रायगड : रायगड जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. यंदाच्या खरीप हंगामात अनियमित पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले असून, आता जिल्ह्यातील आणखी 3 तालुके दुष्काळी जाहीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रोहा, तळा आणि माणगाव या तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश करण्यासाठी रायगड जिल्हा प्रशासनाने राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवला आहे. त्यामुळे या प्रस्तावाला शासनाकडून मंजुरी मिळणार का, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
यंदा पावसाच्या लहरीपणाचा मोठा फटका रायगड जिल्ह्यातील भातशेतीला बसला आहे. खरीप हंगामात अपेक्षित पाऊस न झाल्याने तसेच पावसाच्या अनियमिततेमुळे अनेक भागांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली. परिणामी शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
प्रशासकीय माहितीनुसार, रायगड जिल्ह्यातील 5 तालुक्यांमध्ये 33 टक्क्यांपेक्षा अधिक पीक नुकसान झाले आहे. या नैसर्गिक संकटाचा फटका तब्बल 21,489 शेतकऱ्यांना बसला आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासकीय मदत मिळावी, अशी मागणी जोर धरत आहे.
दरम्यान, सध्या रायगड जिल्ह्यात केवळ श्रीवर्धन तालुका दुष्काळी घोषित करण्यात आला आहे. मात्र, इतर तालुक्यांमधील शेतीच्या नुकसानीचा विचार करता रोहा, तळा आणि माणगाव या तीन तालुक्यांचाही दुष्काळी यादीत समावेश करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेतला आहे.
जिल्हा प्रशासनाने राज्य सरकारकडे प्रस्ताव सादर केल्यामुळे आता शासनाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास संबंधित तालुक्यांतील पात्र शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीत मिळणाऱ्या सवलती आणि मदतीचा मार्ग मोकळा होऊ शकतो. मात्र, अंतिम निर्णय राज्य सरकारकडूनच घेतला जाणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.