

Mumbai News : राज्यातील राज्यसभेच्या सात जागेसाठी सातच उमेदवार रिंगणात उतरले असल्याने राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे निश्चित झाले आहे. त्यामुळे गेल्या चार दिवसापासून उमेदवारी मिळवण्यासाठी सर्वच पक्षात जोरदार रस्स्सीखेच पाहवयास मिळत होती. मात्र दोन दिवसापासून सर्वच पक्षाचे उमेदवार जाहीर झाले. त्यामुळे सर्वच पक्षात नाराजीचा सूर आवळला जात आहे. त्यातच सर्वात जास्त इच्छुक भाजपमध्ये होते. जवळपास 25 जणांची नावे भाजपच्या केंद्रीय समितीकडे पाठवण्यात आली होती मात्र धक्कातंत्राचा वापर करीत चार पैकी तीन नावे पहिल्यादाच राज्यसभेसाठी जाहीर केले. त्यामुळे दुसरीकडे नेतेमंडळींकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. बऱ्याच नेतेमंडळीचा अपेक्षाभंग झाला आहे.
राज्यसभेची संधी नाकारण्यात आल्यानंतर भाजपच्या (Bjp) नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांनी उमेदवारी नाकारल्यानंतर बुधवारीच त्यांच्या भावनांना पहिल्यांदा ट्विट करीत वाट मोकळी केली होती. त्यानंतर आता शुक्रवारी दुसऱ्यांदा भावनिक पोस्ट करीत नाराजी व्यक्त केली आहे. राज्यसभेसाठी भाजपची उमेदवारी नवनीत राणा यांना नक्कीच मिळेल, अशी खात्री त्यांच्या समर्थकांना होती. पण, त्यांचा अपेक्षाभंग झाला.
नवनीत राणा (Navneet Rana) यांना संधी नाकारल्यानंतर समाजमाध्यमांवर भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. संघर्ष आपल्यासाठी नवीन नसल्याचे सांगितले होते. शुक्रवारी पुन्हा एकदा त्या समाजमाध्यमावर व्यक्त झाल्या आहेत. त्यात त्यांनी ‘निष्ठेने पुढे चला, प्रत्येक गोष्ट शक्य आहे’, असा आशावाद व्यक्त केला आहे. राणा यांनी अद्याप उघडपणे सर्व घडामोडींवर प्रतिक्रिया व्यक्त केली नसली, तरी समाज माध्यमांवरील त्यांच्या संदेशातून लोकसभा निवडणुकीतील पराभवाचे शल्य कायम असल्याचे दिसत आहे.
समाजमाध्यमांवर त्यांनी हिंदी भाषेतून भावना मांडल्या आहेत. “हर बितता वक्त तुम्हे यह याद दिला रहा है, अगर तुम कामयाब नही हुए, तो कोई तुम्हारा नही होता”, अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे. नवनीत राणा म्हणतात, ‘सरणारा प्रत्येक क्षण तुला हीच आठवण करून देत आहे, की जर तू यशस्वी झाला नाहीस, तर कोणीही तुझे नसते. तरीही मेहनत करा, निष्ठेने पुढे चला, प्रत्येक गोष्ट शक्य आहे.
उमेदवारी न मिळाल्याने भावनिक झालेल्या नवनीत राणांनी संघर्ष ही माझ्यासाठी नवीन गोष्ट नाही, मी कुठल्याही वळणावरून नवीन सुरूवात करू शकते, अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. नवनीत राणा 2019 मध्ये अमरावती लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस, राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर निवडून आल्या होत्या. पण, लगेच त्यांनी नरेंद्र मोदी सरकारला पाठिंबा देत, काँग्रेसची साथ सोडली. काँग्रेस, राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का होता. 2024 मध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र, नेहमी ‘धक्कातंत्रा’चा वापर करणाऱ्या भाजपने नवनीत राणा यांना यावेळी संधी नाकारली आणि राणा समर्थकांना दुसरा धक्का बसला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.