Ramdas Kadam
Ramdas Kadam Sarkarnama
कोकण

रामदास कदमांचा पत्ता विधान परिषदेतूनही होणार कट!

सरकारनामा ब्यूरो

चिपळूण : शिवसेना नेते, आमदार रामदास कदम यांचा विधान परिषदेतील कालावधी डिसेंबरअखेर संपणार आहे. पक्षाकडून त्यांना पुन्हा मुदतवाढ मिळण्याची शक्यता नाही. प्रकृतीच्या कारणामुळे कदम सध्या राजकारणातून अलिप्त आहेत, त्यामुळे कदम यांच्या जागी शिवसेना नव्या चेहऱ्याला संधी देणार, हे निश्चित झाल्याची माहिती शिवसेनेच्या सूत्रांकडून मिळाली. (Ramdas Kadam will not get the candidature for the Legislative Council)

आमदार कदम विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते असताना २००९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा गुहागर विधानसभा मतदारसंघात माजी मंत्री भास्कर जाधव यांनी पराभव केला होता. त्यानंतर मुंबई स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून शिवसेनेने त्यांना विधान परिषदेवर पाठविले. गेली बारा वर्षे ते या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात ते पर्यावरण खात्याचे मंत्री होते. मात्र, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात त्यांना मंत्रिपदाची संधी मिळाली नाही. निर्णय प्रक्रियेतही त्यांना विश्वासात घेतले जात नाही, त्यामुळे ते सध्या नाराज आहेत.

प्रकृती अस्वस्थ्याचा त्रास

शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यात त्यांना प्रवेश मिळणार नाही, अशी चर्चा असताना कदम यांनी मुख्यमंत्र्यांना सहा पानी पत्र लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या. पक्षातील नवे लोक कसे त्रास देत आहेत, याची माहिती त्यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना दिली होती. त्यात त्यांनी प्रकृती ठीक नसल्याचेही कारण दिले होते. त्यामुळे मुंबई स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून आमदार कदम यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता कमी आहे.

मुख्यमंत्री नाराज असल्याची चर्चा

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेचे नेते आणि परिवहनमंत्री अनिल परब यांच्यावर बेकायदा बांधकामाचे गंभीर आरोप केले आहेत. त्या संदर्भात सोमय्या यांना मंत्री परब यांच्याविरोधात कदम यांनीच माहिती पुरवली, असा गंभीर आरोप कदम यांच्यावर झाला आहे. या प्रकरणी एक ऑडिओ क्लिपही समाजमाध्यमांत फिरत होती. या प्रकारामुळे पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री ठाकरे हे कदम यांच्यावर नाराज असल्याची चर्चा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT