Raigad Assembly Constituency Delimitation News; Sunil Tatkare And NCP Leader Sudhakar Ghare Sarkarnama
कोकण

Sunil Tatkare : शिवसेनेला भिडणाऱ्या सुधाकर घारेंसाठी सुनील तटकरेंचा प्लॅन; आठव्या विधानसभा जागेचे संकेत देत दिले मोठे आश्वासन

Sunil Tatkare Plan For Sudhakar Ghare Political Future In Raigad : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी काहीच दिवसांपूर्वी लोकसंख्येच्या नुसार लोकसभा विधानसभेच्या जागा वाढल्या पाहिजेत अशी मागणी केली होती.

Aslam Shanedivan

Raigad Political News : रायगड जिल्ह्यात महायुतीमधील अंतर्गत मतभेद दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील संघर्ष आता अधिक तीव्र झाला आहे. यापूर्वी पालकमंत्रीपदावरून दोन्ही पक्षांमध्ये वाद निर्माण झाला होता. आता कर्जत तालुक्यातील प्रस्तावित टोरंट पॉवर प्रकल्प, इथेनॉल प्रकल्प आणि खालापूरमधील एका कारखान्याच्या मुद्द्यावरून दोन्ही पक्षांतील संघर्ष पुन्हा उफाळून आला आहे.

कर्जतचे शिवसेना आमदार महेंद्र थोरवे आणि अलिबाग-मुरुडचे आमदार महेंद्र दळवी हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांवर टीका करताना दिसत आहेत. दुसरीकडे, शिवसेना नेत्यांच्या टीकेला प्रत्युत्तर देण्याची भूमिका राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि पक्षाचे पदाधिकारी घेत आहेत. विशेषतः थोरवे यांच्या टीकेला घारे त्याच भाषेत उत्तर देत असल्याने रायगडमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

थोरवे आणि तटकरे यांच्यातील वादानेही आता टोक गाठले आहे. काही दिवसांपूर्वी महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादीचे आमदार अनिकेत तटकरे यांना राजीनामा देण्याचे खुले आव्हान दिले होते. तसेच, आपण आपल्या मुलाला निवडणुकीच्या मैदानात उतरवू, असेही त्यांनी म्हटले होते. विशेष म्हणजे, अनिकेत तटकरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना सुनील तटकरे स्वतः उपस्थित होते.

दरम्यान, सुधाकर घारे यांनीही थोरवेंना थेट प्रत्युत्तर दिले आहे. २०२९ च्या निवडणुकीची वाट पाहा, असा इशारा देतानाच, पक्षाचा एबी फॉर्म मिळाला नाही आणि सुनील तटकरे यांचा आशीर्वाद पाठीशी राहिला तरी आपण निवडणुकीसाठी तयार असल्याचे संकेत त्यांनी दिले. थोरवे यांनी तटकरे यांच्यावर जेव्हा जेव्हा टीका केली, तेव्हा तेव्हा घारे यांनी त्याला प्रत्युत्तर दिले आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांतील राजकीय संघर्षात घारे यांची भूमिका महत्त्वाची ठरत आहे.

या पार्श्वभूमीवर आता सुधाकर घारे यांच्यासाठी सुनील तटकरे यांनी नवा राजकीय डाव आखल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, हा निर्णय आगामी मतदारसंघ पुनर्रचना आणि महायुतीच्या राजकीय निर्णयांवर अवलंबून असणार आहे. काही दिवसांपूर्वी तटकरे यांनी लोकसंख्येच्या प्रमाणात लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांची संख्या वाढवण्याची मागणी केली होती. त्यानंतर माणगाव येथे बोलताना त्यांनी रायगड जिल्ह्याच्या संभाव्य विभाजनावर भाष्य केले होते. नवीन जिल्हा निर्माण झाल्यास माणगाव येथे मुख्यालय करण्याचा शब्दही त्यांनी दिला होता. त्यांच्या या विधानाची राज्यभर चर्चा झाली होती.

आता खोपोली येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या संवाद मेळाव्यात सुनील तटकरे यांनी सुधाकर घारे यांच्याबाबत महत्त्वाचे संकेत दिले. आगामी मतदारसंघ पुनर्रचनेत रायगड जिल्ह्याला आठवा विधानसभा मतदारसंघ मिळाल्यास त्या जागेसाठी महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांकडे सुधाकर घारे यांची उमेदवारी मागणार असल्याचे सूतोवाच त्यांनी केले. तटकरे यांनी जाहीरपणे दिलेल्या या संकेतांमुळे रायगडच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.

सध्या रायगड जिल्ह्यात सात विधानसभा मतदारसंघ आहेत. भविष्यात मतदारसंघ पुनर्रचनेनंतर जागांची संख्या वाढल्यास जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. नव्याने निर्माण होणाऱ्या मतदारसंघावर कोण दावा करणार आणि महायुतीकडून कोणाला उमेदवारी मिळणार, याबाबत आतापासूनच चर्चा सुरू झाली आहे.

याच पार्श्वभूमीवर तटकरे यांनी सुधाकर घारे यांच्यासाठी आठव्या विधानसभा मतदारसंघाची जागा मागण्याचे संकेत दिल्याने घारे यांच्या राजकीय भवितव्याबाबत उत्सुकता वाढली आहे. रायगडमधील महायुतीच्या राजकारणात घारे यांची वाढती भूमिका पाहता तटकरे यांचे हे विधान महत्त्वाचे मानले जात आहे. मात्र, रायगड जिल्ह्याला प्रत्यक्षात आठवा विधानसभा मतदारसंघ मिळणार का आणि तो निर्माण झाल्यास महायुतीकडून उमेदवारी कोणाला मिळणार, हे आगामी मतदारसंघ पुनर्रचना आणि राजकीय घडामोडींनंतरच स्पष्ट होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT