
Amravati political news : राणा दाम्पत्य आणि बच्चू कडू यांच्यात चांगलाच राजकय वाॅर सुरू झाला आहे. बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांसमवेत सरकारविरोधात काळी दिवाळी साजरी करण्यावरून आमदार रवी राणा यांनी टिका करताना, आमदारकी मिळवण्यासाठी हा खटाटोप सुरू आहे, असा टोला लगावला होता.
बच्चू कडू यांनी रवी राणा यांना सुनावताना, 'तुमचा स्वाभिमान पक्ष, तर बायको भाजपमध्ये, त्यामुळे तु्म्ही अकलीचे घोडे कुठे नाचवता? किती ही लाचारी?,' अशा शब्दात 'प्रहार' केला आहे.
आमदार रवी राणा यांनी, बच्चू कडू यांच्यावर टिका करताना, केवळ आमदारकी मिळवण्यासाठी आंदोलन करत आहेत, शिवसेना (Shivsena) एकनाथ शिंदे यांना देखील माझं पुनर्वसन करा, यासाठी भेटले असल्याचा दावा केला. यावर बच्चू कडूंनी पलटवार करताना, राणा दाम्पत्याला झोंबेल असा प्रहार केला.
'दिवाळीच्या दिवशी राणा दाम्पत्याला लक्ष्मी आठवली नाही, श्रीराम आठवले नाहीत, बच्चू कडू मात्र आठवले. त्यामुळे किती अर्जंट कार्यक्रम देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी त्यांना पाठवला हे कळते. देवाभाऊंनी त्यांना सांगितलं असेल की, बच्चू कडू शेतकऱ्यांसाठी बोलत आहेत, त्यांना थांबवा. त्यामुळे हे किती शेतकरी विरोधी आहे, यावरून ते स्पष्ट होते,' असा निशाणा बच्चू कडूंनी साधला.
'मी तुमच्यासारखा लाचार नाही, आधी राष्ट्रवादीचा पाठिंबा, आता भाजपला पाठिंबा घेऊन उभे राहिले, बच्चू कडू मरेपर्यंत कोणाच्या ताकदीवर, कोणाच्या पाठिंब्याने आमदार होणार नाही, मी पडलो तरी चालेल पण स्वतः लढेल. तुमचा स्वाभिमान पक्ष असून तुम्ही संघटनेमध्ये अन् बायको भाजपमध्ये, तुम्ही अकलीचे घोडे कुठे नाचवता? तुम्ही सांगितलं पाहिजे मी संघटनेत का बरं? अन् माझी बायको भाजपमध्ये का? ही लाचारी आहे,' असा टोला बच्चू कडू यांनी लगावला.
'हे देवाभाऊचे गुलाम आहे, यांचं गुलामीचे आयुष्य आहे. वरून जसे टाईप कार्यक्रम येईल, तसे ते बोलत राहतील. तुमचे बाप अनेक असतील, पण बच्चू कडूचा बाप शेतकरी, दिव्यांग अन् अपंग आहे. ते आमच्यासाठी महत्त्वाचे आहे, तुमच्यासाठी देवाभाऊ महत्त्वाचा आहे. माझ्यावर टीका करून जर तुम्हाला चांगला खातं मिळत असेल, तर बरं आहे,' अशी टिप्पणी देखील बच्चू कडू यांनी केली.
नवनीत राणा या ज्यावेळी पहिल्यांदा निवडणूक लढल्या, तेव्हा मोदींना शिव्या घालत होत्या, आता मोदींची चापलूशी, चमचेगिरी करत आहे. उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे एकत्र का आले? त्यापेक्षा तुम्ही दोघे नवरा-बायको वेगळे का राहता? तुम्ही भाजपमध्ये आणि नवरा स्वाभिमानीमध्ये असं का? ते ही सांगितलं पाहिजे, असा प्रश्न बच्चू कडू यांनी केला.
'तिकडे निधी द्यायसाठी त्यांच्याकडे पैसे आहे, पण शेतकरी, लाडक्या बहिणीसाठी द्यायला त्यांच्याकडे पैसा नाही. आणि आता आमदारांना खुश करून पुन्हा त्याच्या माध्यमातून पैसा कमावण्याचा धंदा आहे,' असा घणाघात बच्चू कडू यांनी सत्ताधारी आमदारांना पाच कोटी निधी देण्यावर निशाणा साधला.
'भाजपा मित्र पक्षाला एक-एक करून हटवणार आहे, अजित पवारांचे काही आमदार फोडतील व काही एकनाथ शिंदे यांचे आमदार फोडतील, अन् सत्तेत येईल, यांची गरजच राहणार नाही, 'गरज सरो वैद्य मरो', ही नागापेक्षा सुद्धा विषारी जमात आहे,' असा हल्ला बच्चू कडू यांनी भाजपवर चढवला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.