Raigad Bulk Drug Park Controversy : रायगडच्या राजकारणात सध्या शिवसेना आमदार विरूद्ध राष्ट्रवादी आमदार-खासदार असा संघर्ष पेटला आहे. आमदार महेंद्र थोरवे आणि आमदार महेंद्र दळवी तटकरेंवर टीका करताना दिसत आहेत. तर पालकमंत्री भरत गोगावले आणि विधान परिषदेचे आमदार अनिकेत तटकरे जाहिर सभेत एकत्र दिसत आहेत. तर यावेळी गोगावले यांनी ग्रामस्थांच्या मागणीसाठी दंड थोपटत'पालकमंत्रीपद पणाला लावावे लागले तरी मागे हटणार नाही', असे वक्तव्य केलं आहे.
जिल्ह्यातील शिवसेनेचे आमदार तटकरे कुटुंबियांवर टीका करताना दिसत आहेत. तसेच खासदार तटकरे यांना थेट इशारा देत आमच्याकडे देखील उमेदवार असल्याचे सांगत आहेत. दरम्यान आपल्याला मिळालेल्या रायगडच्या पालकमंत्रीपदाचं श्रेय गोगावले यांनी तटकरेंना दिले. तसेच रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जी संधी मिळाली मध्ये सिंहाचा वाटा अनिकेत तटकरेंचा असल्याचे सांगितले.
त्यांना आम्ही बिनविरोध निवडून दिल्यामुळेच आम्हाला पालकमंत्रीपद बिनविरोध मिळाल्याचे त्यांनी सांगितले होते. यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. तर आता रायगडच्या राजकारणात वेगळेच वारे वाहू लागले असल्याचं चित्र असल्याचे बोलले जातत होते. अशातच माणगाव तालुक्यातील कडापे येथे जाहिर सभेत गोगावले आणि अनिकेत तटकरे एकत्र आले.
नेमकं कारण काय?
माणगाव तालुक्यात बल्क ड्रग्ज प्रकल्प होऊ घातला आहे. या रासायनीक कारखान्यामुळे परिसराचं नुकसान होणार असून यासाठी 21 गावातील ग्रामस्थांनी एल्गार केला आहे. तर या बल्क ड्रग्ज पार्कविरोधात ग्रामस्थांनी महाड विधानसभा मतदारसंघातील काळकाई बापूजी देवस्थानच्या प्रांगणात जाहिर सभा घेऊन विरोधाची भूमिका घेतली आहे.
यावेळी गोगावले यांनी तालुक्यातील प्रस्तावित बल्क ड्रग पार्कच्या मुद्द्यावरून स्थानिक नागरिक व संघर्ष समितीचा विरोध तीव्र झाला आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्रिपद पणाला लागले तरी चालेल, मात्र बल्क ड्रग पार्क होणार नाही. प्रकल्प रद्द होईपर्यंत मी तुमच्या संघर्षात ढालीसारखा उभा राहीन, अशी ग्वाही दिली.
त्यांनी उपस्थितांसमोर बापूजी काळकाई मातेची शपथ घेत आपली भूमिका स्पष्ट केली. गोगावले म्हणाले, की ज्या जनतेने मला सलग चार वेळा निवडून दिले, त्या जनतेमुळेच मला मंत्रिपद आणि रायगडचे पालकमंत्रिपद मिळाले आहे. त्यामुळे याच जनतेच्या प्रश्नासाठी पदाची कोणतीही किंमत मोजावी लागली तरी मी मागे हटणार नाही.
हा प्रश्न केवळ एका गावाचा किंवा एका तालुक्याचा नाही; आपल्या पुढील पिढ्यांच्या भवितव्याचा आहे. बल्क ड्रग पार्कचा प्रस्ताव रद्द करण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन देत पालकमंत्रिपदापेक्षा जनतेचा प्रश्न महत्त्वाचा असल्याचे सांगत या प्रश्नावर तडजोड न करण्याची भूमिका गोगावले यांनी सभेत मांडली. तसेच गणेशोत्सवानंतर उद्योग मंत्री उदय सामंत, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक घेऊन विषय मार्गी लावण्याचा शब्द गोगावले यांनी उपस्थित प्रकल्पग्रस्त आंदोलक ग्रामस्थांना दिला.
संघर्ष समितीचा एल्गार
बल्क ड्रग पार्कविरोधी संघर्ष समितीच्या वतीने आयोजित या एल्गार सभेत परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत आपली भूमिका मांडली. प्रस्तावित प्रकल्पामुळे परिसरातील पर्यावरण, शेती, पाणी आणि स्थानिक जीवनमानावर परिणाम होण्याची शक्यता असल्याची चिंता सभेत व्यक्त करण्यात आली. या पार्श्वभूमीवर संघर्ष समितीने आपला लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला. स्थानिकांच्या हिताचा विचार करून शासनाने या प्रश्नावर निर्णय घ्यावा, अशी मागणीही सभेत करण्यात आली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.