Raigad News : रायगड किल्ल्यावर सहा जूनला पार पडलेल्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यात सहभागी झालेल्या शिवप्रेमींच्या नैसर्गिक विधीचे चित्रीकरण करून ते समाज माध्यमांवर व्हायरल करण्यात आले आहे. यामुळे रायगडसह राज्यभर खळबळ उडाली असून व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या लौकिक गोळे यांच्या विरोधात महाड तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे अध्यक्ष फत्तेसिंह सावंत यांनी गुन्हा दाखल करण्याबाबतचे निवेदन पोलीस उपाधीक्षक शंकर काळे यांना शनिवारी (ता.२०) महाडमध्ये दिले होते. त्यांच्या तक्रारीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, रायगड किल्ल्यावर दरवर्षीप्रमाणे सहा जूनला शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याला लाखो शिवप्रेमी दाखल झाले होते. गडावर असणाऱ्या सुविधा मर्यादित असल्याने शिवप्रेमींची गैरसोय झाली होती. त्यामुळे काहीना नाईलाजाने रायगडावर इतरत्र नैसर्गिक विधी करावे लागले होते.
ही संधी साधून लौकिक गोळे यांनी ड्रोनच्या साह्याने गडावरील दाखल झालेल्या या शिवप्रेमींचे चित्रीकरण करून ते समाज माध्यमांवर प्रसारित केले. यामुळे रायगड किल्ल्याची प्रतिष्ठा, किल्ल्याला मिळालेला युनोस्को दर्जा व समितीची देखील बदनामी झाली आहे, अशा आशयाचे निवेदन समितीचे अध्यक्ष फत्तेसिंह सावंत यांनी आज महाडचे पोलीस उपाधीक्षक शंकर काळे यांना दिले.
तसेच अशा चित्रीकरणामुळे शिवप्रेमींच्या प्रतिष्ठेला धोका पोचल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे गोळे यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी लेखी तक्रारीद्वारे करण्यात आली होती. या तक्रारीची दखल घेत महाड तालुका पोलीस ठाण्यामध्ये लौकिक गोळे यांच्या विरोधात माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे कलम 66 ई अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक संदीप भोसले हे अधिक तपास करत आहेत.
मागील काही दिवसांपासून रायगड किल्ल्यावर सुरू असलेल्या गडसंवर्धनाच्या कामामध्ये अनियमितता असल्याचे तसेच शिवप्रेमींच्या गैरसोयीचे अनेक व्हिडिओ समाज माध्यमावर टाकून त्याला वाचा फोडण्याचे काम लौकिक गोळे यांच्याकडून केले जात आहे. त्यामुळे गेले काही दिवसांपासून गोळे व समितीमध्ये संघर्ष होत असल्याचे देखील पहावयास मिळत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.