

Pune/Raigad Political News : पुणे जिल्हा परिषदेत दिवंगत अजित पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते पार पडले. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह इतर नेते उपस्थित होते. मात्र, या कार्यक्रमाकडे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ आणि हसन मुश्रीफ या प्रमुख नेत्यांनी पाठ फिरवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. यावरून आता नवा वाद सुरू झाला असून, तटकरे यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे.
पुणे जिल्हा परिषदेत दिवंगत अजित पवार यांचा अर्धाकृती पुतळा बसवण्यात आला. या दिमाखदार सोहळ्यात अनेक राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या. यावेळी सुनेत्रा पवार यांनी अजितदादांच्या आठवणींना उजाळा दिला. मात्र, या सोहळ्याला मंत्रिमंडळातील दत्ता भरणे वगळता राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीचे प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ आणि हसन मुश्रीफ या नेत्यांनी उपस्थिती लावली नाही.
यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हेही उपस्थित नव्हते. या अनुपस्थितीवरून चर्चांना उधाण आले असून, यावर दत्ता भरणे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. हा कार्यक्रम जिल्हा परिषदेचा असून, जिल्ह्यापुरता मर्यादित होता. त्यामुळे इतर कोणत्याही नेत्याला आमंत्रण नव्हते, असे भरणे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, विविध चर्चांच्या पार्श्वभूमीवर तटकरे यांनीही आपल्या अनुपस्थितीबाबत स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले, 'पुणे जिल्हा परिषदेचा हा कार्यक्रम एका मर्यादित जागेत म्हणजेच छोट्या हॉलमध्ये होता. त्यामुळे अनुपस्थितीचा मुद्दा येतच नाही.
तसेच, गेल्या ३० वर्षांपासून पाडव्याला मी बारामतीला जात असतो. दादांशिवाय दिवाळी अन् दादांशिवाय बारामती, अशा भावनेने मी बारामतीला गेलो. अपघात झालेल्या ठिकाणी अभिवादन केले. जिथे अंत्यसंस्कार झाले, तेथे गेलो. दादांच्या आईची आणि वहिनींची भेट घेतली.
पण आजचा कार्यक्रम हा जिल्हा परिषदेच्या इमारतीत दादांच्या अर्धाकृती पुतळ्याच्या अनावरणाचा होता. या कारणामुळे मी तेथे गेलो नाही. माझी अनुपस्थिती होती, पण त्यामुळे वेगळे काही कारण असल्याचा प्रश्नच नाही. दादांप्रति कमालीचा आदर कालही होता, आजही आहे आणि माझ्या जीवात जीव असेपर्यंतही तो कायम राहील,' असे स्पष्टीकरण तटकरे यांनी आपल्या अनुपस्थितीवर दिले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.