Narayan Rane, Nilesh Rane And Nitesh Rane Sarkarnama
कोकण

Rane Politics : कोणी किती बी करू दे तळकोकणा हवा फक्त राणेंचीच; भाजपचे विरोधकच संपवले

zilla parishad panchayat samiti election results : सिंधुदुर्गच्या कणकवली तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांवर राणेंचा दबदबा असल्याचे आता निकालानंतर सिद्ध झाले आहे.

सरकारनामा ब्युरो

  1. तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये राणेंचे वर्चस्व पुन्हा एकदा स्पष्ट झाले.

  2. ठाकरे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाला अपेक्षित जनाधार मिळाला नाही.

  3. सलग पाच निवडणुकांमधील निकालांमुळे तालुक्यातील राजकीय समीकरण स्पष्ट झाले आहे.

kokan Politics : पक्ष कोणताही असो, तालुक्यात राणेंचीच मक्तेदारी राहणार, हे आजवरच्या पाच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांतून स्पष्ट झाले आहे. यंदाच्या निवडणुकीत एक गण आणि एक गट वगळता ठाकरे शिवसेनेचीही ताकद तालुक्यात दिसलेली नाही. फार मोठ्या मताधिक्याने ठाकरे सेनेचे उमेदवार पराभूत झाले आहेत. शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षालाही फारसा जनाधार या निवडणुकीत मिळाला नसल्याची बाब या निकालाने स्पष्ट केली.

सिंधुदुर्गच्या राजकारणात खासदार नारायण राणे यांची १९९० मध्ये एंट्री झाली. त्यानंतर कणकवली तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांवर राणे समर्थकांचीच ताकद राहिली आहे. २००५ मध्ये राणे काँग्रेसमध्ये गेले. त्यानंतरच्या सलग तीन जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये राणेंच्या समर्थकांनी एकतर्फी निवडणूक जिंकली. २०१९ मध्ये राणे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर आताची जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूकदेखील राणेंच्या शिलेदारांनी एकतर्फी जिंकली आहे.

यंदाची निवडणूक भाजप आणि शिवसेना शिंदे पक्ष यांनी युती करून लढविली. यात तालुक्यातील आठ जागांपैकी दोन जागा शिंदे शिवसेनेला देण्यात आल्या होत्या. निकालामध्ये सहा जागांवर भाजप, एक शिंदे शिवसेना आणि एक जागा भाजपच्या बंडखोर उमेदवारांने जिंकली, तर पंचायत समितीच्या १६ जागांपैकी १४ भाजप आणि दोन जागांवर शिंदे शिवसेनेचे उमेदवार विजयी ठरले आहेत. त्यामुळे कणकवली तालुक्यात भाजपला पक्षापुढे आव्हानच नसल्याचे अधोरेखित झाले आहे.

गतवर्षी विधानसभेची निवडणूक झाली होती. यात भाजपचे नीतेश राणे यांनी एक लाखांहून अधिक मते घेतली होती. तर ठाकरे शिवसेनेच्या उमेदवाराला ५० हजार मते होती. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकींत शिवेसना ठाकरे पक्षाला मिळालेल्या मतांची संख्या मोठ्या प्रमाणात घसरली आहे. यंदाच्या निवडणुकीत पंचायत समितीच्या तळेरे गणामध्ये काँग्रेसचे उमेदवार प्रवीण वरुणकर यांनी भाजपचे राजेश जाधव यांना चांगली टक्कर दिली.

जाधव यांना १९६० तर वरुणकर यांना १०१२ मते मिळाली. खारेपाटण मतदारसंघात ठाकरे शिवसेनेला खाते उघडण्याची संधी होती. या मतदारसंघातून ठाकरे शिवसेनेकडून रफिक नाईक यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. यात शिवसेना शिंदे उमेदवाराच्या तोडीस तोड मते मिळविण्यात नाईक यशस्वी झाले. शिवसेनेच्या शिंदे यांना १५०३, नाईक यांना १३२७, तर ठाकरे सेनेचे रामचंद्र राऊत यांना अवघी २८९ मते मिळाली. कळसुली गटामध्ये ठाकरे शिवसेनेचे उमेदवार प्राची आमडोसकर यांनी भाजप उमेदवाराशी कडवी लढत दिली. भाजपच्या दळवी यांना ४११८, तर ठाकरे शिवसेनेच्या आमडोसकर यांना ३०८६ एवढी मते मिळाली.

ओसरगाव गणामध्येही ठाकरे सेनेच्या चंदना राणे यांनी भाजप उमेदवाराशी मोठी टक्कर दिली. चंदना राणे यांना १६१०, तर भाजपच्या अक्षता राणे यांना १६९२ मते मिळाली. तालुक्यातील या चार लढतींचा अपवाद वगळता अन्य गट आणि गणांतील निवडणुका भाजप उमेदवारांनी प्रचंड मताधिक्यांनी जिंकल्या. नाटळ मतदारसंघात संदेश सावंत यांनी ठाकरे शिवसेनेचे उमेदवार उत्तम लोके यांचा ५ हजार १९३ अशा मताधिक्याने पराभव केला. यावरून राणेंच्या शिलेदारांची ग्रामीण भागात किती ताकद आहे, हे दिसून आले.

राणेंच्या कुशल नेतृत्वामुळे विरोधकांचीही कोंडी

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांत सर्वच गण आणि गटामध्ये ठाकरे शिवसेनेकडून उमेदवार उभे करण्यात आले होते; पण पालकमंत्री नीतेश राणे यांची ताकद पाहता अनेक उमेदवारांनी निवडणुकीआधीच माघार पत्करली. राणेंच्या राजकीय व्यूहरचनेमुळे पक्षातील विरोधकांचीही कोंडी झाली. अपवाद फक्त फोंडाघाट जिल्हा परिषद मतदारसंघाचा राहिला. भाजपच्या मुशीत घडलेले राजन चिके यांनी राणेंच्या विरोधात जाऊन निवडणूक लढवली आणि जिंकली सुद्धा; मात्र अन्य कुठल्याही गट आणि गणामध्ये भाजपमधील नाराज बंड करू शकले नाहीत.

संघटना बांधणीकडे नेत्यांचे दुर्लक्ष

२०२४ मध्ये खासदारकीच्या निवडणुकीत तत्कालीन खासदार विनायक राऊत यांचा पराभव झाला. त्यानंतर ठाकरे गटाच्या संघटनात्मक वाढीकडे नेतेमंडळींचे दुर्लक्ष झाले. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत शिवसेना जिल्हाप्रमुख आणि इतर वरिष्ठ मंडळी उमेदवारांच्या प्रचारालादेखील फिरकली नाहीत. बहुतांश कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. शिवसेनेचे नेते सतीश सावंत यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे आता कणकवली तालुक्यात तरी ठाकरे शिवसेनेला वालीच नसल्याचे चित्र आहे.

FAQs :

1. कोणत्या निवडणुकांमध्ये राणेंचे वर्चस्व दिसले?
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सलग पाच निवडणुकांमध्ये हे वर्चस्व दिसून आले.

2. ठाकरे शिवसेनेची कामगिरी कशी राहिली?
यंदाच्या निवडणुकीत बहुतांश ठिकाणी त्यांना मोठ्या मताधिक्याने पराभव स्वीकारावा लागला.

3. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची स्थिती काय होती?
या निवडणुकीत दोन्ही पक्षांना अपेक्षित जनाधार मिळालेला दिसला नाही.

4. या निकालातून काय संकेत मिळतात?
तालुक्यातील मतदारांचा कल राणेंकडे कायम असल्याचे संकेत मिळतात.

5. या निकालाचा पुढील राजकारणावर परिणाम होईल का?
स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणांवर याचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT