

Raigad News : रायगड जिल्ह्यात शांत झालेला राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील वाद पुन्हा एकदा सुरू झाला आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी राष्ट्रवादीतील घडामोडींवरून प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच मुलगी जुईली दळवी यांच्या माघारीवरूनदेखील जोरदार हल्लाबोल केला आहे. यामुळे कोकणातील राजकारणात शिवसेना आणि राष्ट्रवादीतील धुसफूस अद्याप कमी झालेली दिसत नाही.
एकीकडे राज्यात कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची चर्चा होत असतानाच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आपली राजकीय ताकद पणाला लावत शिवसेनेतील बंडखोरी मोडीत काढली. तसेच भाजप नेते तथा मंत्री नितेश राणे यांनीदेखील सूत्रे फिरवत बाळ माने यांना माघार घ्यायला लावली. यावेळी शिवसेनेतील माघारीमागे रायगडच्या पालकमंत्रीपदाची डील झाल्याची चर्चा रंगली होती. त्यानंतर शिवसेनेचे अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी तटकरेंसह स्वकीयांवर जोरदार टीका केली होती.
दरम्यान, शिवसेना-राष्ट्रवादीतील वाद शांत झाला. तर राष्ट्रवादीतील अंतर्गत घडामोडींना वेग आला. याच सर्व घडामोडींवरून पुन्हा एकदा दळवी यांनी तटकरेंवर निशाणा साधला आहे. तसेच पालकमंत्रीपदावरूनदेखील त्यांनी भाष्य करताना अनिकेत तटकरे यांच्या विजयावरून टोला लगावला आहे.
यावेळी दळवी यांनी, "आम्हाला पालकमंत्रीपद मिळणारच असून भरतशेठ हेच पालकमंत्री होतील. या संदर्भात आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. त्यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेतली असून अधिवेशनानंतर यासंदर्भातील घोषणा होईल, असे सांगितले आहे." तसेच मुलगी जुईली दळवी यांना माघार घ्यावी लागल्यावरून आता दळवी यांनी थेट भाष्य केले आहे.
"माझ्या मुलीनेदेखील उमेदवारी अर्ज भरला होता. तो एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर मागे घेतला. मात्र आम्हाला पक्षाने संधी दिली असती, तर नक्कीच आम्ही निवडणूक लढलो असतो आणि जिंकलोही असतो. शिवसेना म्हणून आम्ही अनिकेत तटकरे यांचा पराभव केला असता. ते निवडणूक हरले असते," असा दावा दळवी यांनी केला आहे.
मध्यंतरी राष्ट्रवादीने दिल्लीत आणि निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या पदाचा उल्लेख केला नव्हता. या पत्रव्यवहाराची राज्यात जोरदार चर्चा रंगली होती. यावरून दळवी यांनी तटकरेंवर निशाणा साधला आहे. "तटकरे यांचा स्वभाव हा सगळ्यांना माहीत आहे. त्यामुळेच सुनेत्रा पवार यादेखील सावध भूमिका घेत आहेत," असे वक्तव्य दळवी यांनी केले आहे. दळवी यांच्या या वक्तव्यामुळे आता राज्यात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता असून, शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये पुन्हा वादाची ठिणगी पडल्याचे दिसत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.