Raigad News : रायगड जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मोठी घडामोड घडली असून, माणगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला जोरदार प्रत्युत्तर दिल्याची चर्चा सुरू आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या पक्षप्रवेशानंतर आता शिवसेनेसह इतर पक्षांमधील शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीनेही शिवसेनेला जोरदार प्रत्युत्तर दिल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
गेल्या आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे पेण विधानसभा मतदारसंघाचे कार्याध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे प्रमोद म्हसकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता.
सुनील तटकरे यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या रोहा तालुक्यात झालेल्या या पक्षप्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला रायगडमध्ये मोठा राजकीय धक्का बसल्याचे मानले जात होते. म्हसकर यांच्यासोबत शेकडो कार्यकर्त्यांनीही शिवसेनेचा भगवा हाती घेतला होता. त्यानंतर जिल्ह्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजकीय स्पर्धा दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र समोर आले आहे.
आगामी नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आपापली ताकद वाढवण्यास सुरुवात केली आहे. एकमेकांच्या कार्यकर्त्यांना पक्षात घेण्यासाठी दोन्ही पक्षांकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, माणगावमध्ये शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा राजकीय धक्का दिला आहे. सुनील तटकरे यांचे खंदे समर्थक आणि माणगाव नगरपंचायतीतील माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नाराज पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने माणगावमधील राजकीय समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. आगामी नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या पक्षप्रवेशामुळे सुनील तटकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे.
माणगावमधील माजी नगरसेवक संदीप खरगटे, दिलीप जाधव, जयंत बोरडे, रत्नाकर उभारे, भाग्यश्री यादव आणि माजी उपनगराध्यक्ष निलिमा मेहता यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला. मंत्री भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी आणि जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. विशेष म्हणजे, सुनील तटकरे यांचे समर्थक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेत्यांनी पक्ष सोडल्याने जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. यामुळे रायगडमधील राजकीय वातावरणही चांगलेच तापले आहे.
अशातच अवघ्या एका आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे. शिवसेनेसह इतर पक्षांमधील शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशामुळे राष्ट्रवादीने शिवसेनेला जोरदार प्रत्युत्तर दिल्याची चर्चा असून, शिवसेनेच्या वाढत्या राजकीय वर्चस्वाला आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे. राष्ट्रवादीने अवघ्या आठवडाभरात राजकीय चित्र बदलण्याचा प्रयत्न केला आहे.
एकीकडे आगामी नगरपंचायत निवडणुकीत आपले वर्चस्व कायम ठेवण्यासाठी दोन्ही पक्षांकडून जोरदार तयारी केली जात आहे. तर दुसरीकडे हे दोन्ही पक्ष महायुतीचा भाग असतानाही माणगावमध्ये एकमेकांसमोर राजकीय ताकद दाखवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत कोणत्या पक्षाचे पारडे जड ठरणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.