Konkan mango farmers aid : कोकणातील आंबा-काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या मदतीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी राज्य सरकारविरोधात आक्रमक झाले आहेत.
'भीक आम्ही स्वीकारणार नाही. सरकारच्या मानगुटीवर बसून पाच हजार रूपयांची मदत पदरात पाडू घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही,' असे इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील वर्षा बंगल्यावर धडकण्याचा इशारा दिला आहे.
रत्नागिरी इथल्या शेतकरी (Farmer) मेळाव्यात, राजू शेट्टी चांगलेच आक्रमक झाले होते. ते म्हणाले, "कोकणचा हापूस देशाला 1300 कोटींचे परकीय चलन मिळवून देतो; पण आज तोच शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभा आहे. कोकणातील आंबा-काजू उत्पादकांना झाडामागे अवघे 220 रुपये देऊन सरकार त्यांची क्रूर थट्टा करत आहे."
कोकणातील शेतकरी नैसर्गिक परिस्थितीपुढे हतबल झाले आहेत. त्यांच्या अस्तित्वाची लढाई म्हणून मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहोत, असे राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी सांगितले.
'कोकणातील आंबा, काजू उत्पादन धोक्यात आल्याने कोकणातील शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी मोर्चे, आंदोलने केली. सरकारने जाहीर केलेली हेक्टरी 22 हजार रुपये मदत अतिशय तुटपुंजी आहे. आंब्याला प्रतिझाड पाच हजार व काजूसाठी प्रतिझाड तीन हजार रुपये मदत केलीच पाहिजे,' अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली.
30 जूनपूर्वी आंबा-काजू उत्पादकांचे संपूर्ण कर्ज माफ व्हायला पाहिजे. पिकविम्याची रक्कम त्वरित बागायतदारांच्या खात्यात जमा करावी आणि परराज्यातील आंबा 'हापूस' म्हणून विकणाऱ्यांवर कडक कारवाई करा, अशी प्रमुख मागणी राजू शेट्टी यांनी लावून धरली आहे.
लक्ष्मी ऑरगॅनिक आणि बॉक्साईट माफियांच्या माध्यमातून कोकणची जमीन दिल्लीवाल्यांच्या घशात घालण्याचे कारस्थान सुरू आहे. मच्छिमारांना डिझेल महाग आणि शेतकऱ्याला तुटपुंजी मदत, ही सत्ताधाऱ्यांसाठी शरमेची बाब आहे. भविष्यातील पिढीला वाचवण्यासाठी आता रस्त्यावर उतरावेच लागेल, असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे माजी खासदार विनायक राऊत यांनी दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.