राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर मतदार याद्यांमध्ये घोळ केल्याचा गंभीर आरोप केला.
या आरोपांवर भाजप नेते नितेश राणे यांनी टोलेबाजी करत टीका केली होती.
नितेश राणेंच्या टीकेला मनसे नेते संदीप देशपांडे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं, ज्यामुळे मनसे-भाजप वाद चिघळला आहे.
Mumbai News : निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या मतदार याद्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुकीनंतर घोळ केला. तब्बल 96 लाख बोगस मतदार भरल्याचा खळबळजनक आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. या आरोपानंतर आता नवा वाद उभा राहिला असून सत्ताधारी भाजपकडून राज ठाकरे यांचा खरपूस समाचार घेतला जात आहे.
भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी राज ठाकरे यांच्या आरोपांवर टीका करताना जिव्हारी लागणारा टोला लगावला. त्यांनी म्हटलं की, “राज ठाकरे यांची काल सभा झाली. ते अभ्यासू नेते आहेत आणि मुद्देसूद बोलतात. पण आता ते वोट चोरीवर बोलत आहेत. त्यांनी मोहल्ल्यांमध्ये जाऊन मतदार याद्या तपासाव्यात.” अशी बोचरी टीका नितेश राणे यांनी केली होती.
तसेच नितेश राणे म्हणाले, “राज ठाकरे म्हणतात तसे वोट चोरीचे आरोप लोकसभेनंतर का झाले नाहीत? राज ठाकरेही आता उद्धव ठाकरेंचीच भाषा बोलत आहेत. आता त्यांना हिंदू मतदार यादी तपासायची आहे. पण त्याआधी त्यांनी मालेगाव, बहरमपाडा आणि नळ बाजार येथे कधी जाणार हे सांगावे. राज साहेबांनी उद्धव ठाकरेंच्या नादी लागू नये,” असे आवाहन करत नितेश राणे यांनी राज ठाकरेंना सल्ला दिला आहे. तसेच, “सगळ्यात आधी त्यांनी मतदार याद्या मोहल्ल्यांमध्ये जाऊन तपासाव्यात,” असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
या वक्तव्यांनंतर मनसे आणि भाजप असा वाद सुरू झाला आहे. नितेश राणे यांनी केलेली टीका मनसेच्या जिव्हारी लागली आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
देशपांडे म्हणाले, “नितेश राणेंच्या मेंदूचा किंवा भाजपचा हा प्रॉब्लेम आहे. हिंदू मतदार आणि मुस्लिम मतदार असा भेद नितेश राणेंच्याच डोक्यात आहे. त्यामुळेच ते ‘उचलली जीभ अन् लावली टाळ्याला’ असे वागत आहेत. आमच्यासाठी मतदार म्हणजे मतदार, आणि आमच्यासाठी फक्त बोगस मतदार हा मुद्दाच महत्त्वाचा आहे. हा घोळाचा विषय लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या वेळी एकाच वेळी घडला आहे.”
ते पुढे म्हणाले, “नितेश राणेंना त्यांच्या रेफरन्ससाठी गरज पडल्यास आचार्य अत्रे यांचं पुस्तक पाठवावं लागेल. राज साहेब हे स्वतःच्या विचारांनी चालतात, इतरांच्या नाहीत. त्यामुळे राणेंसारखे आम्ही विविध कुबड्या बदलत नाही. आता आम्ही कणकवलीतही याद्या तपासू,” असा इशाराही देशपांडे यांनी दिला.
ते पुढे म्हणाले, “कधी काँग्रेस, कधी भाजप, आधी संघावर टीका करायची आणि आता त्यांचीच चड्डी घालायची, असं काम नितेश राणे करत आहेत.” देशपांडे यांनी भाजपवर प्रश्न उपस्थित करत म्हटलं, “आम्ही निवडणूक आयोगाला प्रश्न विचारतो आहोत, मग भाजपला राग का येतो?आम्ही अदानी-अंबानी यांच्या नावाने प्रश्न विचारले तरी भाजपला राग का येतो? या दोघांशी भाजपचा नेमका संबंध काय आहे, हे त्यांनी आधी स्पष्ट करावं,” अशी तीव्र टीका संदीप देशपांडे यांनी केली.
1. राज ठाकरे यांनी कोणता आरोप केला आहे?
राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील मतदार याद्यांमध्ये 96 लाख बोगस मतदार भरल्याचा आरोप केला आहे.
2. नितेश राणे यांनी काय प्रतिक्रिया दिली?
नितेश राणे यांनी राज ठाकरे यांच्या आरोपांवर टोलेबाजी करत, “मतदार याद्या स्वतः तपासा,” असा सल्ला दिला.
3. मनसेने या टीकेवर कसा प्रतिसाद दिला?
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी नितेश राणेंवर जोरदार हल्ला करत, “आमच्यासाठी मतदार म्हणजे मतदार, हिंदू-मुस्लिम भेद आम्ही करत नाही,” असं म्हटलं.
4. या वादामुळे काय घडले?
या आरोप-प्रत्यारोपांमुळे मनसे आणि भाजप यांच्यात राजकीय वाद पेटला आहे.
5. राजकीय पातळीवर याचा काय परिणाम होऊ शकतो?
या वादामुळे महाराष्ट्रातील आगामी निवडणुकीपूर्वी राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.