Raigad Guardian Minister Political Controversy News : रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अखेर सुटला असून, हे पद शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांना मिळाले आहे. मात्र, आता महायुतीत वादाची ठिणगी पडली असून, माजी आमदार रामदास कदम आणि आमदार महेंद्र दळवी यांनी वादाची वात पेटवली आहे. ज्यानंतर खासदार सुनील तटकरे यांनी गोगावलेंना मिळालेल्या पालकमंत्रीपदात आपलाही पुढाकार असून, त्यात वाटा असल्याचे अलिबागमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले होते. या दाव्यावरून नव्या वादाला तोंड फुटले असतानाच, गोगावले यांनी परस्पर सहकार्य आणि मैत्रीपूर्ण वातावरण कायम ठेवण्याची भूमिका घेत, तटकरे यांचेही सहकार्य लाभल्याचे मान्य केले आहे. यामुळे रायगडच्या वादावर आता पडदा पडल्याचे बोलले जात आहे.
रायगडचे पालकमंत्रीपद मिळाल्यानंतर गोगावले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्याकडून शुभेच्छा मिळाल्या नसल्याचे म्हटले होते. ज्यानंतर तटकरे यांनी गोगावलेंना मिळालेल्या पालकमंत्रीपदात आपलाही पुढाकार असून, त्यात वाटा असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले होते.
या दाव्यानंतर आमदार महेंद्र दळवी यांनी तटकरे यांच्यावर टीकेची धार कायम ठेवत, "पालकमंत्रीपदाचे श्रेय कशासाठी घेताय? तुमच्यामुळेच ते रखडले होते," असा निशाणा साधला होता. त्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे महायुतीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद पुन्हा उफाळून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आमदार दळवी आणि तटकरे यांच्यातील वाद वाढण्याची शक्यता असतानाच, गोगावले यांनी वाद शांत करणारे वक्तव्य केलं आहे. त्यांनी रायगडचे पालकमंत्रीपद मिळविण्यासाठी खासदार तटकरे यांचेदेखील सहकार्य लाभल्याचे नमूद केले. तसेच विधान परिषद निवडणुकीत आपण अनिकेत तटकरे यांना सहकार्य केले होते. यापुढेही परस्पर सहकार्य आणि मैत्रीपूर्ण वातावरण कायम ठेवण्याची आपली भूमिका असेल, असेही ते म्हणाले. तसेच जिल्ह्यातील खासदार, मंत्री, आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, महापौर, नगराध्यक्ष तसेच अन्य सर्व लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन जिल्ह्याच्या विकासाला चालना देणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
रायगडच्या पालकमंत्रीपदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या काही काळापासून रस्सीखेच सुरू होती. विधान परिषदेच्या निवडणुकीतील तडजोडीनंतर अखेर रायगडचे पालकमंत्रिपदाची माळ भरत गोगावले यांच्या गळ्यात पडली. ज्यानंतर आक्रमक असणारे गोगावले आणि कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे काहीसे शांत झाले. एकीकडे जिल्ह्यातील नेत्यांसह तटकरे आपल्या सोबत असल्याचे गोगावले म्हणत आहेत. पण रामदास कदम आणि महेंद्र दळवी यांच्याकडून तटकरे यांच्यावर टीकेची धार कायम ठेवली आहे.
पालकमंत्रीपदाचे श्रेय घेणाऱ्या तटकरेंवर दळवींनी नाराजी व्यक्त करत टीका केली होती. तर पालकमंत्रीपदाचा निर्णय तटकरेंमुळेच रखडला होता, असा थेट आरोप दळवींनी केला होता. तसेच राष्ट्रवादी हा नेहमी खोडा घालणारा पक्ष असून, राष्ट्रवादीला आम्ही गणतीत पकडत नाही, अशी आक्रमक भूमिका दळवींनी घेतली होती. तसेच भाजप आणि आमचे विचार जुळतात, असे म्हणत थेट सूचक इशाराही दिला होता. यामुळे महायुतीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.