Jitendra Awhad statement : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद आव्हाड यांच्या सनातनी दहशतवादीशी संबंधित भूमिकेवर भाजपचे आमदार नितेश राणे चांगलेच भडकले. ‘होय, सनातनी दहशतवाद मान्य करावाच लागेल! सनातनी दहशतवादाचे अस्तित्व आजचे नाही; तर, ते प्राचीन काळापासून आहे’, अशी पोस्ट आव्हाडांनी सोशल मीडियात केली आहे. राणेंला त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
नितेश राणे यांनीही रविवारी सोशल मीडियात पोस्ट केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, ‘हिंदू दहशतवाद’ किंवा ‘सनातनी दहशतवाद’ ही भाषा भारताच्या हिंदू आणि संत परंपरेला बदनाम करण्यासाठी तयार केलेली व्याख्या आहे. आधी सुशीलकुमार शिंदे मग पृथ्वीराज चव्हाण आणि आता जितेंद्र आव्हाड ती भाषा वापरत आहेत आणि हिंदू धर्माला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात.
जितेंद्र आव्हाड यांच्या या वक्तव्याशी शरद पवार साहेब आणि सुप्रियाताई सुळे सहमत आहेत का? राष्ट्रवादी शरद पवार गटाचीही भूमिका हीच आहे का? हे त्यांनी स्पष्ट करावं, असे राणे यांनी म्हटले आहे. खोट्या धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली केवळ हिंदू धर्म आणि संत परंपरेचा अपमान करायचा हाच आव्हाडांचा अजेंडा असतो. दहशतवाद हा हिंसेशी जोडलेला असतो, जिचा उद्देश लोकशाही, सहिष्णुता आणि समाजविरोधी कट रचणं असतो. सनातन हिंदू परंपरेचा इतिहास हा प्रश्नौत्तरं, संवाद, वैचारिक संघर्ष आणि लोकशाहीचं दर्शन आहे, असेही राणेंनी पोस्टमध्ये नमूद केले आहे.
‘सनातनी दहशतवाद’ हा शब्द वापरणं म्हणजे आपल्या इतिहासाची, हिंदू परंपरेची आणि सामाजिक क्रांतीच्या प्रवाहाची थट्टा करण्याचा प्रकार आहे. इथल्या हिंदू समाजानं तुमच्या ‘बाटग्या’ विचारांना कधी साथ दिली नाही आणि भविष्यातही ते देणार नाहीत. केवळ आपला एक मतदारसंघ सुरक्षित करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्राचे वाट्टोळे करू नका, अशी टीकाही राणेंनी केली आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, होय, सनातनी दहशतवाद मान्य करावाच लागेल ! सनातनी दहशतवादाचे अस्तित्व आजचे नाही; तर, ते प्राचीन काळापासून आहे. भगवान बुद्धाला छळणारे हे सनातनी दहशतवादीच होते. बौद्ध भिक्खूंना मारणारे तत्कालीन सनातनी दहशतवादीच होते. चार्वाकाला मारणारे सनातनी दहशतवादीच होते. बसवेश्वरांना मारणारे सनातनी दहशतवादीच होते.
संत ज्ञानेश्वरांना छळणारे सनातनी दहशतवादीच होते. संत तुकारामांचा छळ करून त्यांच्या गाथा बुडवणारे सनातनी दहशतवादीच होते. छत्रपती शिवाजी महाराज यांना राज्याभिषेक नाकारणारे, तुम्हाला राजे म्हणवून घेण्याचा अधिकारच नाही, असे म्हणत त्यांची हेटाळणी करणारे सनातनी दहशतवादीच होते, असे आव्हाडांनी म्हटले आहे.
शत्रूशी हातमिळवणी करून छत्रपती संभाजी महाराज यांच्या हत्येचा कट रचणारे सनातनी दहशतवादीच होते. त्यांना शत्रूच्या हातात पकडून देणारेही सनातनी दहशतवादीच होते. महात्मा फुलेंवर सामाजिक बहिष्कार टाकून त्यांच्या खुनाची सुपारी देऊन मारेकरी घालणारे सनातनी दहशतवादीच होते, असेही आव्हाड यांनी पोस्टमध्ये नमूद केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.