रत्नागिरी पालिकेच्या निवडणुकीत विकासाच्या नव्हे तर व्यक्तिमत्त्व आणि लोकसंपर्काच्या मुद्द्यांवर निवडणूक होणार आहे.
महायुतीसाठी ही निवडणूक अनुकूल ठरण्याची शक्यता असून ठाकरे गटात नगराध्यक्ष पदावरून नाराजी निर्माण झाली आहे.
बाळ माने आणि मिलिंद कीर यांच्या कुटुंबातील महिलांमध्ये नगराध्यक्ष पदासाठी मोठी शर्यत रंगण्याची चिन्हे आहेत.
Ratnagiri : राजेश शेळके
राज्याच्या राजकारणात सध्या तळकोकण आणि कोकण हॉटस्पॉट ठरला आहे. येथे राजकीय घडामोडी वेगवान झाल्या असून महायुतीत वाद निर्माण झाला आहे. तर महाविकास आघाडीमध्ये नाराजीनाट्य रंगण्याची चिन्हे दिसून येत आहेत. रत्नागिरीत अद्याप महायुतीतील जागावाटपाचे गणित आणि महाविकास आघाडीतील नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराचा तिढा सुटलेला नाही. यामुळे आगामी स्थानिकच्या निवडणुकीच्या आधी हा तिढा सुटणार की निवडणूक व्यक्तिगत ताकदीवर होणार याकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे.
कोकणात रत्नागिरी पालिकेची निवडणूक कायमच चर्चेचा विषय ठरली असून येथील राजकीय स्थिती प्रत्येक वेळी वेगळी राजकीय घडामोड घडवणारी असते. वास्तविक, या पालिकेवर वर्षानुवर्षे शिवसेनेचे वर्चस्व आहे. परंतु माजी नगराध्यक्ष दिवंगत उमेश शेट्ये यांनी ‘वन टू का फोर’ करत सत्ता काबीज करत महायुतीचा पालिकेवर (शिवसेनेचा) झेंडा फडकवला. त्यावेळी पालिकेत शिवसेना -18, भाजप -6आणि राष्ट्रवादी -6 अशी सदस्य संख्या होती.
दरम्यान आता गेली तीन वर्षे पालिकेवर प्रशासक राज असल्याने पालिकेचे राजकारणही वेगळ्या वळणावर गेले आहे. राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडल्याने राजकीय समीकरणे बदलली आहेत. राज्यात महायुती म्हणूनच भाजप-शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढण्याच्या मानसिकतेत आहेत. राज्यातील सत्तेचा वापर करून पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीत भरीव काम केलं आहे.
पण त्यांना याचा लाभ मिळालेला नाही. जे विधानसभा निवडणुकीत शहरातून झालेल्या मतदानावरून स्पष्ट होते. यामुळे पालिकेची आगामी निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर नाही तर व्यक्तिगत जनसंपर्क, लोकांची तत्परतेने केलेली कामे, त्याला जोड विकासकामे आदी मुद्द्यावर होणार यात शंका नाही.
यामुळेच सामंत यांनी शहराचा अभ्यास करून पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांना निधी देत प्रभाग मजबूत केले आहेत. भाजपची देखील तीच स्थिती असून अगदी सूक्ष्म नियोजन भाजप करताना दिसत आहे. पण येथे युती झाली तरच भाजप शिवसेनेला ही निवडणूक फलदायी ठरणार आहे.
दुसरीकडे, महाविकास आघाडीचा विचार केला तर रत्नागिरीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवेसना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद आहे. परंतु काँग्रेस आपली ताकद निर्माण करण्यास कमी पडत आहे. शिवसेना फुटल्यामुळे शहरातील ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद कमी झाली आहे. राष्ट्रवादीचीदेखील तीच परिस्थिती आहे. त्यातच गेल्या तीन वर्षांपासून महाविकास आघाडी सत्तेत नाही, संपर्काचा अभाव आणि नेते नसलयाने आता कोकणात अडचणीत आली आहे.
अशातच शिवसेनेचे उपनेते बाळ माने यांचे मात्र ठाकरे गटाची मरगळ झटकण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत; परंतु नगराध्यक्षपदाचा मोठा तिढा नाराजीचे कारण ठरणारा आहे. बाळ माने हे आपली सून शिवानी माने हिला नगराध्यक्षाच्या लढतीत उरवणार आहेत, तर राष्ट्रवादीचे माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर देखील आपल्या पत्नीला उमेदवारी मिळण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. या उमेदवारीवरून महाविकास आघाडीमध्ये नाराजीनाट्य रंगण्याची चिन्हे आहेत.
1. रत्नागिरी पालिका निवडणुकीत प्रमुख मुद्दे कोणते असतील?
विकास नव्हे तर व्यक्तिगत संपर्क, तत्पर कामकाज आणि प्रतिमा हे प्रमुख मुद्दे असतील.
2. महायुतीला निवडणुकीत कसा फायदा होऊ शकतो?
भाजप आणि शिवसेनेच्या एकत्र येण्यामुळे महायुतीला मतदारांचा मोठा पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे.
3. ठाकरे गटात नाराजी का आहे?
नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीवरून गटांतर्गत मतभेद आणि नाराजी निर्माण झाली आहे.
4. नगराध्यक्ष पदासाठी कोणत्या नेत्यांच्या कुटुंबीयांची चर्चा आहे?
बाळ माने यांच्या सूनबाई शिवानी माने आणि राष्ट्रवादीचे माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांच्या पत्नींची नावं चर्चेत आहेत.
5. या निवडणुकीचा निकाल कोणत्या घटकांवर अवलंबून असेल?
स्थानिक लोकप्रियता, जनसंपर्क, आणि व्यक्तिगत विश्वासार्हता यावर निकाल अवलंबून राहील.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.