Jayant Patil Sarkarnama
कोकण

Gram Panchayat Election : जयंत पाटील यांना मोठा धक्का : स्वतःच्या गावातील ग्रामपंचायतही गमावली

रायगड जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत शेकापचा मोठा पराभव

सरकारनामा ब्यूरो

अलिबाग : शेतकरी कामगार पक्षाचा (PWP) गड मानल्या गेलेल्या रायगड (Raigad) जिल्ह्यातच पक्षाला मोठा धक्का बसला आहे. जिल्ह्यातील १६ ग्रामपंचायतीच्या (Gram panchyat) निवडणुकीचा (Election) निकाल सोमवारी (ता. १७ ऑक्टोबर) लागला. त्यात शेकापला केवळ दोनच ग्रामपंचायतीत यश मिळाले असून इतरत्र मोठी हार पत्कारावी लागली आहे. विशेष म्हणजे अलिबाग आणि पनवेल या गडातील हक्काच्या ग्रामपंचायतीत शेकापचा पराभव झाला आहे. शेकापचे आमदार जयंत पाटील (Jayant Patil) यांना आपली वेश्वी ग्रामपंचायतही गमवाली आहे. तसेच, एकनाथ शिंदे गटाचे महाडचे आमदार भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनाही या निवडणुकीत धक्का बसला आहे. (PWP's big defeat in Gram Panchayat elections in Raigad district)

रायगड जिल्ह्यातील सोळा ग्रामपंचायतींपैकी बाळासाहेबांची शिवसेनेने (शिंदे गट) चार ग्रामपंचायती जिंकल्या आहे. त्यानंतर शिवसेनेने (उद्धव बाळसाहेब ठाकरे) तीन ग्रामपंचायती ताब्यात घेतल्या आहेत. शेकापने दोन, राष्ट्रवादी आणि भाजपने प्रत्येकी एक ग्रामपंचायत जिंकली आहे. स्थानिक आघाड्यांनी पाच ठिकाणी विजय मिळविला आहे.

रायगड जिल्ह्यातील या १६ ग्रामपंचायती या स्थानिक विकास आघाडीच्या माध्यमातून लढण्यात आल्या आहेत. निकालानंतर सर्वच राजकीय पक्षांकडून ग्रामपंचायतींवर दावा करण्यात येत आहे. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट आघाडीवर आहे. मात्र, या गटाचेच आमदार भारत गोगावले यांचे मतदान असलेल्या खरवली ग्रामपंचायतीत त्यांना आपला सरपंच निवडून आणता आलेला नाही.

आमदार जयंत पाटील हे शेतकरी कामगार पक्षाचे महत्वाचे नेते मानले जातात. मात्र, त्यांनाही आपल्या गावातील ग्रामपंचायत राखता आलेली नाही. वेश्वी ग्रामपंचायतीवर अडीच वर्षे सोडता कायम जयंत पाटील यांचे वर्चस्व राहिलेले आहे. पनवेल तालुक्यातील खेरणे आणि अलिबाग तालुक्यातील नवगाव ग्रामपंचायतीमध्येही शेकापला शिकस्त खावी लागली आहे. शेतकरी कामगार पक्षाकडे तब्बल २५ वर्षांपासून असलेल्या खेरणे ग्रामपंचायतीत भारतीय जनता पक्षाने विजय मिळविला आहे.

दरम्यान, खालापूर तालुक्यातील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे वर्चस्व असल्याचे दिसून आले आहे. कारण तालुक्यातील चारही ग्रामपंचायतींमध्ये शिवसेनेने विजय मिळविला आहे. यातील काही ग्रामपंचायती या उरण विधानसभा मतदारसंघात येतात, त्यामुळे तो भाजपसमर्थक आमदार महेश बालदी यांनाही धक्का असल्याचे मानले जात आहे. याच बालदी यांनी चार दिवसांपूर्वीच आपण उद्धव ठाकरे यांनाही हरवू शकतो, असे उद्‌गार काढले होते. ते काही मतदारांना पटले नसल्याचे दिसून येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT