karjat khalapur political News : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोकणासह राज्यात मोठ्या घडामोडी होताना दिसत आहे. अनेक ठिकाणी शिवसेनेकडून झालेली बंडखोरी शमवण्यात आली आहे. यात कोकणातील रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग विधान परिषदेच्या जागेचा समावेश आहे. उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख यांच्या आदेशानंतर आमदार महेंद्र थोरवे यांच्या कन्येला माघार घ्यावी लागली आहे. यामुळे कोकणात एकीकडे शिवसेनेत नाराजी असतानाच आता पदाधिकारी कार्यकर्त्यांना गृहीत धरणे शिवसेनेच्या अंगलट आल्याचे चित्र आहे.
रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्यावर जळजळीत टीका करणारेच आमदार महेंद्र थोरवे यांनी तटकरेंशी जवळीक साधली आहे. यामुळे शिवसेनेत नाराजीचा स्फोट झाला असून खालापूर तालुकाप्रमुख संदेश पाटील यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. यामुळे आता कर्जत-खालापूरच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरल्याचे दिसत आहे.
रायगड जागेवरून एकीकडे एकनाथ शिंदे यांची शिवसेना आग्रही होती. कोकणातील तिन्ही जिल्ह्यांचा विचार केल्यास शिवसेनेचे मतदार अधिक आहेत. यामुळेच शिवसेनेकडून या जागेवर दावा करण्यात आला होता. एकाच वेळी मंत्री भरत गोगावले यांच्या मुलासह आमदार महेंद्र थोरवे यांची कन्या जुईली यांनी राष्ट्रवादीवर निशाना साधला होता. यामुळे इतर नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये या जागेवरून उत्साह दिसत होता. पण कर्जत-खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडून कोणतीही भूमिका समोर येत नव्हती.
दरम्यान शिंदे यांच्या आदेशानंतर अनिकेत तटकरे यांचा मार्ग मोकळा झाला आणि अर्ज भरताना आमदार महेंद्र थोरवे सुनील तटकरे यांच्यासोबत दिसले. जे थोरवे तटकरेंवर दात खाऊन टीका करत होते तेच आता तटकरेंच्या चिरंजीवाचा अर्ज भरताना हजर होते. यामुळे कर्जत-खालापूरच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. तसेच थोरवे-तटकरे यांच्यातील दिलजमाईचे फोटोही समाज-माध्यमांवर व्हायरल झाले.
यामुळे नेत्यांसाठी एकमेकांची डोके फोडून घेणाऱ्या दोन्ही पक्षांतील कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली. तर शिवसेनेत या नाराजीचा उद्रेक झाला. खालापूर तालुकाप्रमुख संदेश पाटील यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला. त्यांनी थोरवेंच्या भूमिकेमुळेच पक्षाला रामराम करण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले.
याबाबत संदेश पाटील यांनी निवेदन प्रसिद्ध केलं असून त्यात त्यांनी, थोरवेंच्या भूमिकेवर संताप व्यक्त केला आहे. त्यांनी, महायुतीच्या राजकीय धोरणावर तीव्र नाराजी व्यक्त करत तटकरे यांनी पूर्वी जिल्ह्यातील शिवसेनेच्या आमदारांना राजकीयदृष्ट्या अडचणीत आणले. पण आता मुलाच्या उमेदवारीसाठी ते शिवसेना आमदारांना शब्द देताना, त्यांच्याशी जुळवून घेताना दिसत आहे. यातूनच आता दोन्ही पक्षातील स्थानिक कार्यकत्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.
लोकसभा निवडणुकीत महायुतीचा आदेश पाळत शिवसैनिकांनी तटकरेंचा प्रचार केला त्यांना निवडून आणले. तसेच पण विधानसभा निवडणुकीत कर्जत-खालापूरमध्ये तटकरेंच्या राष्ट्रवादीने अपक्ष उमेदवाराला छुपा पाठिंबा दिला. पण शिवसैनिकांनी मोठा संघर्ष करत महेंद्र थोरवेंना विधानसभा निवडणुकीत निवडून आणले असाही दावा संदेश पाटील यांनी केला आहे.
तसेच आता तटकरे-थोरवेंच्या या दोस्तीमुळे आता स्थानिक पातळीवर कार्यकत्यांना उत्तर देणे कठीण झाल्यानेच आपण तालुकाप्रमुख पदाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. तसेच सर्वसामान्य शिवसैनिकांना थोरवेंची ही भूमिका मान्य नाही, असेही संदेश पाटील यांनी म्हटलं आहे. आता या राजीनाम्यामुळे कर्जत-खालापूरमधील शिवसेनेतील अंतर्गत खदखद चव्हाट्यावर आली असून आमदार महेंद्र थोरवे यांच्याविरोधात स्पष्ट नाराजी उघड होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.