Nitesh Rane, Rajan Teli, Nilesh Rane, Narayan Rane Sarkarnama
कोकण

Rajan Teli News : राजन तेलींचा राणेंवर जिव्हारी लागणारा घाव; एका भावाला शिंगावर घेत दुसऱ्याला गोंजारले...

Rajan Teli’s Attack on Narayan Rane Creates Political Stir in Konkan : निवडणुकीत पराभव झाल्यानंतर राजन तेलींनी वर्षभराच्या आतच उद्धव ठाकरेंना सोडत एकनाथ शिंदेंच्या छत्रछायेखाली येण्याचा निर्णय घेतला. इथेही त्यांनी राणेंची पाठ सोडलेली नाही.

Rajanand More

Criticism of Nitesh Rane — Praise for Nilesh Rane : कोकणामध्ये पुन्हा एकदा नारायण राणे विरूध्द राजन तेली हा वाद पाहायला मिळणार असल्याचे संकेत खुद्द तेलींनीच दिले आहेत. दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर चार दिवसांतच तेलींनी भाजप खासदार नारायण राणे यांचे पुत्र मंत्री नितेश राणे यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यानंतर काही तासांतच त्यांनी सोशल मीडियात नितेश यांचे बंधू व शिंदेंच्या शिवसनेतील आमदार निलेश राणे यांच्यासोबतचा फोटो पोस्ट केला. तेलींचे याच्या या ‘पॉलिटिक्स’ने सगळ्यांनाच कोड्यात टाकले आहे.

राजन तेली हे माजी आमदार आहेत. कधीकाळी ते अखंड शिवसेनेमध्ये नारायण राणे यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत होते. राणेंनी सेना सोडल्यानंतर तेही त्यांच्यासोबत बाहेर पडले आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर राणेंसोबत ते भाजपमध्ये गेले. मागील वर्षीच विधानसभा निवडणुकीआधी त्यांनी भाजपमधून बाहेर पडताना नारायण राणे यांच्यासर नितेश राणे यांच्यावरही जोरदार टीका केली होती. राणेंसोबत शिवसेना सोडून चूक केल्याचं मोठं विधान त्यांनी केलं होत. त्यानंतर निवडणुकीत राणे विरूध्द तेली असा संघर्ष पाहायला मिळाला.

निवडणुकीत पराभव झाल्यानंतर तेलींनी वर्षभराच्या आतच ठाकरेंना सोडत शिंदेंच्या छत्रछायेखाली येण्याचा निर्णय घेतला. इथेही त्यांनी राणेंची पाठ सोडलेली नाही. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील कथित कर्ज वाटप घोटाळाप्रकरणात राजन तेली यांच्यावर आरोप होत आहेत. त्याची तक्रारही झाली आहे. यातून वाचण्यासाठीच ते शिंदेसोबत गेल्याची चर्चा राजकीय वर्तूळात आहे. आता राज्याच्या सत्तेत असलेल्या शिंदेंसोबत आल्यानंतर तेली यांनी पुन्हा राणेंना डिवचले आहे.

बँक घोटाळ्यातील सुत्रधार नितेश राणे असल्याचा गंभीर आरोप तेलींनी सोमवारी केला. या आरोपांमुळे कोकणात खळबळ उडाली आहे. खरंतर तेलींचे हे आरोप म्हणजे थेट नारायण राणे यांनाच टार्गेट केल्यासारखे आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नारायण राणे यांचा निर्विवाद दबदबा आहे. त्यांच्या मुलावर आरोप करत तेलींनी थेट त्यांनाच आव्हान दिल्याचे मानले जात आहे. पण हे करत असताना तेलींनी त्यांचे दुसरे पुत्र आमदार निलेश राणे यांना मात्र गोंजारले आहे.

मंत्री नितेश यांच्यावर टीका केल्यानंतर तेली यांनी सोशल मीडियात निलेश यांच्याविषयी एक पोस्ट केली आहे. त्यांच्यासोबतचा एक फोटो पोस्ट करत तेलींनी म्हटले आहे की, ‘2 ऑक्टोबर 2025 रोजी, दसरा मेळाव्याच्या कार्यक्रमात मी शिवसेना, शिंदे गटात प्रवेश केला. त्या प्रसंगी मला आदरणीय आमदार निलेश राणे साहेब यांचा अमूल्य पाठिंबा लाभला.’

दसरा मेळावा उलटून गेल्यानंतर चार दिवसांनी त्यांनी ही पोस्ट केली आहे. बंधू नितेश यांच्यावर टीका केल्यानंतर आलेल्या पोस्टने चर्चेला उधाण आले आहे. एका भावावर वार करत असताना दुसऱ्या भावाला खांद्यावर घेऊन मिरविणाऱ्या राजन तेली यांच्या मनात नेमके काय सुरू आहे, याची चर्चा कोकणात रंगली आहे.   

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT