Mira Bhayandar SIR Voter list Controversy : निवडणूक आयोगाने नुकत्याच केलेल्या SIR मोहिमेनंतर मीरा-भाईंदर आणि ओवळा-माजीवडा मतदारसंघातून तब्बल २ लाख मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. हे मतदार बोगस असल्याचा दावा करण्यात येत आहे. आता यावरून नव्या वादाला तोंड फुटले असून, महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे.
या मतदार यादीतील तब्बल ५५% नावे ही बोगस किंवा बनावट होती, याच मतदारांच्या जोरावर भाजपने सत्ता मिळवली, असा आरोप मंत्री प्रताप सरनाईक यांनी केला आहे. ज्यावर भाजपने देखील प्रत्युत्तर दिलं असून, सरनाईकांचा दावा 'हास्यास्पद' असल्याचा घणाघात केला आहे. या आरोप-प्रत्यारोपामुळे महायुतीतील राजकीय वाद चव्हाट्यावर आला आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार राज्यात राबविण्यात आलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेअंतर्गत मीरा-भाईंदर (१४५) आणि ओवळा-माजीवडा (१४६) या दोन्ही मतदारसंघांत मतदार याद्या तयार करण्यात आल्या. त्या ३१ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या.
ज्यात या दोन्ही मतदारसंघांतील मीरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघात ५ लाख १४ हजार ९५० मतदारांपैकी ३ लाख १ हजार ९०५ नोंदी आढळून आलेल्या नाहीत. तसेच, ओवळा-माजीवडा मतदारसंघात २ लाख ९२ हजार ५३७ मतदारांपैकी १ लाख ४२ हजार ६६१ नोंदींची पडताळणी आवश्यक असल्याचे दिसून आले आहे.
यावरूनच आता महायुतीत एकत्र असणाऱ्या भाजप आणि शिवसेनेत आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. सरनाईक यांनी या मतदार यादीत स्थानिक पातळीवर घोळ झाल्याचा आरोप केला आहे. तसेच, मतदार यादीतील तब्बल ५५% नावे बनावट असल्याचा दावा केला आहे. तर, याच मतदारांच्या जोरावर भाजपने पालिका निवडणुकीत विजय मिळवला, असा आरोप देखील सरनाईक यांनी केला आहे.
महापालिका निवडणुकीच्या काळात आपण बोगस मतदारांबाबत आयुक्तांना सूचित केले होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. या चुकीच्या गोष्टींमुळे जनतेला आणि उमेदवारांना फसवण्यात आलं. यामुळेच आपला पराभव झाला, अन्यथा आमचा विजय निश्चित होता, असा दावाही सरनाईक यांनी केला आहे. तर, आता मागील गोष्टी मागे ठेवून आगामी निवडणुकीसाठी तयारी सुरू केल्याचेही सरनाईक म्हणाले.
दोन्ही मतदारसंघातील वगळण्यात आलेले सर्व मतदार हे पूर्णपणे बोगस होते, असा आरोप करत अर्ज दाखल केलेल्या मतदारांचे मॅपिंग होणे गरजेचं असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. तर, अद्याप या मॅपिंगवर सुनावणी होणे बाकी असून, यामध्येही बहुतांश मतदार बोगस असण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.
दरम्यान, आता सरनाईकांच्या आरोपानंतर स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, भाजप आणि शिंदेंची शिवसेना आमने-सामने आली आहे. तसेच, या वादामुळे महायुतीतील मतभेद पुन्हा चव्हाट्यावर आले असून, भाजपने हे सर्व आरोप आणि दावे फेटाळले आहेत. भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांनी प्रताप सरनाईक यांचे दावे आणि आरोप हे 'हास्यास्पद' असल्याचे म्हणत पलटवार केला आहे. सरनाईक स्वतः आणि त्यांचे खासदार देखील याच मतदार यादीवर निवडून आले आहेत. यामुळे आता ते स्वतः बोगस मतांवर निवडून आले का? असा सवाल देखील मेहता यांनी उपस्थित केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.