Ratnagiri News : लोटे एमआयडीसीतील कोकाकोला कंपनीने स्थानिक भूमिपुत्रांना कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक कामावरून काढून टाकल्याप्रकरणी भाजप नेते ॲड. वैभव खेडेकर आक्रमक झाले असून, त्यांनी कंपनीच्या एचआर मॅनेजरसह इतर अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. पण यावेळी कंपनीच्या गेटवर त्यांना रोखल्याने ते चांगलेच संतापले. तसेच गेटवरील वादादरम्यान, 'मी केवळ वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाचं पालक करतोय', असे कर्मचाऱ्याने सुनावल्याने ते चांगलेच चिडले. यावेळी खेडेकर यांनी, ही काय संसद आहे का? मला आतमध्ये का जाऊ दिले जात नाही, असा सवाल करत कंपनी प्रशासनाला थेट इशारा दिला. सध्या कोकणात या वादाची जोरदार चर्चा सुरू आहे.
खेड तालुक्यातील लोटे एमआयडीसीमध्ये असणारी कोकाकोला कंपनी गेल्या काही महिन्यांपासून कार्यरत आहे. तालुक्यातील काही स्थानिकांनी भूमिपुत्र म्हणून नियमितपणे काम करत होते. मात्र, कंपनी प्रशासनाने कोणतीही कायदेशीर किंवा पूर्वसूचना न देता या आठ ते दहा स्थानिक कामगारांना अचानक कामावरून कमी केले, ज्यामुळे स्थानिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
हाच गंभीर प्रकार लक्षात घेऊन ॲड. वैभव खेडेकर यांनी तातडीने हस्तक्षेप करत कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना जाब विचारला आणि आठ दिवसांच्या आत या सर्व संबंधित भूमिपुत्रांना सन्मानाने पुन्हा कामावर सामावून घ्यावे, अन्यथा कंपनीविरोधात तीव्र स्वरूपाचे जनआंदोलन छेडण्यात येईल, असा सज्जड दम व इशारा यादरम्यान देण्यात आला आहे.
दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरे यांना मोठा धक्का देत वैभव खेडेकर यांनी गेल्या वर्षी ऑक्टोंबर महिन्यात भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजप अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला होता. तर भाजपने या खेळीने ऑफर देणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या तोंडचा घास गेल्याची चर्चा झाली होती.
या घडामोडीनंतर वैभव खेडेकरांनी शिंदेंच्या शिवसेनेच्याविरोधात नगराध्यक्षपदी उमेदवार दिल्याने जिल्ह्यात राजकारण तापले होते. त्यांनी पत्नी वैभवी खेडेकर यांचा नगराध्यक्ष पदासाठीचा उमेदवारी अर्ज दाखल करत मोठा ट्विस्ट निर्माण केला होता. ज्यानंतर शिवसेना नेते रामदास कदम, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची खेडेकरांनी भेट घेत चर्चा केली होती.
मात्र भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून आदेश आल्यानंतर वैभव खेडेकर यांनी एक पाऊल मागे घेत पत्नी वैभवी खेडेकर यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला होता. या सर्व घडामोडीनंतर वैभव खेडेकर जिल्ह्यातील राजकारणातून काहीसे बाजूला झाले होते. पण आता पुन्हा एखदा ते अॅक्टीव्ह झाले असून मैदानात उतरले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.