Konkan politics news : रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीतील अंतर्गत संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आला असून, या पदासाठी सुरू असलेल्या राजकीय हालचालींनी कोकणातील वातावरण तापले आहे.
अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी केलेल्या मोठ्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला नवा वेग मिळाला आहे.
विधान परिषद निवडणूक (MLC Election) बिनविरोध करण्याच्या प्रक्रियेदरम्यान वरिष्ठ नेतृत्वात झालेल्या चर्चेनुसार, 15 ऑगस्टपूर्वी फलोत्पादन मंत्री भरत गोगावले हे रायगडचे पालकमंत्री होतील, अशी शक्यता असल्याचे दळवी यांनी सूचित केले आहे. मागील चार वर्षांपासून पालकमंत्रिपद मिळवण्यासाठी गोगावलेंचा सातत्याने सुरू असलेला प्रयत्न अद्यापही अपूर्ण राहिला आहे.
दरम्यान, कोकणातील (Konkan) स्थानिक संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुनील तटकरे आणि गोगावले यांच्यातील राजकीय संघर्ष पुन्हा एकदा तीव्र झाल्याचे दिसून आले. या निवडणुकीत तटकरेंचे पुत्र अनिकेत तटकरे, तर गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले आणि दळवी यांची कन्या जुईली दळवी हे उमेदवार म्हणून समोर आले होते.
महायुतीतील या चुरशीच्या लढतीमुळे काही काळ राजकीय वातावरण तापले होते. मात्र नंतर झालेल्या घडामोडींमध्ये अनिकेत तटकरे बिनविरोध निवडून आले, तर विकास गोगावले आणि जुईली दळवी यांनी उमेदवारी मागे घेतली.
या संपूर्ण घटनाक्रमाचा संदर्भ देत महेंद्र दळवी यांनी स्पष्टपणे सांगितले की, रायगडच्या पालकमंत्रिपदावर शिवसेनेचा हक्क असून तो कधीही सोडला जाणार नाही. त्यांच्या या वक्तव्यामुळे महायुतीतील अंतर्गत समिकरणे पुन्हा चर्चेत आली आहेत.
याचदरम्यान, विधान परिषद निवडणुकीतील घडामोडी आणि वरिष्ठ पातळीवरील चर्चांचा संदर्भ देत, 15 ऑगस्टपूर्वी भरत गोगावले रायगडचे पालकमंत्री होतील, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे आता या पदावर अंतिम निर्णय कधी आणि कसा होतो, याकडे संपूर्ण कोकणासह राज्याचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.