 19 ऑगस्ट रोजी मुंबईतील भाजप कार्यालयात पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडेल. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ज्येष्ठ नेते नारायण राणे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण उपस्थिती असतील.
यावेळी नितेश राणेंनी 'गावोगावी आमच्या कार्यकर्त्यांचे जाळे असून प्रशांत यादव यांच्यामुळे यात आणखी वाढ होईल. पण सध्या पालकमंत्री जिल्हा नियोजनाच्या निधीत गडबड करत आहेत. ते आपल्यासह किरण सामंत आणि आमदार निकम यांना प्रत्येकी 20 कोटी रुपये देत आहेत. मात्र नारायण राणे यांना 5 कोटी रुपये दिले आहेत. हा अन्याय आहे. हा कधी थांबणार. भाजपशिवाय मित्रपक्ष निवडून येऊ शकत नाहीत. आमची ताकद आम्ही दाखवून देऊ, असे म्हणत त्यांनी सामंत यांना इशाराही दिला आहे.
याबरोबरच नितेश राणे यांनी भास्कर जाधव यांच्यावरही जोरदार निशाना साधताना, भास्कर जाधव यांनी ब्राम्हण समाजाच्याबाबत जे बोलले आहेत, जी भूमिका घेतली आहे. तिच उद्धव ठाकरे गटाची भूमिका आहे का? असा सवाल केला आहे. तर ठाकरे गटाने आपली भूमिका सांगावी असेही आवाहन केले आहे. तर भास्कर जाधवांनी जे वक्तव्य केलं आहे. त्याचे पडसाद आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत दिसेल. हर्णे बंदरातही नक्की बदल दिसेल, असेही नितेश राणेंनी म्हटलं आहे.
प्र. 1: प्रशांत यादव कोण आहेत?
उ. 1: प्रशांत यादव हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी उमेदवार असून आता ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
प्र. 2: ही माहिती कोणी दिली?
उ. 2: भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनीच या बातमीची पुष्टी केली आहे.
प्र. 3: या घडामोडीचा राजकीय परिणाम काय होऊ शकतो?
उ. 3: या बदलामुळे रत्नागिरीत आणि संपूर्ण कोकणातील राजकीय समीकरणात मोठा फरक पडू शकतो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.