Mumbai News : रायगडच्या पालमंत्रीपदावरुन शिवसेना आणि दिवंगत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत असून यावरून अनेकदा वाद ही पाहायला मिळाला होता. आता हा वाद संपण्याची शक्यता निर्माण झाली असून याबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनीच संकेत दिले आहेत. त्यांना याबाबत पत्रकारांनी विधीमंडळात प्रश्न केला असता ते बोलत होते.
सध्या राज्याचे विधीमंडळ सुरू असून पावसाळी अधिवेशासाठी नेते मंडळी मुंबईत आहेत. दरम्यान रायगडच्या पालमंत्रीपदावरुन मोठी माहिती समोर आली असून तटकरेंनी आपला दावा सोडल्याचे दिसत आहे. नुकताच याबाबत आमदार अनिकेत तटकरे यांनी मोठं विधान केलं होतं. ज्यानंतर आता तटकरे यांनी देखील यावर भाष्य केलं आहे. यामुळे रायगडच्या पालमंत्रीपदाचा तिढा सुटला असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.
अनिकेत तटकरे यांनी रायगड पालकमंत्री पदावरून विधान परिषदेच्या आमदारकीची शपथ घेतल्यानंतर वक्तव्य केलं. यावेळी जर पालकमंत्रीपद शिवसेनेला किंवा भरत गोगावले यांना जात असेल तर आमचं त्यांना सहकार्य असेल असे अनिकेत तटकरे म्हणाले. दरम्यान रायगड विधानपरिषदेच्या जागेच्या बदल्यात पालकमंत्री पद अशी तडजोड महायुतीत झाल्याची चर्चा आहे. तर याआधीच शिवसेनेचे आमदार व मंत्री भरत गोगावले यांनी पालकमंत्री पदावर दावा केला होता. तो अद्याप कायम आहे.
पण आता अनिकेत तटकरे यांच्या पाठोपाठ खासदार तटकरे यांनी देखील शिवसेनेसह भरत गोगावले यांना दिलासा देणारी माहिती दिली आहे. त्यांनी, रायगड पालकमंत्री पदावरून मोठं विधान करताना हा विषय लवकरच संपुष्टात आणला जाईल. आजच याबाबत एकनाथ शिंदे साहेबांशी चर्चा झाली आहे. आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबत बसून या विषयाला अंतिम स्वरूप दिलं जाईल, यामुळे हा मुद्दा लवकरच निकाली येईल असे सांगितले.
यावेळी पुन्हा एकदा सामच्या पत्रकार यांनी त्यांना प्रश्न केला की जर ही जागा शिवसेनेला सुटली तर राष्ट्रवादीची आणि तुमची भूमिका काय असेल? राष्ट्रवादी पालकमंत्री पदावरील दावा सोडत आहे का? यावर तटकरे यांनी माझ्यासारखी व्यक्ती हा विषय संपला असं बोलते, म्हणजेच महायुतीतील राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना यांनी एकत्रित बसून यावर निर्णय घेतलेला असेल, असे सांगितलं.
यामुळे आता तटकरे कुटुंबीयांनी रायगड पालकमंत्री पदावरील दावा सोडल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. तसेच रायगड विधानपरिषदेची जागा राष्ट्रवादीला सोडल्याने शिवसेनेचे आमदार व मंत्री भरत गोगावले हे पालकमंत्री होतील. रायगडमध्ये पालकमंत्री पदावरून सुरू असणारा मोठा वाद संपुष्टात येईल अशा शक्यता व्यक्त केल्या जात आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.